Why is Gingee Fort So Important in Shivaji Maharaj’s History?: “शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेत किल्ल्यांचे स्थान हे केवळ लष्करी केंद्र म्हणून नव्हे, तर प्रशासन, संरक्षण आणि स्वाभिमानाचे प्रतीक म्हणूनही होते. महाराष्ट्राच्या विविध भागांत आणि दूरदक्षिणेतील तामिळनाडूपर्यंत मराठा साम्राज्याची किल्ल्यांच्या माध्यमांतून पायाभरणी झाली. हेच ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन युनेस्कोने ‘मराठा लष्करी लँडस्केप्स’ या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील १ अशा एकूण १२ किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. यात तामिळनाडूमधील ऐतिहासिक जिंजी किल्ल्याचाही समावेश आहे. या किल्ल्याचा थेट संबंध शिवाजी महाराजांच्या महत्त्वाकांक्षी ‘दक्षिण दिग्विजय’ मोहिमेशी आहे. हाच किल्ला शिवरायांनी नियोजनबद्ध लष्करी कारवायांद्वारे कसा ताब्यात घेतला आणि पुढे मुघलांशी झालेल्या संघर्षात त्याने कसा निर्णायक वाटा उचलला, याचा घेतलेला हा विस्तृत ऐतिहासिक आढावा.”
जिंजीचा किल्ला
जिंजी किल्ला इ.स. १६४९ पासून विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात होता. इ.स. १६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या फौजांचा पराभव करून जिंजी किल्ला जिंकला आणि त्याची पुनर्बांधणी युरोपीय पद्धतीने केली. त्यांनी किल्ल्याभोवती नवी तटबंदी बांधली, खंदक खणले, मनोरे उभारले, पाण्याची साठवणूक करण्यासाठी तलाव तयार केले आणि ही सगळी कामं अत्यंत काटेकोरपणे पूर्ण केली. या किल्ल्याच्या देखरेखीची जबाबदारी महाडिक घराण्याकडे सोपवण्यात आली होती. नंतर छत्रपती राजाराम यांच्यासाठी हा किल्ला दुसरी राजधानी म्हणून निवडण्यात आला.
दक्षिण दिग्विजय मोहीम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरची त्यांची एकमेव दीर्घकालीन व नियोजनबद्ध मोहीम म्हणजेच दक्षिण दिग्विजय मोहीम. ही मोहीम जवळपास दीड वर्ष चालली. अन्य राजकीय घडामोडींपेक्षा ही मोहीम अधिक स्थिर, दूरदृष्टीपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी होती, असं काही इतिहासकार मानतात. सभासद बखरीत या मोहिमेची योजना प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली होती, असे वर्णन आहे. तर काही अभ्यासक या मोहिमेची कल्पना रघुनाथपंत हणमंते यांची होती असे मानतात.
अस्थिर राजकारणाची पार्श्वभूमी
या मोहिमेच्या मुळाशी तत्कालीन विजापूरच्या अस्थिर राजकारणाची पार्श्वभूमी होती. विजापूरात दक्षिणी आणि पठाण गटांत संघर्ष शिगेला पोहोचला होता. खवासखानाने शिवाजी महाराजांविरुद्ध मोगल सुभेदार बहादुरखानाशी युती केली होती, पण उलट त्यालाच राजकीय नुकसान सहन करावं लागलं होतं. सत्ता पठाण गटाच्या बहलोलखानाच्या हाती गेली आणि विजापूरच्या राजकारणाचा समतोल ढासळला.
स्वराज्याच्या हितासाठी…
त्याच वेळी दक्षिण भारतातही नायक आणि पालेगार यांच्यात राजकीय उलथापालथ सुरू होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे सावत्र बंधू तंजावरचे व्यंकोजीराजा यांनी तंजावरमध्ये सत्ता प्रस्थापित केली. दुसरीकडे जिंजीचा सुभेदार नासिर मुहम्मदही महत्त्वाकांक्षा बाळगून होता. या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे हित जपण्यासाठी दक्षिण दिग्विजय मोहिमेस प्रारंभ केला.
भव्य सैन्यदल व मुत्सद्देगिरीचा प्रारंभ
महाराजांनी सुमारे २०,००० घोडदळ आणि ४०,००० पायदळ, कर्नाटकची माहिती असलेले मार्गदर्शक, भरपूर खजिना आणि शूर सरदारांसह या मोहिमेस सुरुवात केली. गोदावरीमार्गे नांदेड, बोधन, सिकंदराबाद मार्गे भागानगर (हैदराबाद) येथे पोहोचले. महाराजांचं भागानगरात जल्लोषात स्वागत झालं. कुत्बशहाने त्यांना मोहीम खर्चासाठी रोज तीन हजार होन आणि सहायक सैन्य दिलं.
धार्मिक स्थळांचे दर्शन व राजकीय यश
श्रीशैलम (मल्लिकार्जुन) येथे दर्शन घेतल्यावर महाराज तिरुपतीस गेले. तिथे त्यांनी भक्तिपूर्वक पूजाअर्चा केली आणि पुरोहितांस सनद दिली. तिथून मद्रास जवळच्या पेद्दापोलम येथे पोहोचले आणि औषधे व रत्ने घेण्यासाठी इंग्रजांशी संवाद साधला.
