मानवाची उत्क्रांती वानरांसारख्या पूर्वजांपासून झाली. मानवी उत्क्रांतीच्या कालखंडात निरुपयोगी गोष्टी नष्ट झाल्या. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे शेपूट आणि अंगावरील केस. मानवी उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यात माकड सदृश्य मानवाच्या संपूर्ण अंगावर असलेल्या केसांच्या जाडसर आवरणाने सभोवतालच्या थंडी, ऊन, वाऱ्यापासून त्याचे संरक्षण केले होते. परंतु, ज्यावेळी मानवाच्या अंगावरील अधिक लांबीच्या केसांचे मोठे आवरण नष्ट झाले, त्यावेळी मात्र मानवाला संरक्षणाच्या हेतूने अंग झाकण्याची गरज भासली. आणि सुरुवातीस वल्कले, नंतर प्राण्यांच्या चामड्यांपासून केलेली आच्छादने अस्तित्त्वात आली. पण ही अंग झाकणारी आच्छदने नेमकी केव्हा अस्तित्त्वात आली? आणि त्यांचा शोध कसा घेणार? हा शोध संशोधकांनी उवांच्या माध्यमातून घेतला; ते नवे संशोधन नेमके काय सांगते याचा घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानवाने अंग झाकण्यास कधी सुरुवात केली?

मानवाने अंग झाकण्यास नेमकी कधी सुरुवात केली, हा एक अवघड प्रश्न आहे. मानवाने हत्यारे तयार करण्यासाठी वापरलेला दगड, हाडे आणि इतर कठीण पदार्थ वर्षानुवर्षे टिकले. परंतु, त्याने सुरुवातीच्या काळात अंग झाकण्यासाठी वापरलेली आच्छादने टिकणे शक्यच नव्हते. त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तराचा शोध कातडे कमावणे, शिवणकाम, त्यासाठी वापरलेल्या सुया यांसारख्या वस्तूंच्या अवशेषांच्या माध्यमातून घ्यावा लागतो. इतकेच नाही तर नव्याने मांडलेल्या संशोधनात चक्क उवांच्या माध्यमातून मानवाने अंग झाकण्यास केव्हा सुरुवात केली त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अधिक वाचा: किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाला नाव देण्यात आलेले तीर्थंकर पार्श्वनाथ कोण आहेत?

हे संशोधन कोणी केले?

फ्लोरिडा विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ डेव्हिड रीड यांनी ‘लाइव्ह सायन्स’ला दिलेल्या माहितीनुसार, “त्यांनी उवांच्या उत्क्रांतीच्या इतिहासात कोणते बदल घडून आले, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. या बदलांचा आणि मानवाच्या शरीरावरील केसगळती यांचा अनोन्यसंबंध असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे उवांचा आणि मानवाने वापरलेल्या पहिल्या आच्छादनांचा संबंध असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. उवांची उत्क्रांती समजून घेताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे उवा त्यांच्या अधिवासाविषयी फार जागरूक असतात; मानवी डोक्यावरील केसाप्रमाणे त्या मानवी शरीराच्या इतर भागांची निवड वास्तव्यासाठी करत नाहीत. परंतु मानवी शरीरावरील फर (लांबीला अधिक असलेल्या केसांचे मोठे आवरण) नामशेष होण्यापूर्वी, उवा कदाचित मानवाच्या संपूर्ण शरीरावर वावरत होत्या. आनुवंशशास्त्रातील अभ्यासानुसार सुमारे १.२ दशलक्ष वर्षांपूर्वी मानवाने शरीरावरील केस (फर) गमावले.

मानवाने नियमितपणे शरीर झाकण्यास कधी सुरुवात केली?

काळाच्या ओघात उवांचा आणखी एक प्रकार मानवी आच्छादनांमध्ये वास्तव करण्यासाठी विकसित झाला. हा पोशाख प्राण्यांच्या फरपासून तयार करण्यात येत असे. उवा या फरवरील विविध प्रकारच्या तंतूंवर जगू शकतात. “पोशाखात असणारे तंतू उवांना दिवसातून सरासरी एक वेळ खाणं उपलब्ध करतात. यामुळे उवांना कपड्यात राहणे सायीचे होते”, असे रीड यांनी नमूद केले आहे. इतकेच नाही तर उवांना लागणारे पोषक वातावरण या पोशाखामध्ये होते. आणि त्याच बरोबरीने हा पोशाख मानवी शरीरावर चढवला जात असल्याने मानवी त्वचेवर वावरण्याचे सुख आणि त्यातून मुबलक खाद्य आपसूकच उपलब्ध होत असे. पोशाखावर आढळणाऱ्या उवा आणि डोक्यावरील केसांमध्ये आढळणाऱ्या उवा यांच्या अस्तित्त्वातील वेगळेपणावर आधारित रीड आणि त्यांच्या टीमने आधुनिक मानवांनी साधारण १७०,००० वर्षांपूर्वी, दुसऱ्या ते शेवटच्या हिमयुगात नियमितपणे साधे कपडे घालण्यास सुरुवात केली, असा निष्कर्ष काढला आहे.

