१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पहिल्यांदाच ७ मे रोजी देशभरात मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना नागरी संरक्षणासाठी हे मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्धाचे साक्षीदार असलेल्या अनेकांसाठी जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. पाच दशकांहून अधिक काळानंतर आता पुन्हा एकदा हे मॉक ड्रिल होणार आहे. पाकिस्तानशी सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर भारत पुन्हा एकदा मॉक ड्रिलची तयार करीत आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना २४४ वर्गीकृत नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये हे मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामध्ये संवेदनशील जिल्ह्यांचा समावेशही आहे.
१९७१ च्या नंतर पहिल्यांदाच हे मॉक ड्रिल होत आहे. आताच्या आणि त्या वेळच्या मॉक ड्रिलमध्ये काय फरक आहे? या मॉक ड्रिलमध्ये काय समाविष्ट आहे? त्याकडून काय अपेक्षित आहे आणि ते का महत्त्वाचे आहे याबाबत आपण जाणून घेऊ…
या मॉक ड्रिलमध्ये भारत सरकारने जिल्हा नियंत्रक, विविध जिल्हा अधिकारी, नागरी-संरक्षण वॉर्डन, स्वयंसेवक, गृहरक्षक (सक्रिय व राखीव स्वयंसेवक), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस), महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मॉक ड्रिलमध्ये काय समाविष्ट असेल?
सर्वांत आधी मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यांच्या कार्यक्षमतेची चाचणी केली जाईल. म्हणजेच सर्व नियुक्त शहरी केंद्रे आणि संवेदनशील आस्थापने हवाई हल्ल्याच्या सायरनची चाचणी करतील आणि ते सक्रिय करतील. येणाऱ्या हवाई धोक्याची नागरिकांना सूचना देण्यासाठी हा मोठा आपत्कालीन गजर आहे.
त्यामार्फत क्षेपणास्त्र हल्ले किंवा ड्रोन हल्ल्यांसारख्या कोणत्याही हवाई आक्रमणादरम्यान तत्काळ येणारे प्रतिसाद पडताळले जातील. सायरन हे एका महत्त्वपूर्ण प्रथम श्रेणीतील अलर्ट सिस्टीम म्हणून काम करतात. त्यामुळे लोकांना त्वरित आश्रय घेता येतो.
मॉक ड्रिलमध्ये क्रॅश ब्लॅकआउट (मोठ्या प्रदेशात एकाच वेळी अंधार करणे) उपायदेखील अमलात आणले जातील. रात्रीच्या वेळी हवाई देखरेख किंवा हल्ल्यांदरम्यान लक्ष्य बनू नये म्हणून सर्व दृश्यमान दिवे कमीत कमी वेळेत बंद करण्याचा यामध्ये समावेश आहे. महत्त्वाच्या आस्थापनांच्या संरक्षणासाठी कॅमोफ्लॉज, तातडीने स्थलांतर करावे लागल्यास त्याची तयारी आणि सराव, तसेच उपग्रह आणि हवाई शोधांपासून बचावासाठी जाळी, रंग किंवा पानांचा वापर करणे यांचाही समावेश आहे.
शत्रूच्या हल्ल्यात स्वत:च्या संरक्षणासाठी नागरी संरक्षणाबाबत विद्यार्थी आणि नागरिकांना प्रशिक्षण दिले जाईल. कार्यशाळांमध्ये डक अँड कव्हरनजीकचा निवारा शोधणे, शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करणे आणि प्रथमोपचार प्रदान करणे यांसारख्या गोष्टींवरही लक्ष केंद्रित केले जाईल. हे मॉक ड्रिल भारतीय हवाई दलासह हॉटलाइन किंवा रेडिओ कम्युनिकेशन लिंक्सच्या कार्यक्षमतेचीदेखील चाचणी करील. तसेच ते नियंत्रण कक्षांच्या क्षमतेचीही चाचणी करील.
मॉक ड्रिलचे महत्त्व काय?
भारतीय सैन्याने पंजाबमधील फिरोजपूर छावणीत ब्लॅकआउट ड्रिल केल्याच्या तीन दिवसांनंतर केंद्राने या मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहेत. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्ध, बांगलादेश मुक्तियुद्धाच्या आधी भारतात अशा प्रकारचे ड्रिल केले गेले नाही. त्यावेळी भारताने सायरन वाजवले होते. त्यामध्ये एका विशिष्ट वेळी सायरन वाजत असे आणि त्यानंतर लोकांना दिवे बंद करावे लागत होते. घरांच्या काचा कागदाने झाकून घ्यायच्या आणि जर तुम्ही बाहेर असताना सायरन ऐकला, तर तुम्हाला जमिनीवर झोपून कान बंद करायचे आहेत. अशा आठवणी काही लोक १९७१ च्या मॉक ड्रिलबाबत सांगतात.
