गुजरातमधील अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडली. फ्लाइट एआय-१७१ म्हणून कार्यरत असलेले बोईंग ७८७ ड्रीमलाइनर हे विमान अहमदाबादहून लंडन गॅटविकला जात असताना टेकऑफ झाल्यानंतर लगेचच एका निवासी वसतिगृहात कोसळले. या अपघातात एकूण २७४ लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, अद्यापही या अपघाताचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. आता एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१ या अपघातग्रस्त विमानातून कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) सापडले आहेत. त्यातून विमान अपघाताचे कारण स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे.
तपासकर्ते आता १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या अपघातापूर्वीच्या शेवटच्या क्षणांमध्ये नेमकी काय चूक झाली, याचा तपास करत आहेत. या दोन्ही उपकरणांना ‘ब्लॅक बॉक्स’ म्हटले जाते. प्रत्येक विमान अपघातातील चौकशीसाठी हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. परंतु, सीव्हीआर आणि एफडीआर नक्की काय आहे? ते काय रेकॉर्ड करतात? त्याच्यामुळे अपघाताचे सत्य कसे समोर येईल? भारतातील सर्वात घातक विमान अपघाताच्या तपासात सीव्हीआर आणि एफडीआर कसे महत्त्वाचे ठरले? त्याविषयी जाणून घेऊयात.

कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे काय?
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर किंवा सीव्हीआरमध्ये कॉकपिटमधील घडणाऱ्या सर्व गोष्टी रेकॉर्ड होतात, ज्या नंतर ऐकता येतात. यामध्ये वैमानिकांमधील संभाषणे, हवाई वाहतूक नियंत्रकांशी करण्यात येणारा संवाद, कॉकपिट अलार्म, स्वयंचलित इशारे, इंजिनचा आवाज आणि स्विचेस सुरू करण्यासारखे आवाज ऐकू येतात. आधुनिक पद्धतीचे सीव्हीआर सतत लूपमध्ये दोन तासांपर्यंत कॉकपिट ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. मानवी चूक, ताण, लक्ष विचलित होणे किंवा गोंधळाची कोणतीही स्थिती यात सीव्हीआरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. यापूर्वी झालेल्या अपघातात वैमानिक अखेरच्या क्षणी नक्की काय करत होते आणि आपत्कालीन प्रोटोकॉलचे पालन केले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सीव्हीआरची मदत झाली आहे.
फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजे काय?
फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजेच एफडीआर. संपूर्ण उड्डाणादरम्यान विमानाच्या हालचाली, बदल आणि प्रणालींबद्दल तांत्रिक डेटा संग्रहित करतो. यामध्ये उंची, वेग, रडार, आयलरॉन आणि थ्रॉटलसारख्या घटकांची माहिती असते. एफडीआरमध्ये इंजिन कार्यप्रदर्शन निर्देशक, ऑटोपायलट आणि उड्डाणादरम्यान ट्रिगर झालेल्या कोणत्याही सिस्टम अलर्टची नोंददेखील होते. एफडीआर किमान २५ तासांचा डेटा संग्रहित करू शकतात. यातील माहिती डीकोड केल्यानंतर तपासकर्त्यांसमोर अनेक गोष्टी उघड होतील. यातून तपासकर्त्यांना विमानाच्या अचूक हालचालींची, यांत्रिक बिघाड, सिस्टममधील समस्या किंवा विमानातील इतर विसंगती शोधण्यास मदत मिळेल.
अहमदाबाद विमान अपघातात सीव्हीआर आणि एफडीआर महत्त्वाचे का आहेत?
- एअर इंडिया एआय-१७१ अपघाताच्या बाबतीत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) आणि पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) यांनी रविवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीव्हीआर अपघातग्रस्त साइटवरून मिळवण्यात आले आहे.
- तपासकर्त्यांना यापूर्वी अपघातग्रस्त भागात ब्लॅक बॉक्सपैकी एक असलेले एफडीआर सापडले होते.
- बोईंग ७८७ मध्ये तांत्रिक बिघाड झाला का? वैमानिकांनी डिस्ट्रेस कॉल केला का? पक्षांनी धडक दिली का? इंजिनमध्ये बिघाड झाला का? या बाबी समजून घेण्यासाठी सीव्हीआर आणि एफडीआर महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?