मानवाच्या पोशाखाचे हे पुरावे मूलतः होमिसन्सशी संबंधित आहेत. होमिसन्स हा आधुनिक मानवाचा सर्वात जवळचा नातेवाईक आहे. किंबहुना त्यापूर्वीच मानवाच्या पूर्वजांनी कपडे वापरण्यास सुरुवात केली असावी असे अभ्यासक मानतात, कारण जर्मनीतील शॉनिंगेनच्या पॅलेओलिथिक स्थळावर आढळलेल्या अस्वलाच्या हाडांवरच्या खुणा त्याच्या निदर्शक आहेत. होमो हायडेलबर्गेन्सिस याने सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी अस्वलाची कातडी स्वतःला उबदार ठेवण्यासाठी वापरल्याचे लक्षात येते, असे तुबिंगेन विद्यापीठातील इव्हो व्हेर्हेजेन (२०२३) यांनी आपल्या संशोधनात मांडले आहे. “एखाद्या प्राण्याची कातडी काढताना कापले गेल्याच्या खुणा फासळ्यांवर, कवटीवर, हात आणि पायांवर असतात. आणि नेमके तेच आम्हाला शॉनिंगेनमध्ये आढळले,” असे व्हेर्हिजेन यांनी ‘लाइव्ह सायन्स’ला सांगितले. “त्यानंतर आम्ही याच कालखंडाशी संबंधित इतर स्थळांशी तुलना केली आणि त्या स्थळांवर सापडलेल्या अस्वलाच्या हातांवर- पायांवर आणि कवटीवर कापल्याची चिन्हे सापडली. त्यामुळे या काळात लोक अस्वलाचे कातडे अंग झाकण्यासाठी वापरत होते असे दिसते.”

कातडी कमावण्याचा पुरावा हा पोशाख वापराचा प्राचीन पुरावा असेलच असे नाही; होमिनिन्स निवारा तयार (तंबू, किंवा तत्सम) करण्यासाठी या कातड्यांचा वापर करत असतील. परंतु तापमान सुमारे ३.६ अंश फॅरेनहाइट (२ अंश सेल्सिअस) थंड असल्याने, त्या वेळी, लोक कदाचित स्वतःला उबदार ठेवण्यासाठी या कातड्यांचा वापर करत असावेत, असे व्हेर्हेजेन म्हणाले. इतक्या कडाक्याच्या थंडीतही अन्न मिळविणे ही गरज होती, त्यामुळे यांसारख्या जाड, फर असणाऱ्या पोशाखाची मानवाला गरज भासली असावी असे व्हेर्हेजेन यांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा: अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?

असे असले तरी प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात जर तीन लाख वर्षांपूर्वी मानवाने पोशाख वापरायला सुरुवात केली आणि पोशाखावरील उवांचे पुरावे एक लाख ७० हजार वर्षे एवढे प्राचीन आहेत. तर तीन लाख ते एक लाख ७० हजार या कालखंडादरम्यान नक्की काय झाले हेही पाहणे गरजेचे ठरते.

सिडनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ ह्युमॅनिटीजमधील इयान गिलिगन यांनी ‘लाइव्ह सायन्स’ला सांगितले की, उवांचे पुरावे माणसाने ज्या कालखंडात नियमित पोशाख वापरायला सुरुवात केली तेवढ्यापुरताच गृहीत धरता येऊ शकतात. कारण उवांना मानवी त्वचेवर मिळणारा नियमित आहार लागतो. म्हणून जर एखाद्याने एक दिवस पोशाख घातला आणि नंतर तो आणखी आठवडाभर वापरला नाही, तर उवा टिकणार नाहीत. उदाहरणार्थ, ३२,००० ते १२,००० वर्षांपूर्वी – शेवटच्या हिमयुगाच्या अखेरीपर्यंत – टास्मानियामधील आदिवासी लोक कदाचित थंडीपासून संरक्षणासाठी गुहेत परतले. त्यांनीही पोशाख वापरले होते. परंतु नंतर, हवामान उष्ण झाले आणि त्यांनी कपडे घालणे बंद केले. त्या जागी त्यांनी अंग रंगवायला सुरुवात केली, त्यांना पोशाखाची गरज भासली नाही. त्यामुळे केवळ उवांच्या अस्तित्त्वावर मानवाने पोषाख वापरण्यास केव्हा सुरुवात केली, हे सांगणे कठीण आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lice reveal ancient history of human dress what does the new research say svs
First published on: 30-03-2024 at 15:36 IST