Google Gemini Nano AI गुगल जेमिनीचा ‘नॅनो बनाना’ 3D फिगरिनचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. इन्स्टावर सध्या सरासरी दर तिसरी व्यक्ती आपले रेट्रो लूकमधील फोटो शेअर करताना दिसत आहे. हे फोटो गुगल नॅनो बनाना ट्रेंड अंतर्गत तयार केले जात आहेत. या ट्रेंडला ‘घिब्ली’ ट्रेंडपेक्षाही अधिक लोकप्रियता मिळाली आहे. मात्र, एआय (AI) प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक फोटो अपलोड करण्याच्या धोक्यांबाबत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.
आकर्षक फिगरिन आणि रेट्रो-शैलीतील पोर्ट्रेट्सने लाखो लोकांना आकर्षित केले असले, तरी यामुळे डिजिटल गोपनीयतेची, विशेषतः आपला चेहरा ज्यात स्पष्ट दिसतो अशा फोटोंबद्दलची चिंता वाढत आहे. हा ट्रेंड हेच दर्शवतो की, व्हायरल कंटेंटच्या मागे लागून वापरकर्ते त्याचे परिणाम पूर्णपणे न समजताच आपली वैयक्तिक माहिती सहजपणे ऑनलाइन शेअर करत आहेत. सायबरतज्ज्ञ याबाबत काय इशारा देत आहेत? सविस्तर समजून घेऊयात…
महिलेचा धक्कादायक अनुभव
एआयने तयार केलेल्या इमेजमध्ये एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याला अनपेक्षित आणि धक्कादायक बदल दिसून आला. @jhalakbhawani नावाच्या एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने जेमिनीवर ‘एआय साडी पोर्ट्रेट ट्रेंड’ वापरताना एक विचित्र अनुभव शेअर केला. तिने लिहिले, “इन्स्टाग्रामवर एक ट्रेंड व्हायरल होत आहे, जिथे तुम्ही तुमचा फोटो जेमिनीवर अपलोड करता आणि जेमिनी त्याला साडीतील फोटोमध्ये बदलते. काल रात्री मी स्वतः हा ट्रेंड वापरून पाहिला आणि मला एक खूप अस्वस्थ करणारी गोष्ट आढळली.” ती म्हणाली, “मला एक विचित्र गोष्ट लक्षात आली. तयार झालेल्या फोटोमध्ये माझ्या डाव्या हातावर तीळ (mole) होता, जो माझ्या खऱ्या जीवनातदेखील आहे. मात्र, मी अपलोड केलेल्या मूळ फोटोमध्ये तो तीळ नव्हता. जेमिनीला हे कसं कळलं? हे खूपच भीतीदायक आणि विचित्र आहे. कृपया सावध रहा,” असेही ती म्हणाली.
डिजिटल सुरक्षिततेबाबत सायबरसुरक्षा तज्ज्ञांनी काय इशारा दिला?
‘डीपस्ट्रॅट’ (DeepStrat) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सायबरसुरक्षा तज्ज्ञ सैकात दत्ता यांनी स्पष्ट केले, “जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा स्पष्ट दिसत असलेला फोटो अपलोड करता, तेव्हा ओळख व्यवस्थापन म्हणजेच आयडेंटीटी मॅनेजमेंटकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तो प्लॅटफॉर्म तुमच्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी, विश्लेषणासाठी (Analytics) तो माहिती साठवू शकतो. जरी माहिती अनामित केली (Anonymised) असली, तरी तुमचा डेटा तुम्ही न इच्छिलेल्या पद्धतीने वापरला जाण्याची शक्यता असते. हा डेटा जर सिस्टीम किंवा इतर जोडलेल्या सेवांमध्ये हॅक झाला, तर तुमचे फोटो ऑनलाइन लीक होऊ शकतात.” दत्ता पुढे म्हणाले, “उदाहरणार्थ, लीक झालेल्या डेटावरून शेकडो बनावट कागदपत्रे तयार केली जाऊ शकतात, त्यामुळे मनी लॉंडरिंगसारखे गंभीर गुन्हेदेखील होऊ शकतात.”
