भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. याआधीही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून आपली हजेरी लावली आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारतभेटीकडे फ्रान्स आणि भारत यांच्यातील संबंध आणखी दृढ करण्याची एक संधी म्हणून पाहिले गेले. याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या आघाड्यांवर भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध कसे आहेत? भारत आणि फ्रान्स यांच्यातील व्यापारी संबंध कसे आहेत? हे जाणून घेऊ.

जगभरातून भारतावर टीका होत असताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले

फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष जॅक चिरॅक १९९८ साली प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी, “मी, भारत आणि फ्रान्समधील संबंध आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने आलो आहे, असे म्हटले होते. त्याआधीही जॅक चिरॅक यांनी १९७६ साली भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून भारतात हजेरी लावली होती. १९७६ साली भारतात आणीबाणी लागू होती. त्या वेळी जगभरातून भारतावर टीका केली जात होती. तरीदेखील जॅक चिरॅक यांनी भारतात प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून येण्याची तयारी दाखवली होती.

Prithviraj Chavan, pm modi,
“..तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकांची ठरली असती”; पृथ्वीराज चव्हाणांचे पंतप्रधानांवर टीकास्र
What are the charges against Israel Netza Yehuda Battalion
यहुदी तालिबानʼवर अमेरिकाही नाराज… इस्रायलच्या नेत्झा यहुदा बटालियनवर कोणते आरोप आहेत?
lok sabha election 2024 level of promotion in Beed fell to caste of chief officers
बीडमधील प्रचाराचा स्तर प्रमुख अधिकाऱ्यांच्या जातीपर्यंत घसरला
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका

७५ व्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताची पहिली पसंती ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे होते. प्राधान्यक्रमावर दुसरे असल्याचे माहीत असूनही मॅक्रॉन यांनी भारताचे आमंत्रण स्वीकारले. त्यावरूनच भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध चांगले असल्याचे दिसून येते.

वेगवेगळ्या पातळ्यांवर दोन्ही देशांत सहकार्य

भारत आणि फ्रान्स या देशांत संरक्षण, आण्विक उर्जा, अंतराळ संशोधन, सुरक्षा अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर भागीदारी आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या वर्षी फ्रान्सने ‘बॅस्टिल डे’साठी पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. मोदींच्या या भेटीमध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यातील भागीदारीचे सर्वसमावेशक धोरण ठरवण्यात आले होते.

भारत-फ्रान्स यांच्यात कोणकोणत्या पातळीवर भागीदारी

संरक्षण : फ्रान्स आणि भारत यांच्यातील संरक्षण पातळीवरील संबंध फार जुने आहेत. अॅन्युअल डिफेन्स डायलॉग (संरक्षणमंत्री स्तर) आणि संरक्षण सहकार्यावरील उच्च समिती (सचिव स्तर) या दोन्हींतर्गत या दोन्ही देशांतील संरक्षणविषयक द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला जातो.

दोन्ही देशांकडून संयुक्तपणे संरक्षणविषयक सराव

भारताने आपल्या वायुदलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी फ्रान्सकडून राफेल ही लढाऊ विमाने खरेदी केली होती. राफेल विमानांकडे भारत-फ्रान्स यांच्यातील संरक्षणविषयक संबंधांचे एक उदाहरण म्हणून पाहता येईल. भारत आणि फ्रान्स या देशांकडून गेल्या काही वर्षांपासून संयुक्तपणे संरक्षणविषयक सराव केला जात आहे. या सरावात गेल्या काही वर्षांत वाढ झालेली आहे.

अंतराळ संशोधन : भारत आणि फ्रान्स यांच्यातील अंतराळ संशोधनातील सहकार्याचा इतिहास साधारण ५० वर्षे जुना आहे. इस्रो या भारताच्या; तर सीएनईएस या फ्रान्सच्या अशा दोन्ही अंतराळ संशोधन संस्थांनी अंतराळ संशोधनाबाबत एकमेकांना बरेच सहकार्य केलेले आहे.