जिंजीचा ताबा आणि राजकारणातली चतुराई
खवासखानाच्या मृत्यूनंतर जिंजीचा सुभेदार नासिर मुहम्मद जिंजीचा किल्ला कुत्बशहाला द्यायच्या विचारात होता. परंतु, मादण्णाच्या सल्ल्याने त्याने शिवाजी महाराजांशीच करार केला. महाराजांनी त्याला ५०,००० होन आणि उत्पन्नाचा प्रदेश देऊन जिंजी किल्ला हस्तगत केला. तेथे रायाजी नलगे, तिमाजी केशव आणि रुद्राजी साळवी यांना जबाबदारी देण्यात आली.
शेरखानाचा पराभव आणि व्यंकोजींच्या वाटाघाटी
शेरखान लोदीला हरवून भुवनगिरीचा किल्ला ताब्यात घेतला. व्यंकोजींची समजूत घालण्यासाठी महाराज तिरुमलवाडी येथे पोहोचले. त्यांनी व्यंकोजींना वारसाहक्काचा वाटा मागितला, पण व्यंकोजी वाटाघाटी अर्धवट सोडून निघून गेले. अखेर महाराजांनी कावेरीच्या उत्तर किनाऱ्याचा मुलूख ताब्यात घेतला आणि व्यंकोजींनी समझोता केला.
श्रीरंगपटणाची लूट आणि राज्यकारभार
ऑगस्टमध्ये महाराजांनी श्रीरंगपटण लुटले आणि नव्याने ताब्यात घेतलेल्या प्रदेशांची व्यवस्था लावली. जिंजी प्रांत रघुनाथपंतांच्या ताब्यात दिला. परतीच्या प्रवासात बेलवडीच्या सावित्रीबाई देसाईने जोरदार प्रतिकार केला, पण तिला हरवून तिच्या उपजीविकेसाठी काही मुलूख देण्यात आला.
दक्षिण दिग्विजयाचे ऐतिहासिक महत्त्व
या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांची राजकारणातील मुत्सद्देगिरी, सैनिकी डावपेच, धार्मिक श्रद्धा, राज्यकारभाराची दृष्टी आणि भविष्यातील संकटांची जाण सर्वत्र दिसते. स्वराज्याला दक्षिण भारतात एक सशक्त आधार मिळावा, हेच त्यांचं अंतिम उद्दिष्ट होतं. ही मोहीम त्यांच्या कारकीर्दीतील एक अत्यंत मोलाचा अध्याय ठरतो.
शिवाजी महाराजांनंतर जिंजी
औरंगजेबाने जिंजीचा किल्ला परत मिळवण्यासाठी झुल्फिकार अली खान याला पाठवले. मात्र हा किल्ला वेढणे सोपे काम नव्हते. १६९० मध्ये म्हणजे शिवाजी महाराजांनंतर झुल्फिकार अली खानने या किल्ल्याला वेढा घातला. स्वारूपसिंह आणि तामिळ मुस्लीम महबूब खान (ज्याला मावुथुकारन या टोपणनावाने ओळखले जात असे) यांच्याकडे मुघल सैन्याचं नेतृत्व सोपवलं गेलं. झुल्फिकार अली खानने मराठ्यांना शरण येण्यास सांगितलं. परंतु राजारामने नकार दिला.
मराठ्यांचे छुपे हल्ले
लवकरात लवकर विजय मिळवण्याच्या उद्देशाने झुल्फिकार अली खानने माणसं, दारुगोळा आणि निधी गोळा करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्याने फोर्ट सेंट जॉर्जच्या इंग्रजी गव्हर्नर एलायहू येल याच्याशी युती देखील केली. पुढील काही वर्षांत झुल्फिकार अली खानने मर्यादित साधनसामग्रीसह किल्ल्याची भिंत भेदण्याचे प्रयत्न केले. त्याने व्यापारी मार्ग सुरक्षित केले आणि घाझी उद्दीन खान फिरोज जंग पहिला याच्याशी अनेक वेळा संपर्क साधला. किल्ल्यात असलेल्या मराठ्यांवर चार मोठे हल्ले केले. मात्र त्याचं मुख्य लक्ष किल्ल्याच्या सभोवतालच्या परिसरावर होतं. तो सातत्याने मराठ्यांकडून होणाऱ्या छुप्या हल्ल्यांची शक्यता वर्तवायचा आणि ते अचूक ठरायचे, त्यामुळे त्याने प्रत्यक्ष वेढा घालण्यापेक्षा परिसरावर लक्ष केंद्रित केलं.
काही काळासाठी औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद कामबक्ष हा झुल्फिकार अली खानबरोबर आला होता. परंतु, एकदा जिंजी किल्ल्याभोवतीच्या मुघल छावण्या मराठा बंडखोरांनी वेढून घेतल्या, त्यावेळी कामबक्षने मुघलांना फसवून पलायन करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा कट उधळला गेला आणि झुल्फिकार अली खानने त्याला साखळदंडात बांधून खड्ड्यात कैद केलं. त्यानंतर झुल्फिकार अली खानने औरंगजेबाला त्याच्या मुलाच्या विश्वासघाताची माहिती पत्राद्वारे दिली. औरंगजेब त्याचा शिरच्छेद करण्याच्या तयारीत होता, पण त्याची मुलगी झिनत-उन-निस्सा हिच्या विनवणीनं औरंगजेब थांबला. हा वेढा १६९८ पर्यन्त होता. शेवटी १६९८ च्या किल्ल्यावरील हल्ल्यात मराठ्यांना हार पत्करावी लागली. पण इतिहास जिंजी किल्ला या छत्रपती शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचे अनोखे प्रमाण म्हणून अजरामर झाला.