7,100-year-old skeleton from China’s Yunnan: ऐकावं ते नवलच असं म्हणतात ते उगीच नाही आणि त्यातही चीनसारख्या देशाची गोष्ट असेल तर विचारूच नका. चीन कशाची नवनिर्मिती करेल आणि त्यांच्या इतिहासात नेमकं दडलंय काय याचा काही नेम नाही. चीनमधील पुरातत्त्व अभ्यासकांनी चक्क ७१०० वर्षं प्राचीन भूत वंशाचा शोध लावला आहे. पुरातत्त्व अभ्यासकांनी एका स्त्री भुताच्या सांगाड्याचा शोध लावला आहे. चीनमधील (Xingyi) शिंगयी या स्थळावर सुरु असलेल्या उत्खननातून हा सांगाडा समोर आला आहे. या भूत वंशीय बाईची ओळख शिंगयी ईएन (Xingyi_EN) अशी करून देण्यात आली आहे. तिच्या आगळ्या वेगळ्या डीएनेमुळे ती एका विशिष्ट मानव समुदायाचं प्रतिनिधित्त्व करते. या समुदायाचा संबंध हा आधुनिक तिबेटीयन वंशाशी होता. परंतु, या शोधाचा संबंध भारत-चीन राजकीय तणावाशी देखील आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.
शिंगयी या पुरातत्त्वीय स्थळाचे महत्त्व (Xingyi archaeological site)
शिंगयी (Xingyi) हे चीनच्या मध्य युनान प्रांतातील महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ आहे. या स्थळावर सापडलेल्या अवशेषांच्या माध्यमातून एक प्राचीन मानवसमूह उजेडात आला आहे. येथे सापडलेल्या समाधीस्थळांचा कालावधी नवाश्मयुग (Neolithic) ते कांस्ययुग (Bronze Age) यामधील आहे. या समाधींमध्ये सापडलेल्या सांगाड्यांचे जैव-आनुवंशिक विश्लेषण करण्यात आले आहे. या विश्लेषणातून पूर्व आशियाई लोकसमूहांमध्ये यापूर्वी न आढळलेल्या वंशाचा शोध लागला आहे. विशेष म्हणजे, या मानववंशाचा थेट संबंध ऑस्ट्रोएशियाटिक भाषा बोलणाऱ्या भारतातील आधुनिक संथाळ, मुंडा तसेच आग्नेय आशियातील ख्मेर आणि व्हिएतनामी समुदायांशी जोडला गेला आहे.
या संशोधनामुळे चीनच्या रेड रिव्हर खोऱ्यात विशेषतः युनान प्रांतातच ऑस्ट्रोएशियाटिक भाषिक लोकांचा जन्म झाला असावा असे सूचित करण्यात आले आहे. ही नवी माहिती आधीच्या सिद्धांताला आव्हान देणारी ठरली आहे. यापूर्वी ऑस्ट्रोएशियाटिक भाषांचा प्रसार आग्नेय आशियातून झाला असा सिद्धांत मांडण्यात आला होता.
बाईच्या सांगाड्याला भूत वंश का मानलं गेलं आहे?
चिनी लोककथांमध्ये भूत वंशाचा उल्लेख आढळतो. Yan Guai म्हणजे दैवी आत्मा किंवा भुताचा सांगाडा असे संदर्भ चिनी लोककथांमध्ये येतात. यामागची संकल्पना मृत्यू नंतरच्या जगताची आहे. भारताप्रमाणे चीनमध्येही मृत्यूनंतरच्या संस्कारांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. त्याच श्रद्धा आणि संकल्पनांमध्ये एखाद्या मृत व्यक्तीला निरोप देताना योग्य विधी झाले नाहीत तर त्या व्यक्तीचा आत्मा पुढच्या गतीस जाण्यास नकार देतो, अशी श्रद्धा आहे. अशा आत्म्याचे चित्रण सांगाड्यांच्या रूपात केले जाते.
