पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सत्तेवर टिकून राहण्यासाठी प्रत्येक युक्ती आजमावली परंतु काल (१० एप्रिल) मध्यरात्रीनंतर संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली, त्यांचा जवळपास चार वर्षांचा कार्यकाळ संपला. याचबरोबर मागील काही दिवसांतील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर पाकिस्तानात सत्तापालटावर शिक्कामोर्तब झाले. तर, पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ पक्षाचे (पीएमएल-एन) अध्यक्ष शाहबाझ शरीफ यांनी काल (रविवार) पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला.
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची निवडणूक आज (सोमवार) होत आहे. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सहअध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी विरोधी आघाडीच्या संयुक्त बैठकीत शाहबाझ यांचे पंतप्रधानपदासाठी नाव सुचवले आहे. शाहबाझ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. तसेच, १३ ऑगस्ट २०१८ पासून नॅशनल असेंब्लीचे सदस्य आहेत आणि विरोधी पक्षनेतेही आहेत. याआधी शाहबाज शरीफ हे पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. सध्या ते पीएमएल-एनचे अध्यक्ष आहेत.
पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी शाहबाझ यांनी संसदेला संबोधित करताना राज्यघटनेला भक्कम पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, “मला भूतकाळातील कटू स्मृतींना उजाळा द्यायचा नाही. आपल्याला त्या विसरून पुढे वाटचाल करायची आहे. आपण सुडाचे राजकारण करणार नाही अथवा कुणावर अन्यायही करणार नाही. आपण विनाकारण कुणालाही तुरुंगात टाकणार नाही. कायद्यानुसार सर्व कारवाई होईल.”
लाहोरला कुटुंब स्थलांतरित –
शाहबाज शरीफ यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५१ ला लाहोरमध्ये झाला. त्यांचे वडील मुहम्मद शरीफ हे व्यापारी होते. व्यवसायानिमित्त तो अनेकदा काश्मीरच्या अनंतनागला जात असे. अगोदर त्यांचे कुटुंब अमृतसर येथे स्थायिक होते. मात्र, १९४७ मध्ये जेव्हा भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची स्थापना झाली तेव्हा मुहम्मद शरीफ आपल्या कुटुंबासह लाहोरमध्ये स्थायिक झाले. शाहबाज शरीफ यांच्या आई पुलवामा येथील रहिवासी होत्या. लाहोरमधील सरकारी विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर शाहबाज यांनी आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळला.
शाहबाज यांना अब्बास शरीफ आणि नवाझ शरीफ हे दोन मोठे भाऊ आहेत. नवाझ शरीफ हे तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत. १९७३ मध्ये शाहबाज यांनी आपल्या चुलत बहिणीशी लग्न केले. दोघांना चार मुले आहेत. २००३ मध्ये शाहबाज यांनी दुसरे लग्न केले. असे मानले जाते की शाहबाज हे त्यांचा भाऊ नवाज यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत.
सधन कुटुंबात जन्मलेल्या, शाहबाज यांनी त्यांच्या कौटुंबिक व्यवसायापेक्षा राजकारण स्वीकारले, अगदी त्यांच्या भावाप्रमाणे. ते एका श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा होते, त्यांनी सरकारी कॉलेज लाहोरमध्ये शिक्षण घेतले आणि स्टील व लोखंडाचा व्यवसाय करणाऱ्या आपल्या कुटुंबाच्या मालकीच्या इत्तेफाक ग्रुपमध्ये सहभागी झाले.
राजकीय कारकिर्दीची सुरुवात अशी झाली –
शाहबाज शरीफ यांचा राजकारणात प्रवेश ८० च्या दशकात झाला. १९८८ मध्ये त्यांनी पहिली निवडणूक जिंकली. पंजाब प्रांतातील लाहोर विधानसभेतून त्यांनी निवडणूक जिंकली. मात्र, १९९० मध्ये विधानसभा विसर्जित करण्यात आली. १९९० मध्ये त्यांनी पंजाब प्रांतातून पुन्हा निवडणूक जिंकली. त्याच वर्षी त्यांनी नॅशनल असेंब्लीची निवडणूकही जिंकली. दोन्ही विजयानंतर त्यांनी नॅशनल असेंब्लीची निवड केली. १९९३ मध्ये नॅशनल असेंब्लीही विसर्जित झाल्याने त्यांना सदस्यत्व गमावावे लागले. १९९३ मध्ये त्यांनी पुन्हा लाहोर विधानसभा आणि नॅशनल असेंब्लीच्या निवडणुका जिंकल्या. यावेळी त्यांनी नॅशनल असेंब्लीची जागा सोडली.
पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री –
१९९७ मध्ये त्यांनी पुन्हा पंजाब प्रांताची निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी पीएमएल-एनच्या तिकिटावर निवडणूक लढवली. फेब्रुवारी १९९७ मध्ये शाहबाज शरीफ पहिल्यांदा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री बनले. १९९९ मध्ये पाकिस्तानात लष्कराने सत्तापालट केला होता. शाहबाज शरीफ यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्चीही गेली. त्यांना आणि त्याच्या कुटुंबाला देश सोडून दुबईला जावे लागले. २००७ मध्ये शाहबाज शरीफ आणि त्यांचे कुटुंब पुन्हा पाकिस्तानात परतले. जून २००८ मध्ये शाहबाज पुन्हा पंजाबचे मुख्यमंत्री झाले होते. तसेच, २०१३ च्या निवडणुकीनंतर देखील शाहबाज तिसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री बनले होते.
२०१८ मध्येही पंतप्रधानपदाचे दावेदार होते –
२०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पीएमएल-एनने शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले, मात्र या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने बाजी मारली. शाहबाज शरीफ यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
सप्टेंबर २०२० मध्ये शाहबाज शरीफ यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. एप्रिल २०२१ मध्ये त्यांना लाहोर हायकोर्टातून जामीन मिळाला. शाहबाज शरीफ यांच्याविरोधात हा खटला सुरू आहे.