Sonam Raghuvanshi Case: विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीची निर्घृणतेने हत्या करण्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाली असून या सर्व घटना सर्वाधिक चर्चेत आहेत. अलीकडेच गाजलेलं प्रकरण म्हणजे राजा रघुवंशी. एखाद्या चित्रपटातील घटनेप्रमाणे सारे काही घडत गेले आणि तशीच त्या खुनाची उकलही होत गेली. रोमँटिक आणि पावसाळी हनिमूनची पार्श्वभूमी, अनैतिक संबंध, खुनाची सुपारी, मंगळसूत्र आणि टॅटू यांच्या माध्यमातून खुनाची उकल हे सर्व एखाद्या कथा-कादंबरीत घडावं, तसंच होतं. या कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे या गोष्टीतील नायिकाच खुनी म्हणून समोर आली. सध्या तिच्यावर नेमका काय आरोप आहे, याला फारसे महत्त्व उरलेलं नाही. कारण, चर्चा होते आहे ती, या प्रकरणातील अश्लील तपशीलाचीच.
MBA चं स्वप्न पाहणाऱ्या अवघ्या २४ वर्षांच्या सोनम रघुवंशी नावाच्या नवविवाहितेने क्रूर कट रचून आपल्या पतीला यमसदनी पोहोचवलं. सोनम ही काही पतीचा खून करणारी पहिलीच पत्नी नाही. अलीकडच्या काळात पतीला विष देणाऱ्या, गळा चिरणाऱ्या, दगडाने ठेचणाऱ्या किंवा पुलावरून खाली फेकणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील राधिका लोखंडेने तर लग्नाच्या १५ व्या दिवशीच नवऱ्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने प्रहार केला. तर, काहींनी वर्षानुवर्षे वाट पाहिली. संगीता देवी प्रकरणात तिने नवऱ्याला प्रसादातून विष दिलं आणि प्रियकराबरोबर संगनमत करून पुलावरून त्याला खाली फेकलं.
पती, पत्नी और वो
म्हणूनच प्रश्न पडतो की, आदर्श भारतीय सुना इतक्या हिंसक का होत आहेत? हे आताच घडतं आहे की, या घटनांची दखल आता मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे? नक्की काय घडत आहे. भारतीय स्त्री तिच्या पारंपरिक प्रतिमेला छेद जाणारी ठरत असल्याने या बातम्यांनी समाज मन सुन्न होत आहे असं म्हणावं लागेल का?
नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोकडे (NCRB) पतीची पत्नीकडून किंवा पत्नीची पतीकडून होणारी हत्या याबाबत विशिष्ट डेटा उपलब्ध नाही. मात्र लक्षात येणारा मुद्दा म्हणजे, भारतात प्रॉपर्टीच्या वादांपेक्षा प्रेम, लग्न आणि हुंड्याच्या कारणांवरून अधिक खून होतात. १ मार्च ते १२ जून २०२५ या काळात पती-पत्नी खुनाच्या ६६ प्रकरणांची अधिकृत नोंद आहे. त्यापैकी ४७ प्रकरणांमध्ये नवऱ्याने आपल्या बायकोचा खून केला आहे. यात चाकूने भोसकणे, गळा कापणे, डोके फोडणे अशा क्रूर पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. खुनासाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांमध्ये भांडी, लाटणं, प्रेशर कुकर यांसारख्या घरातील वस्तूंचा समावेश आहे. या हत्या प्रामुख्याने कौटुंबिक वाद, घरगुती हिंसाचार, व्यसनाधीनता आणि बहुतेक वेळा संशयित किंवा प्रत्यक्ष व्यभिचार यामुळे घडतात. १९ प्रकरणांमध्ये महिलांनी आपल्या पतीचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे. त्यातील बहुतांश प्रकरणं लक्षवेधी आहेत.
हनीमून ते हत्या; नवऱ्याचा खून करण्यासाठी बायको का प्रवृत्त होते?