‘जर्नी टू द वेस्ट’ (Journey to the West) या प्रसिद्ध चिनी महाकाव्यातील बायगूजिंग (Baigujing) ही अशीच एक सांगाड्याच्या रूपातील राक्षसी आहे. तिचा पराभव सन वुकॉंग (Sun Wukong) याने केला होता. चीनच्या युनान प्रांतात सापडलेल्या ७,१०० वर्षं प्राचीन सांगाड्यांच्या डीएनए विश्लेषणातून अज्ञात मानववंशाचा शोध लागला आहे. त्यामुळे संशोधकांनी या वंशाला भूत वंश असे म्हटले आहे. Ghost Lineage किंवा भूत वंश म्हणजे अज्ञात किंवा ज्याची पूर्व नोंद नसलेला वंश. Xingyi_EN ही यापूर्वी ज्ञात नसलेल्या मानवी गटाच्या प्रत्यक्ष अस्तित्त्वाचे प्रतिनिधित्त्व करते.
संशोधनातून नेमकं काय समोर आलं आहे?
या संशोधनातून चीनच्या युनान प्रांतातील एका वंशाचा संबंध हा ऑस्ट्रोएशियाटिक भाषा बोलणाऱ्या समुदायांशी होता हे समोर आले आहे. दक्षिण आणि आग्नेय आशिया भागांमध्ये राहणाऱ्या समुदायांशी होता. या नव्या संशोधनामुळे युनान प्रांताला पूर्व आणि आग्नेय आशियाला जोडणारा ऐतिहासिक दुवा म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी नैऋत्य आशियातील १२७ मानवी जिनोमची चाचणी आणि परीक्षण करण्यात आले होते.
Genetic sequencing मधून नक्की काय समोर आलं?
या सांगाड्याच्या (शिंगयीईएन) रेडिओ कार्बन डेटिंगवरून त्याचा कालखंड हा ७१०० वर्ष प्राचीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंगयी ईएन हिची उपजीविका शिकारीवर अवलंबून असल्याचेही या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. Genetic sequencing मधून या स्त्रीचा संबंध मुख्य प्रवाहापासून अलिप्त असलेल्या समूहाशी असल्याचे स्पष्ट होते. त्यांचे नामकरण Basal Asian Xingyi lineage असे करण्यात आले आहे.
हा वंश ४०,००० वर्षांपूर्वी इतर समकालीन मानवी गटांपासून वेगळा झाला होता. तसेच हा वंश इतर मुख्य प्रवाही समाजापासून गेले हजारो वर्ष वेगळाच राहिला. या भूत वंशाचा डीएनए निअँडरथल्स किंवा डेनिसोव्हन्सच्या डीएनएशी जुळत नाही. परंतु नंतरच्या काही आधुनिक तिबेटी लोकांच्या वंशावर त्याचा प्रभाव पडल्याचे दिसते. यापूर्वी युनान प्रांतात संशोधकांना सापडलेल्या बहुतेक सर्व सांगाड्यांचा कालखंड हा १४०० ते ७१५० इतका प्राचीन आहे आणि त्यांचा संबंध आधुनिक तिबेटियन लोकांशी असल्याचे संशोधनातून सूचित केले आहे.
चीनच भूत आणि भारताचा संबंध
या संशोधनामुळे चीनच्या युनान परिसरातील अश्मयुगीन लोकसंख्येविषयी जाणून घेण्यास मदत होणार असल्याचे अभ्यासक मानतात. शिवाय यापूर्वीच्या संशोधनात तिबेटियन लोकांचे मूळ ईशान्य भागात असल्याचे नमूद करण्यात आले होते. या नव्या संशोधनामुळे ते मूळ चीनच्या युनान प्रांतात असल्याचे सूचित करण्यात आले आहे. हे पुरातत्त्वीय संशोधन असले तरी चीनने या संशोधनातून ऑस्ट्रोएशियाटिक भाषा बोलणाऱ्या समुदायांचे मूळ थेट चीनमध्ये दाखवले आहे. म्हणजेच भारताच्या पूर्व आणि नैऋत्येकडील राज्यातील लोकांचे मूळ हे चीनच्या युनान प्रांतात आहे. सध्या चीनचा भारताच्या अरुणाचल प्रदेशसह आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या प्रदेशांवर डोळा आहे. अलीकडेच बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी म्हटले होते की, “भारतातील सात ईशान्य राज्ये अजूनही भूपरिवेष्टित आहेत. त्यांच्याकडे महासागरापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही. या संपूर्ण प्रदेशासाठी बांगलादेश महासागराचा एकमेव रक्षक आहे. त्यामुळे हा चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार होऊ शकतो.” त्यामुळेच चीनचे हे भूत भारताच्या मानगुटीवर तर बसणार नाही ना हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणारं आहे.