प्रादेशिक अस्थिरतेबाबत आधीच चिंता असताना भारताने अशा प्रकारचे सराव करण्याचे हे पाऊल तणावग्रस्त परिस्थितीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे दर्शवते, असेही बोलले जात आहे. भूकंप किंवा इमारती कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी तयारी करण्यासाठी मॉक ड्रिल नियमितपणे आयोजित केली जातात. मात्र, बाह्य धोक्यांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजनांचा समावेश करणे हे सूचक आहे. नागरिकांना सर्वांत वाईट परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार करणे हेच या सरावाचे ध्येय आहे. हे काल्पनिक धोक्यांबाबत नाही, तर युद्धाच्या वास्तविक शक्यतेची तयारी आहे.
१९७१ चे मॉक ड्रिल कसे होते?
पत्रकार व लेखक मधुरेंद्र प्रसाद सिन्हा यांनी वयाच्या १७-१८ व्या वर्षी भारतात केलेले हे शेवटचे मॉक ड्रिल अनुभवले होते. सायरन म्हणजे दिवे बंद. १९७१ नंतर असा सराव करण्यात आला नव्हता. १९९९ मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन विजय’दरम्यानही असा सराव करण्यात आला नव्हता. त्याबाबत सिन्हा सांगतात, “मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि आम्हाला संध्याकाळी ७ वाजता सायरन वाजल्याचे ऐकू येत असे. म्हणजे आता लाईट बंद करायचे आहेत, असा त्याचा अर्थ होता. कधी कधी ऑल इंडिया रेडिओच्या पाटणा केंद्रावर घोषणा होत असत. सार्वजनिक सेवा घोषणापत्रांनी (पब्लिक सर्व्हिस अनाउन्समेंट) आम्हाला लाईट बंद करण्यास सांगितले जाई.” “मॉक ड्रिल भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सुरू झाले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याचे लेफ्टनंट जनरल ए. के. नियाझी यांनी ढाका येथे आत्मसमर्पणाच्या करारावर स्वाक्षरी केली आणि भारतासोबतचे युद्ध संपले. त्यावेळी पाकिस्तानने एकतर्फी युद्धबंदीची मागणी केली होती.”
“कदाचित आपल्यापैकी बहुतेकांनी फक्त चित्रात पाहिलं असेल की, ताजमहाल काळ्या कापडानं झाकला गेला होता. उत्तर प्रदेशातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या कानपूरला सर्वांत जास्त फटका बसू शकतो अशा अफवा होत्या. त्यात ताजमहाल झाकल्यानं खूप दहशत निर्माण झाली होती”, असे मौसमी रॉय यांनी सांगितले. १९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान ताजमहाल पहिल्यांदाच लपवण्यात आला होता. ब्रिटिशांना वाटलं की, जर्मन लुफ्टवाफे आणि जपानी लोकांच्या बॉम्बस्फोटांमध्ये हे स्मारक असुरक्षित असेल. त्यासाठी त्यांनी स्मारकावर बांबूचे सांगाडे तयार केले. १९६५ व १९७१ मध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध लढत असताना पुन्हा असेच करण्यात आले. त्यावेळी जीपीएस किंवा उपग्रह प्रतिमा असं तंत्रज्ञान नव्हतं. काळ्या कापडानं झाकलेला ताजमहाल हा बांबूच्या सांगाड्यासारखा दिसत होता,” असेही रॉय यांनी सांगितले. त्या काळी सायरन वाजले की, दिवे बंद होत आणि लोकांनी घराच्या खिडक्यांच्या काचाही काळ्या रंगानं रंगवल्या होत्या, अशी आठवण रॉय यांनी सांगितली.
निवृत्त सरकारी अधिकारी आर. के. शर्मा यांनीही या ड्रिलबाबतच्या आठवणी सांगितल्या. “खिडक्यांच्या काचा कागदानं झाकून ठेवल्या जात. जर तुम्ही बाहेर असाल आणि सायरन ऐकला, तर तुम्हाला जमिनीवर झोपून कान बंद करावे लागायचे. बऱ्याच भागात कार्यालये लवकर बंद केली जात; जेणेकरून लोक सूर्यास्तापूर्वी घरी पोहोचू शकत. त्यादरम्यान शाळा मात्र सुरळीत सुरू होत्या. मॉक ड्रिलदरम्यान तेव्हाच्या आणि आताच्या अनुभवांमध्ये सर्वांत मोठा फरक असेल तो म्हणजे संवादाचा, असे शर्मा यांनी सांगितले. आपण मोबाईल फोन आणि वायफाय कनेक्टिव्हिटीच्या युगात आहोत; मात्र त्या काळात ही माध्यमं नव्हती. त्यांनी अशीही आठवण सांगितली की, त्यांचे वडील शहर दंडाधिकारी होते. ते गस्त घालत आणि प्रत्येक जण मॉक ड्रिल प्रोटोकॉलचे पालन करीत आहे याची खात्री करीत असत. ते म्हणाले, “तुम्ही फक्त वाट पाहू शकता आणि आशा करू शकता की, तुमचे नशीब तुम्हाला जिवंत ठेवेल. कोण कुठे आहे हे कळण्याचा कोणताही मार्ग नव्हता. तुम्ही कॉल करू शकत नव्हता. मात्र, आता इतके सर्व्हर आहेत, संवादाचे अनेक पर्याय आहेत.”