अशीच चिंता आणखी एका सायबरसुरक्षा तज्ज्ञाने व्यक्त केली. डिजिटल साक्षरता समर्थक तसेच ‘एंड नाऊ फाउंडेशन’ (End Now Foundation) चे संस्थापक आणि सीईओ डॉ. अनिल रचमल्ला म्हणाले, “डिजिटल सुरक्षितता आणि एआयच्या नैतिक वापरासाठी ही एक धोक्याची सूचना आहे. ‘नॅनो बनाना एआय’ इमेज निर्मितीसारखे ट्रेंड सौंदर्याबद्दलच्या सामाजिक धारणा बदलत आहेत. एकदा वापरकर्ते स्वतःला एआयच्या दृष्टिकोनातून पाहू लागले, की त्यांना वास्तवाशी जुळवून घेणे कठीण होते. यामुळे त्यांच्या मनात चुकीचे प्रश्न निर्माण होतात.”

ते पुढे म्हणाले, “गोपनीयता ही आणखी एक मोठी चिंता आहे. ‘मायफेस ॲप’ (MyFace App) हे याचे उत्तम उदाहरण आहे, जिथे वापरकर्त्यांचा डेटा संमतीशिवाय गैरवापरला गेला. ‘डीपफेक्स’ (Deepfakes) मध्येदेखील असेच धोके आहेत, जिथे डिजिटल अवतारांचा वापर लोकांना फसवण्यासाठी किंवा बनावट ओळख (synthetic identities) तयार करण्यासाठी केला जातो. वापरकर्त्यांनी डिजिटलदृष्ट्या जागरूक राहणे महत्त्वाचे आहे,” असेही ते म्हणाले.
आयपीएस अधिकाऱ्याचा इशारा
या ट्रेंडच्या लोकप्रियतेमुळे सायबरसुरक्षेची चिंता वाढली आहे. आयपीएस अधिकारी व्ही. सी. सज्जनार यांनी सार्वजनिक सूचना जारी करून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरील त्यांच्या संदेशात त्यांनी इशारा दिला की, बनावट ॲप्स आणि वेबसाइट्स जेमिनीच्या एडिटिंग टूलची नक्कल करून वापरकर्त्यांना फोटो आणि वैयक्तिक माहिती अपलोड करण्यासाठी आकर्षित करत आहेत. सज्जनार यांनी लिहिले, “इंटरनेटवरील ट्रेंडिंग विषयांबद्दल सावध रहा! ‘नॅनो बनाना’च्या या मोहात अडकणे धोकादायक असू शकते. जर तुम्ही ऑनलाइन वैयक्तिक माहिती शेअर केली, तर फसवणूक नक्कीच होणार. फक्त एका क्लिकने तुमच्या बँक खात्यातील पैसे गुन्हेगारांच्या हातात जाऊ शकतात.”
ते पुढे म्हणाले की, एकदा वैयक्तिक डेटा बनावट प्लॅटफॉर्मवर पोहोचला की तो परत मिळवणे अत्यंत कठीण आहे. त्यांनी ‘डिजिटल जबाबदारी’वर भर देत सल्लादेखील दिला. ते म्हणाले, “तुमचा डेटा, तुमचे पैसे – तुमची जबाबदारी.”
व्हायरल नॅनो बनाना एआय इमेज ट्रेंड
हा ट्रेंड 3D फिगरिनपासून विकसित झाला आहे, त्यात आता विंटेज, पिंटरेस्ट-शैलीतील पोर्ट्रेट्सचादेखील समावेश आहे. व्हिंटेज साडी एआय-जनरेटेड पोर्ट्रेट्स फीचर महिला वापरकर्त्याच्या एखादा फोटो वापरून आकर्षक असा पारंपारिक साडी घातलेला सिनेमॅटिक किंवा व्हिंटेज पार्श्वभूमी असलेला फोटो तयार करून देते. महिला वापरकर्त्यांकडून या फीचरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. एआय साधनांमुळे इमेज तयार करणे सोपे झाल्याने, दररोज लाखो चेहरे यावर अपलोड केले जात आहेत, त्यामुळे मूळ प्लॅटफॉर्म असुरक्षित असल्यास गैरवापर होण्याची शक्यता वाढत आहे.