नागरी अणुऊर्जा सहकार्य : नरेंद्र मोदी यांनी जुलै २०२३ मध्ये पॅरिसला भेट दिली होती. यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर चर्चा करताना मॅक्रॉन आणि मोदी अशा दोघांनीही भारत आणि फ्रान्समध्ये नागरी अणुउर्जेत होत असलेल्या प्रगतीचे कौतुक केले होते. दोन्ही देशांनी स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स (SMR) आणि ॲडव्हान्स्ड मॉड्युलर रिॲक्टर्ससाठी (AMR) भागीदारी करण्यास सहमती दर्शविलेली आहे.

अर्थकारण : फ्रान्स हा भारतासाठी सर्वांत मोठ्या गुंतवणूकदार देशांपैकी एक आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात फ्रान्समधून ६५९.७७ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक झालेली आहे. तर, फ्रान्समध्ये साधारण ७० भारतीय कंपन्या असून, या कंपन्यांत साधारण आठ हजार कर्मचारी आहेत.

दोन्ही देशांतील व्यापार

२०२३-२४ (ऑगस्ट २०२३ पर्यंत) या आर्थिक वर्षात भारताने फ्रान्समध्ये साधारण ३.०६ अब्ज डॉलर्सची निर्यात केलेली आहे; तर फ्रान्समधून भारतात साधारण २.३५ अब्ज डॉलर्सची आयात झालेली आहे. भारतातून फ्रान्समध्ये निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रेडीमेड कपडे आदींचा समावेश आहे. तर, फ्रान्समधून भारतात विमान वाहतूक उत्पादने, वेगवेगळ्या मशीनचे भाग, इलेक्ट्रिकल उपकरणे, केमिकल उत्पादने आदींची आयात केली जाते.

डिजिटल : जुलै २०२३ मध्ये आयफेल टॉवरवरून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय लाँच करण्यात आले होते. फ्रान्समधील भारतीय गुंतवणूकदार, तसेच एनआरआय यांना भारताशी आर्थिक व्यवहार करणे सोपे व्हावे, हा यामागचा उद्देश होता.

फ्रान्समधील C-DAC आणि M/S Atos या महिती आणि तंत्रज्ञान सेवा देणाऱ्या, तसेच सल्लागार कंपन्यांनी भारतासाठी आतापर्यंत १४ सुपर कॉम्प्युटर्स तयार केलेले आहेत. त्यामध्ये ४.६ पेटाफ्लॉप प्रतिसेकंदाने काम करणाऱ्या परम सिद्धी या कॉम्प्युटरचाही समावेश आहे.

शिक्षण : शिक्षण क्षेत्रातही फ्रान्स आणि भारत हे दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतात. सध्या फ्रान्समध्ये साधारण १० हजार भारतीय विद्यार्थी असल्याचे सांगितले जाते. जून २०२२ मध्ये ‘इंडो-फ्रेंच कॅम्पस फॉर हेल्थ’ची सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दुहेरी पदवी मिळण्याची सोय झाली. भारतातील विद्यार्थ्याला फ्रान्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर त्याला तेथे आणखी दोन वर्षे राहण्याची परवानगी देणाऱ्या निर्णयाला ऑक्टोबर २०२२ मध्ये मुदतवाढ देण्यात आली होती. २०३० सालापर्यंत फ्रान्समध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ३० हजारांपर्यंत वाढविण्याचेही फ्रान्स सरकारने जुलै २०२३ मध्ये मान्य केले होते.

किती भारतीय फ्रान्समध्ये वास्तव्य करतात?

साधारण एक लाख १९ हजार भारतीय (एनआरआय यांच्यासह) फ्रान्समध्ये वास्तव्यास आहेत. त्यातील बहुसंख्य भारतीय हे पुद्दुचेरी, काराईकाल, यनम, माहे, चंदेरनागोर, तमिळनाडू, गुजरात, पंजाब राज्यांतील पूर्वीच्या फ्रेंच वसाहतींमधून आलेले आहेत.

पर्यटन

२०१९ मध्ये साधारण २.५ लाख फ्रेंच पर्यटक भारतात आले होते; तर साधारण सात लाख भारतीय पर्यटनासाठी फ्रान्समध्ये गेले आहेत. फ्रेंच नागरिकांसाठी राजस्थान ही पर्यटनासाठी पहिली पसंती राहिलेली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही सहकार्य

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरही या दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य केलेले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे यासाठी फ्रान्सने पुढाकार घेतला आहे. न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुपमध्ये (NSG) स्थान मिळविण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. भारताच्या या प्रयत्नाला फ्रान्सकडून पाठिंबा दिला जातो.