scorecardresearch

विश्लेषण : निवडणुकीत उमेदवाराची ‘अनामत’ रक्कम कधी होते जप्त आणि ही रक्कम वाचवण्यासाठी किती मतं मिळवावी लागतात?

हिमाचल प्रदेशात जवळपास सर्वच आणि गुजरातमध्ये अनेक जागांवर आम आदमी पार्टीच्या उमेदवारांची अनामत जप्त झाल्याचे दिसून आले आहे.

विश्लेषण : निवडणुकीत उमेदवाराची ‘अनामत’ रक्कम कधी होते जप्त आणि ही रक्कम वाचवण्यासाठी किती मतं मिळवावी लागतात?
(फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. गुजरातमध्ये भाजपाला प्रचंड बहुमत मिळालं आहे. तर हिमाचलमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. दोन्ही राज्यांमधील निवडणुकीत काही उमेदवारांनी प्रचंड मतं मिळवत विजय मिळवला तर काही उमेदवारांना स्वत:ची अनामत रक्कमही (डिपॉजिट) वाचवता आले नाही. त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे. हिमाचल प्रदेशात जवळपास सर्वच आणि गुजरातमध्ये अनेक जागांवर आम आदमी पार्टीच्या उमेदवारांची अनामत जप्त झाल्याचे दिसून आले आहे.

एखाद्या निवडणुकीत तर उमेवाराची अनामत जप्त झाली असेल, तर त्याचा अर्थ जनतेने त्याला स्पष्टपणे नाकारलं असा होतो. त्या पदासाठी तो उमेदवार लायक नाही, असं जनतेचं मत असल्याचं यातून स्पष्ट होतं. त्यामुळे अशा उमेदवारांची अनामत जप्त केली जाते. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात अनामत रक्कम काय असते?, किती असते? आणि ती कधी जप्त होते?

प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी निर्धारित केलेली रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. यालाच अनामत रक्कम म्हटले जाते. जर कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीमध्ये एकूण मतांच्या एक षष्ठांश मतंही मिळवता आली नाहीत, तर त्याच्याकडून जमा केलेली अनामत रक्कम आयोगाकडून जप्त केले जाते.

अनामत रक्कम किती असते? –

ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा ते राष्ट्रपती निवडणूक अशा प्रत्येक निवडणुकांसाठी अनामत रक्कम वेगवेगळी असते. या निवडणुकीमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवाराला एक निर्धारित रक्कम अनामत करावी लागते. तथापि, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सामान्य श्रेणी आणि एससी-एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वेगवेगळी रक्कम निर्धारित केलेली असते. तसेच, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी सर्व उमेदवारांसाठी एकच रक्कम निर्धारित केली जाते.

लोकसभा निवडणुकीसाठी सामान्य श्रेणीच्या उमेदवारासाठी अनामत रक्कम २५ हजार रुपये आहे, तर एससी आणि एसटी श्रेणीच्या उमेदवारांसाठी ही रक्कम १२,५०० इतकी आहे.

विधानसभा निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला अनामत म्हणून १० हजार रुपये, तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ हजार रुपये निवडणूक आयोगाकडे जमा करावे लागतात.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सर्व वर्गातील उमेदवारांना १५ हजार रुपये अनामत जमा करावी लागते.

कोणत्या प्रसंगी अनामत जप्त होते? –

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, जर एखाद्या उमेदवाराला एकूण मतदानाच्या १/६ म्हणजेच १६.६६% मते मिळवता आली नाहीत, तर त्याची अनामत जप्त केले जाते. उदाहरणार्थ, एका जागेवर १ लाख मते पडली आणि उमेदवाराला १६,६६६ पेक्षा कमी मते पडली तर त्याची अनामत रक्कम जप्त होईल.

कोणत्या प्रसंगी अनामत परत केले जाते?-

ज्या उमेदवाराला १/६ पेक्षा जास्त मते मिळतात त्यांची अनामत रक्कम परत केली जाते. जर उमेदवार निवडून आला असेल, परंतु त्याला १/६ पेक्षाही कमी मते मिळाली असतील, तरीही त्याला अनामत रक्कम परत केली जाते. याशिवाय मतदान सुरू होण्यापूर्वी कोणत्याही उमेदवाराचा मृत्यू झाल्यास, ज्या उमेदवारांचे नामांकन रद्द झाले आहे किंवा ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे, अशा सर्व उमेदवारांची अनामत रक्कमही परत केली जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 17:31 IST

संबंधित बातम्या