राजा रघुवंशी हत्याकांडानंतर ‘रक्ताला चटावलेल्या बायका’ या मथळ्याखाली प्रसार माध्यमांनी गदारोळ घातला. अशा घटनांचं बारकाईने विश्लेषण केल्यास त्या घटनांमागील गुंतागुंतीचं वास्तव आणि मानसिक संघर्ष उलगडतो. मेघालय प्रकरणामुळे इथे मूळ प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे, एखाद्या स्त्रीला आपल्या कुटुंबाला नकार देण्यापेक्षा खून करणं सोपं का वाटतं? ही अत्यंत वेदनादायक स्थिती आहे. एकुणातच समाजात अशा प्रकरणांच्या बाबतीत दुटप्पी भूमिका दिसून येते. पुरुषांकडून होणाऱ्या हिंसाचाराबद्दल समाज फारसा गांभीर्याने पाहत नाही. परंतु, एखाद्या बाईने गुन्हा केला तर त्याकडे अभूतपूर्व म्हणून पाहिलं जातं, असं सामाजिक कार्यकर्ते आनंद पवार यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले.

अनेक प्रकरणांमध्ये ‘तिसरी व्यक्ती’ म्हणजे पत्नीचा प्रियकर गुन्ह्यात सहभागी असल्याचं दिसतं. पुरुषांकडून झालेल्या अनेक खून प्रकरणांमध्ये भावनिक आवेग दिसून येतो, तर स्त्रिया बहुतांश वेळा ‘पूर्वनियोजित’ खून करतात, असं मानसोपचारतज्ञ डॉ. ज्योती कपूर सांगतात. आर्थिक गरज, नात्यातून सुटका किंवा दुसऱ्या नात्याची आस या कारणांमुळे पतीचा खून करण्याचं टोकाचं पाऊल पत्नी उचलते. एखाद्या नात्यात अडकल्याची भावना निर्माण होते, त्यावेळेस त्या नात्यातून कुठल्याही पद्धतीने बाहेर पडण्याचा मार्ग अवलंबला जातो. दुसऱ्या व्यक्तीवर असलेल्या अवास्तव अवलंबित्वामुळे व्यक्ती भावनिकदृष्या वाहवत जाते, तिला समोरच्या माणसाचा जीवही गौण वाटतो, असं डॉ. कपूर सांगतात. मेरठच्या मुस्कान रस्तोगी प्रकरणात हेच दिसून आलं. मुस्कानने आपल्या प्रियकराबरोबर मिळून नवऱ्याच्या मृतदेहाचे तुकडे करून एका निळ्या ड्रममध्ये भरून त्यावर सिमेंट ओतलं होतं. आता ती तुरुंगात कायद्याचं शिक्षण घेण्याची तयारी करत आहे.
सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी बी. जी. शेलताण यांचं म्हणणं आहे की, अशा प्रकरणात ‘तिसऱ्या व्यक्ती’कडून नेहमीच आश्वासन दिलं जातं. काही होणार नाही, अशी शाश्वती दिली जाते. हे खोटं सुरक्षा कवच गुन्हेगारांच्या डोक्यात दीर्घकालीन परिणामांचा विचारच येऊ देत नाही.
मीरा चढ्ढा बोरवणकर, पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, विवाहानंतरच्या खुनामागचं नेहमीचं कारण म्हणजे व्यभिचार (infidelity). परंतु, ज्या नात्यांना नाव नाही अशा ‘live-in’ संबंधांमध्ये अनेक वेळा परिस्थिती हाताळता न आल्यामुळे खून होतात. अनेक प्रसंगांमध्ये पार्टनर लग्नासाठी आग्रह धरतो. परंतु, कुटुंब-समाज त्यासाठी तयार नसते. यातूनच प्रियकर किंवा प्रेयसीची मजल खून करण्यापर्यंत जाते. महिला खुन्यांची संख्या वाढते आहे का, असा प्रश्न विचारल्यावर त्या स्पष्ट करतात, “अजूनही हे प्रकार दुर्मीळ आहेत, त्यामुळेच माध्यमांना ते विशेष आकर्षित करतात.”
‘एजंट्स ऑफ इश्क’च्या संस्थापिका आणि चित्रपट निर्माती परोमिता व्होरा एक मुद्दा उपस्थित करतात, “लोक असा विचार का करत नाहीत की पळून जावं? लग्न करावं किंवा घरच्यांच्या विरोधात उभं रहावं? खून करायची गरजच काय?” या कथा फक्त ‘क्राइम न्यूज’ नसून, त्या प्रेम, दबाव, हिंसा आणि समाजाच्या अपयशी व्यवस्थेचाच पुरावा आहेत.
