पाकिस्तानला सध्या अनेक आघाड्यांवर संघर्ष करावा लागतोय. येथील अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. दुसरीकडे येथे राजकीय अस्थितरता निर्माण झालेली असून महागाईसारख्या समस्यांना हा देश तोंड देतोय. असे असतानाच आता पाकव्याप्त गिलगिट बाल्टिस्तान या प्रदेशातील लोक येथे रस्त्यावर उतरले आहेत. येथील नागरिक मागण्या मान्य न केल्यास आम्ही थेट कारगिलमध्ये जाऊ, असा इशारा देत आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानच्या नागरिकांनी हा पवित्रा घेतल्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रदेशात नेमके काय सुरू आहे? तेथील नागरिक कारगिलमध्ये जाण्याची भूमिका का घेत आहेत? यावर टाकलेली नजर…

गिलगिट बाल्टिस्तानमध्ये ठिकठिकाणी आंदोलन

गिलगिट बाल्टिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचे काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये पाकव्याप्त गिलगिट बाल्टिस्तानमध्ये वास्तव्यास असलेले नागरिक रस्त्यावर उतरले असून ते पाकिस्तान सरकार विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
israel iran war history
Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी

‘आम्ही सर्व दरवाजे तोडून कारगिलमध्ये जाऊ’

अशाच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत (व्हिडीओच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही) गिलगिट बाल्टिस्तान प्रदेशातील स्कार्डू येथील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले आहेत. जमलेले हे लोक पाकिस्तान सरकार विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. या व्हिडीओत तेथील एक नेता भाषण करताना ‘आम्ही सर्व दरवाजे तोडून कारगिलमध्ये जाऊ’, असे म्हणताना दिसत आहे. २५ ऑगस्ट रोजी असाच एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत गिलगिट-बाल्टिस्तानचे लोक जमा झालेले दिसत आहेत. या भागातील समाजसेवक वझीर हसनैन या लोकांना संबोधित करत आहेत. “आम्ही तुमच्या सिंध प्रांतात जाणार नाही, आम्ही तुमच्या पंजाब प्रांतातही जाणार नाही, आम्हाला तुमच्या देशात (पाकिस्तान) राहायचे नाही; कारगिलचा मार्ग खुला करा, आम्ही कारगिलला जाऊ,” असे हसनैन या व्हिडीओत म्हणत आहेत. याच व्हिडीओत ‘चलो चलो कारगिल’ अशी घोषणाबाजीदेखील ऐकायला मिळत आहे.

आंदोलनाचे नेमके कारण काय? मागणी काय?

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशात नागरिक आंदोलन करत आहेत. ईशनिंदेच्या आरोपाखाली शिया मुस्लिमांचे धर्मगुरू आगा बाकीर अल-हुसनैनी यांच्या विरोधात एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. स्कार्डू येथील उलेमा परिषदेच्या बैठकीत केलेल्या कथित विधानानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच कथित आरोपांना विरोध करत गिलगिट-बाल्टिस्तानचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

पाकिस्तानमधील ईशनिंदेचा कायदा काय आहे?

पाकिस्तानने गेल्या वर्षी ईशनिंदेसंदर्भातील कायद्यात काही बदल केले होते. या बदलांतर्गत हे कायदे अतिशय कठोर करण्यात आले होते. पाकिस्तानमधील काही नागरिक अशा कायद्यांचा विरोध करतात. कारण या कायद्यांच्या माध्यमातून तेथील अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जाते, याशिवाय मुस्लिमांच्याही बाबतीत या कायद्याचा अनेकदा गैरवापर होतो, असा आरोप केला जातो. ईशनिंदेच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये १९९० सालापासून आतापर्यंत ८५ लोकांची हत्या करण्यात आल्याचे म्हटले जाते.

“अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष पसरवला जातो”

याच ईशनिंदेच्या कायद्याबाबत पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या हक्कांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉयश्चे वेल्ले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पाकिस्तानमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे येथील सामाजिक संस्कृतीत धार्मिक द्वेष मोठ्या प्रमाणात दिसतो. शाळेत अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात हा द्वेष पेरला जातो. अनेक लोकांना संविधानाने त्यांना दिलेल्या मूलभूत हक्कांची माहिती नाही. मात्र, आपला सूड उगवण्यासाठी ईशनिंदा कायद्याचा वापर कसा करावा, याची त्यांना कल्पना असते,” असे वेल्ले यांनी सांगितले.

गिलगिट-बाल्टिस्तान नेहमी चर्चेत का असते?

गिलगिट-बाल्टिस्तान हा शिया मुस्लिमबहुल प्रदेश आहे. या प्रदेशाच्या पश्चिमेला अफगाणिस्तान, दक्षिणेला पाकव्याप्त काश्मीर आणि पूर्वेला जम्मू आणि काश्मीर आहे. भारत देश गिलगिट-बाल्टिस्तान हा प्रदेश आमचा आहे असे म्हणतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या राजाने भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गिलगिट-बाल्टिस्तान हा प्रदेश आमचा आहे. पाकिस्तानने या प्रदेशावर अवैध ताबा मिळवलेला आहे, असे भारताकडून म्हटले जाते.

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये शिया मुस्लिमांवर अत्याचार

गिलगिट आणि बाल्टिस्तानची संस्कृती ही भारतापेक्षा काहीशी वेगळी आहे. तसेच पाकने ताबा मिळवल्यामुळे या प्रदेशाचा भारताशी फारसा संबंध येत नाही. याआधी तेथील काही लोकांनी या प्रदेशाचे पाकव्याप्त काश्मीरमध्ये विलिनीकरण करावे, अशी मागणी केली होती. मात्र, या प्रदेशाचा पाकव्याप्त काश्मीरशी तसा थेट संबंध येत नाही. गेल्या काही वर्षांपासून ईशनिंदेसंदर्भातील कायदे आणि शिया मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारामुळे येथील लोकांची मानसिकता बदलत आहे. त्याचाच परिणाम म्हणून येथे लोक रस्त्यावर उतरले असून आम्हाला कारगिलमध्ये जायचे आहे, अशी मागणी करत आहेत.