सीव्हीआर आणि एफडीआर डेटा डीकोड करण्याची वेळ त्यांच्या भौतिक स्थितीवर आणि अपघात कोणत्या स्थितीत झाला यावर अवलंबून असते. रेकॉर्डर सुरक्षित असेल आणि डेटा पुनर्प्राप्त करणे शक्य असेल, तर काही दिवसांत प्राथमिक तपास सुरू होऊ शकतो. परंतु, कधीकधी संपूर्ण तपासणीसाठी आठवडे किंवा महिनेही लागतात. भारतासह बहुतेक देश ३० दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल जारी करण्याच्या आंतरराष्ट्रीय नियमाचे पालन करतात. मात्र, तांत्रिकदृष्ट्या केल्या गेलेल्या तपासानंतरच अंतिम अहवाल जारी केला जातो.
सीव्हीआर आणि एफडीआर डेटा कसा संरक्षित केला जातो?
अपघातग्रस्त भागातून सीव्हीआर आणि एफडीआर मिळवल्यानंतर रेकॉर्डर डेटा काढण्यासाठी ही उपकरणे देशातील किंवा काही प्रकरणांमध्ये विदेशातील एका विशेष प्रयोगशाळेत पाठवले जातात. भारतात एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इनवेस्टिगेशन ब्यूरो (एएआयबी)कडे सीव्हीआर आणि एफडीआर पाठवले जातात. गरज पडल्यास त्यांना प्रमाणित आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांमध्येही पाठवले जाऊ शकते. ही उपकरणे मोठा विमान अपघात, तीव्र स्वरूपाची आग आणि खोल पाण्याचा दाब सहन करू शकेल या पद्धतीने डिझाइन केलेली आहेत. या बॉक्सच्या बाहेरील भागाचे नुकसान झाले तरी मेमरी युनिट्सचे नुकसान होत नाही.
केवळ अधिकृत अपघात तपासकांनाच हा डेटा तपासण्याची परवानगी असते. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगची तपासणी करताना गोपनीयतेचे नियम पाळले जातात आणि अशा रेकॉर्डिंग सहसा सार्वजनिक केल्या जात नाही. या डेटामधील माहिती मिळवण्याचा उद्देश कोणाला दोष देणे नसून अपघात कसा झाला, काय घडले हे समजून घेणे आणि भविष्यातील अशा स्वरूपाच्या घटना टाळणे हा असतो.
हा डेटा महत्त्वाचा का आहे?
अहमदाबाद विमान अपघातानंतर अनेक जण हा अपघात कसा झाला, याचा अंदाज वर्तवताना दिसत आहेत. मात्र, त्यावेळी नक्की काय घडले आणि अपघात कसा झाला, हे केवळ सीव्हीआर आणि एफडीआर डेटामधूनच पुढे येऊ शकते. सीव्हीआर आणि एफडीआर केवळ रेकॉर्डर नाहीत, तर यामुळे विमान डिझाइन सुधारण्यासाठी, वैमानिकांचे प्रशिक्षण सुधारण्यासाठी आणि आपत्कालीन स्थितीतील प्रोटोकॉल मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत.
भूतकाळात भारतात झालेल्या विमान अपघातांमध्ये सीव्हीआर आणि एफडीआरमुळे कशी मदत झाली?
भारतातील अनेक मोठ्या विमान अपघातांचे निराकरण करण्यात ब्लॅक बॉक्समधील डेटाने महत्त्वाची भूमिका बजावली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) सादर केलेल्या अधिकृत कोर्ट ऑफ इन्क्वायरी रिपोर्टनुसार, २०१० मध्ये मंगळूरू येथे झालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस अपघातात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डमुळे अपघाताचे कारण समोर आले. वैमानिकाने दीर्घकाळ झोप घेतल्याने विमान दिशाहीन झाल्याचे आणि त्याने मार्गक्रमण करताना अनेक स्वयंचलित इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे या महितीतून समोर आले होते. फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधूनही महत्त्वाची माहिती समोर आली. विमान टेबल-टॉप रनवेवर निर्धारित क्षेत्रापेक्षा बरेच पुढे गेले होते आणि त्यामुळे विमानाला थांबण्यासाठी पुरेसे अंतर राहिले नाही आणि अपघात घडला, असे त्यातून समोर आले.