Govinda Hospitalized After Sudden Fainting Spell: प्रसिद्ध अभिनेता गोविंद याला मंगळवारी मध्यरात्री बेशुद्ध पडल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासण्या करण्यासाठी न्यूरोलॉजिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला. गोविंदाचे मॅनेजर शाही सिन्हा यांनी सांगितले की, “६१ वर्षीय अभिनेत्याला तीव्र डोकेदुखीमुळे डोकं जड वाटू लागलं आणि त्यानंतर भोवळ आली. सध्या त्याच्या विविध तपासण्या सुरू आहेत.”
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेता गोविंदाला Syncope म्हणजे वैद्यकीय भाषेत बेशुद्ध पडणे किंवा शुद्ध हरपणे, हा विकार जडला आहे. मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा अचानक आणि तात्पुरता कमी होतो. त्यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि काही काळासाठी व्यक्ती बेशुद्ध होते, असे या विकाराचे वर्णन केले जाते.
तज्ञांच्या मते, बेशुद्ध पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात, बहुतेक वेळा ती तात्पुरती आणि निरुपद्रवी असतात. डॉ. राहुल शर्मा (कन्सल्टंट न्युरोसर्जन, रूबी हॉल क्लिनिक, पुणे) यांनी टाइम्स नाऊला सांगितले की, “न्यूरोलॉजिकल दृष्टिकोनातून पाहिल्यास, बेशुद्ध पडणे (किंवा सिंकोपी) हे मेंदूकडे जाणाऱ्या रक्त आणि ऑक्सिजन पुरवठ्यात झालेल्या तात्पुरत्या कमतरतेमुळे होते, त्यामुळे काही क्षणांसाठी शुद्ध हरपते. याची अनेक कारणे हृदयाशी किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित असतात. रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि ताण यांचे नियमन मेंदूच करतो. त्यामुळे सिंकोपी समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी न्युरोलॉजीचाच आधार घ्यावा लागतो.”
डॉ. शर्मा म्हणाले, “सर्वसाधारण न्यूरोलॉजिकल कारणांमुळे होणाऱ्या प्रकाराला न्युरोकार्डिओजेनिक किंवा व्हॅसोव्हेगल सिंकोपी म्हणतात. या स्थितीत, स्वायत्त (ऑटोनॉमिक) मज्जासंस्थेतील असामान्य रिफ्लेक्समुळे हृदयाचे ठोके अचानक मंदावतात आणि रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, त्यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यात घट होते.”

तुम्ही बेशुद्ध पडलात, तर काही सेकंदांनंतर किंवा मिनिटांनंतर शुद्ध येऊ शकते. पण काही वेळ तुम्हाला गोंधळल्यासारखे किंवा थकलेले वाटू शकते. साधारणपणे काही मिनिटांत किंवा तासांत पूर्ण बरे वाटते. सिंकोपी दरम्यान शरीरात जे घडते, ते इतर प्रकारच्या बेशुद्धीपेक्षा कमी गंभीर असते. यात झटका (सीझर) आल्यावर दिसणाऱ्या लक्षणांचा समावेश नसतो.
डॉक्टरांच्या मते, सिंकोपी हा अनेकदा अनेकांमध्ये आढळणारा असा विकार आहे, विशेषतः ७० वर्षांवरील लोकांमध्ये तो अधिक आढळतो, परंतु हे कोणत्याही वयात होऊ शकते. आरोग्याच्या कोणत्याही समस्या असोत किंवा नसोत अशा स्वरूपाचा त्रास कुणालाही उद्भवू शकतो.
डॉ. शर्मा पुढे म्हणाले, “न्यूरॉलॉजिस्ट फक्त बेशुद्ध पडण्याकडेच नाही, तर त्याबरोबर येणाऱ्या लक्षणांकडेही लक्ष देतात, जसे की हातपायाला झटके येतात, गोंधळ, नजरेत बदल, किंवा दीर्घकाळ दिशाभ्रम ही लक्षण सुद्धा आढळतात. यावरून हा मेंदूशी संबंधित विकार आहे की इतर काही कारण असावं याचा शोध घेतला जातो.
सिंकोपीची लक्षणे (Signs and Symptoms of Syncope)
सिंकोपी म्हणजेच बेशुद्ध पडण्यापूर्वी किंवा बेशुद्ध पडताना शरीरात काही लक्षणे दिसतात. त्यातील काही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- अचानक दृष्टीसमोर काळोख येणे (ब्लॅकआउट होणे)
- कारण नसताना पडणे
- भोवळ येणे किंवा हलके वाटणे
- झोपल्यासारखे किंवा गुंगी आल्यासारखे वाटणे
- उभे राहिल्यावर तोल जाणे किंवा कमकुवतपणा जाणवणे
- डोळ्यांसमोर ठिपके दिसणे किंवा टनल व्हिजन (दृष्टी अरुंद होणे)
- डोकेदुखी
- घाम येणे किंवा मळमळणे
सिंकोपीची कारणे किंवा ट्रिगर्स (Triggers of Syncope)
बेशुद्ध पडण्यास काही विशिष्ट गोष्टी कारणीभूत ठरतात. त्यातील काही ट्रिगर्स पुढीलप्रमाणे आहेत:
- दीर्घकाळ उभे राहणे
- ब्लड प्रेशरच्या औषधांचे सेवन
- उष्ण वातावरणात राहणे
- जास्त अन्न, कॅफिन किंवा मद्यपान करणे
- शरीरात मीठ आणि पाण्याची कमतरता असणे
- अचानक उठणे किंवा स्थिती बदलणे, विशेषतः बसल्यावर किंवा झोपेतून पटकन उभे राहणे
- हृदयाशी संबंधित समस्या, ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो
- मेंदू, मज्जासंस्था किंवा स्पायनल कॉर्डशी संबंधित विकार
ही कारणे आणि लक्षणे लक्षात दिसल्यास, योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते, विशेषतः असे वारंवार होत असेल तर लवकरात लवकर उपचार करणे गरजेचे असते. अभिनेता गोविंदाच्या निमित्ताने या विषयाच्या चर्चेला आता नव्याने सुरुवात झाली आहे.
