मोहन अटाळकर

कापूस ते कापड या प्रक्रिया उद्योगात विदर्भात महत्त्वाचे स्थान निर्माण करणारी अचलपूर येथील ‘फिनले मिल’ गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या दुर्लक्षामुळे शेकडो गिरणी कामगारांचे प्रश्न अधांतरी आहेत. करोना संकटकाळात, मार्च २०२० पासून देशव्यापी टाळेबंदी लागू झाली आणि त्यात फिनले मिलसह राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या २३ गिरण्यांमधील उत्पादन थांबविण्यात आले. फिनले मिलसह काही गिरण्यांमध्ये जानेवारी २०२१ पासून सामान्य कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले, पण खेळते भांडवल आणि इतर आर्थिक अडचणींमुळे उत्पादन सुरू करणे शक्य नाही, असे सांगून वस्त्रोद्योग महामंडळाने अंग काढून घेतले. ही गिरणी पुन्हा केव्हा सुरू होणार, असा सवाल हजारो कामगार करत आहेत.

Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Parakala Prabhakar criticism of the government development work Pune news
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे सरकारवर टीकास्र, म्हणाले, ‘विकास होत असल्याचे दाखवण्याची सरकारला घाई’
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ

फिनले मिलचा इतिहास काय?

विदर्भात कापसाच्या उत्पादनासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसिद्ध. येथील कापूस मुंबईसह देशातल्या इतर भागांतून थेट इंग्लंडपर्यंत पोहोचला. हे वैभव डोळ्यांसमोर ठेवून आणि या भागात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या म्हणून तेव्हा काही कापड गिरण्या सुरू झाल्या. अचलपूरची विदर्भ मिल ही त्यातलीच एक होती. राजाभाऊ देशमुख यांच्या पुढाकाराने १९२५ मध्ये अचलपुरात विदर्भ मिल्स (बेरार) लि. या कंपनीमार्फत कापडनिर्मिती उद्योग सुरू झाला. त्या वेळी २ हजार कामगार कामाला होते. १९५९ मध्ये विदर्भ मिल बंद पडली. १९७२ मध्ये राज्य वस्त्रोद्योग महामंडळाने मिल ताब्यात घेतली. नंतर १९७४ मध्ये ती राष्ट्रीयीकृत झाली. २००३ मध्ये मिलचे शेवटचे युनिटही बंद झाले. २००८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते फिनले मिलची पायाभरणी झाली होती. आधीच्या गिरणीच्या जागेवरच ३२६ कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवी फिनले मिल उभारण्यात आली.

फिनले मिल बंद पडण्याचे कारण काय?

वर उल्लेख केल्याप्रमाणे २०२० मध्ये देशव्यापी टाळेबंदी झाली आणि त्यात फिनले मिल बंद पडली. कामगारांनी आंदोलन केले. मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. जानेवारी २०२१ मध्ये एनटीसीने फिनलेसह काही मिल पुन्हा सुरू केल्या, पण तीन महिन्यांतच मिल पुन्हा बंद पडली. कापूस उपलब्ध नसल्याचे कारण त्यासाठी सांगण्यात आले. कामगारांना तब्बल अडीच वर्षांपासून अर्धा पगार मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तोही मिळालेला नाही. थकबाकी देण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही. त्यामुळे कामगार हतबल झाले आहेत. उपासमार टाळण्यासाठी ९९ टक्के कामगारांनी आपले भविष्य निर्वाह निधीचे पैसे काढून घेतले. दरम्यानच्या काळात वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांची कामगार प्रतिनिधींनी भेट घेतल्यावरही काहीच हालचाली झाल्या नाहीत.

विश्लेषण: मलनिस्सारण प्रकल्पाची आवश्यकता का?

राजकीय पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत?

अचलपूरचे आमदार बच्चू कडू, माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख यांच्यासह अनेक नेते ही मिल सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत. गिरणी कामगार संघ, भारतीस मजदूर संघाने वेळोवेळी आंदोलने केली आहेत. फिनले मिल आणि एनटीसीच्या इतर गिरण्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या (बीएमएस) वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नुकतीच गोयल यांची भेट घेतली. त्यांना निवेदन सादर केले.
भारतीय मजदूर संघाचा आक्षेप काय आहे?
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग (पीएसयू) म्हणजे ‘पांढरा हत्ती’ असल्याचे सरकारचे धोरण आहे आणि सर्व एनटीसी गिरण्यांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भारतीय मजदूर संघाने केला आहे. केंद्र सरकारने एनटीसीबद्दलचे धोरण बदलले पाहिजे, असे सांगून संघटनेने वस्त्रोद्योग मंत्रालयाला उत्पादन बंद आणि तोट्यात असलेल्या एनटीसी मिलच्या पुनरुज्जीवनासाठी वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत.

गिरण्यांचे पुनरुज्जीवन कसे केले जाऊ शकते?

पहिल्या टप्प्यात सक्षम असलेल्या १० ते ११ गिरण्यांमध्ये उत्पादन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करावा किंवा अतिरिक्त वित्तपुरवठ्यासाठी धोरण स्वीकारावे, अशी सूचना भारतीय मजदूर संघाने केली आहे. याखेरीज एनटीसीला वीज खर्च कमी करण्यासाठी पुरवठादार म्हणून प्राधान्य द्यावे, त्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प सुरू करावेत, संपूर्ण प्रशासनात फेरबदल करावे आणि व्यवस्थापनाला जबाबदार घोषित करावे, असे आणखी काही उपायही सुचविण्यात आले आहेत.

विश्लेषण: पंतप्रधान स्वनिधी योजनेकडे खरेच दुर्लक्ष होते आहे का?

सरकारच्या पातळीवर काय स्थिती आहे?

केंद्र सरकारने एनटीसीच्या तोट्यातील गिरण्यांचे विवरणच सादर केले आहे. २०१९-२० या वर्षात फिनले मिलचे उत्पन्न ७७.८२ कोटी होते, तर एकूण खर्च ९५.१२ कोटी होता. एकूण तोटा १७.२९ कोटी इतका झाला. २०२०-२१ मध्ये तोटा २१.२३ कोटींवर तर २०२१-२२ मध्ये २७.३६ कोटींवर पोहोचल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालय, निती आयोग, वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम विभागाशी सल्लामसलत करून विविध बंद पडलेल्या गिरण्यांसदर्भात कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. पण अद्यापही फिनले मिल पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळालेले नाहीत.

mohan.atalkar@expressindia.com