एका स्त्रीला मोकळेपणाने निर्णय घेणं इतकं कठीण का वाटतं?
या संदर्भात उत्तर देताना ‘एजंट्स ऑफ इश्क’च्या संस्थापिका परोमिता व्होरा म्हणतात, ‘आपण एक असा समाज तयार केलाय, जिथे व्यक्ती सामाजिक चौकटीबाहेर आपली ओळख तयार करू शकत नाही. विशेषतः स्त्रियांना प्रेमासारख्या विषयात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसते. कुटुंबातील अत्याचार, दबाव आणि भीती असते. परोमिता व्होरा पुढे म्हणतात, सोनमचं उदाहरणही वेगळं नाही. ती राजा रघुवंशी बरोबर लग्न करण्यास इच्छुक नव्हती. तिने तिच्या कुटुंबाला सांगितले होते की, या लग्नाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.
ऑड्री डिमेलो या ‘मैत्री’ संस्थेच्या संचालिका आहेत. ही संस्था कौटुंबिक हिंसाचारातून वाचलेल्या महिलांना कायदेशीर मदत करते. डिमेलो सांगतात की, एखाद्या स्त्रीने खून केला तर तिला कायदेशीर शिक्षेला सामोरे जावेच लागेल. परंतु, तिच्या निर्णयामागचे सामाजिक आणि मानसिक कारणही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.” मेघालय प्रकरणाबाबतही त्या म्हणतात, “एका स्त्रीला आपल्या कुटुंबाला ‘नाही’ म्हणण्यापेक्षा खून करणं सोपं वाटत असेल, तर ही अतिशय दु:खद परिस्थिती आहे.”
आनंद पवार हे पुण्यातील सम्यक या लिंगाधारित हिंसाचारविरोधी काम करणाऱ्या संस्थेचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी सांगितले की, पुरुषांच्या हिंसाचारामागे बहुतांशवेळा अहंकार, ताबा किंवा हक्क गमावल्याची भावना असते तर, स्त्रियांसाठी वेगळं होण्याचा पर्याय जिथे उपलब्धच नसतो, तिथे त्यांना हिंसाचाराशिवाय दुसरा मार्गच नाही अशी भावना निर्माण होते.
अॅड. सरिका जयंकोचर सांगतात, घटस्फोटाची प्रक्रिया सोपी नसल्यामुळे अनेकदा स्त्रिया खूप काळ मानसिक संघर्षात राहतात. “म्युच्युअल कन्सेंटमध्ये घटस्फोट सहज होतो, पण एकतर्फी किंवा ‘कॉन्टेस्टेड’ डिव्होर्स साठी खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे काही स्त्रिया टोकाचे निर्णय घेतात.”
व्हिक्टिम ते व्हॅम्प
अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये समाजाकडून येणारी प्रतिक्रिया अनेकदा स्त्रियांच्या भूमिकांबद्दल पूर्वग्रहांना खतपाणी घालते. रघुवंशी प्रकरणातही ‘बेवफा सोनम’चे मीम्स, ‘प्रो-वुमन लॉज’वर टीका आणि काही पुरुषांनी लग्न करण्याविषयी भीती व्यक्त केली, या प्रतिक्रिया ठराविक साच्यात बसणाऱ्या असतात.
बंगळुरूच्या संशोधक आणि पत्रकार लक्ष्मी मूर्ती सांगतात, “माध्यमं स्त्रियांना कधी बळी, तर कधी खलनायिका म्हणून दाखवतात. नवऱ्याचा खून करणारी बायको ‘व्हॅम्प’च्या भूमिकेत अगदी सहज बसते.” पण समाजाची ही प्रतिक्रिया फारशी बदलणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
पुरुषांकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या बाबतीत समाज मूग गिळून गप्प बसतो. पण जेव्हा एखादी स्त्री असं कृत्य करते, तेव्हा ते अचंबित करणारं आणि तपासलं जाणारं ठरतं. स्त्रियांनी असं वागणं अनैतिक असल्याचंच मानलं जात… एकुणात महिलांकडे पाहण्याचा समाजाचा हा दृष्टिकोनच अशा घटनांना कारणीभूत ठरतो आहे, असे लक्षात येते.