बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी (२७ नोव्हेंबर) ‘गंगाजल आपूर्ती योजने’चा शुभारंभ केला आहे. या योजनेच्या माध्यमातून गंगा नदीचं पाणी राज्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशांत नळांद्वारे पुरवलं जाणार आहे. यामुळे बिहारमधील लाखो कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. नितीश कुमार यांनी नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे ४ हजार कोटी रुपयांच्या ‘हर घर गंगाजल’ योजनेचं उद्घाटन केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गंगा पाणी पुरवठा योजने’अंतर्गत (GWSS) पहिल्या टप्प्यात बिहारमधील राजगीर, गया आणि बोधगया येथील सुमारे साडेसात लाख कुटुंबांना २८ नोव्हेंबरपासून पाईपलाइनद्वारे नदीचे शुद्धीकरण केलेलं पाणी पुरवठा केला जाणार आहे.

या योजनेबाबत अधिक माहिती देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला सांगितलं की, “या प्रकल्पाचा एक भाग म्हणून गंगा नदीच्या पुराचं पाणी साठवलं जाणार आहे. या पाण्यावर प्रक्रिया करून ते राजगीर, गया आणि बोधगया या प्रदेशांना पुरवलं जाणार आहे. याचाच अर्थ राज्य सरकार लोकांच्या घरापर्यंत पवित्र गंगाजलचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे आता मीही आत्मविश्वासाने सांगू शकतो की, मी माझ्या राज्यासाठी काहीतरी केले आहे, ” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या प्रकल्पाचं सर्व श्रेय मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दिलं आहे. नितीश कुमार हे दूरदृष्टी असणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ही योजना सत्यात उतरली. नितीशकुमारांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकार राज्यातील लोकांसाठी अनेक कल्याणकारी उपाययोजना करत राहणार आहे” असं तेजस्वी यादव म्हणाले

‘हर घर गंगाजल’ प्रकल्प नेमका काय आहे?

‘हर घर गंगाजल’ या प्रकल्पांतर्गत गंगा नदीचं अतिरिक्त पाणी जलाशयांमध्ये साठवलं जाणार आहे. त्यावर प्रक्रिया करून हे पाणी राजगीर, गया आणि बोधगया या प्रदेशांना पुरवलं जाईल. या प्रदेशात दीर्घकाळापासून पाणीटंचाई सुरू आहे. या योजनेचा दुसरा टप्पा पुढील वर्षी सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात गंगेचं पाणी पाईपलाइनद्वारे नवादापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे. ‘मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड’ (MEIL) या कंपनीला ‘हर घर गंगाजल’ योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे.

‘हर घर गंगाजल’ योजनेची उद्दिष्ट्ये

या उपक्रमाचे प्रमुख दोन उद्दिष्टे आहेत. पहिलं उद्दिष्ट म्हणजे पुराचं पाणी साठवणे आणि दुसरे म्हणजे पुराच्या पाण्याचं सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करणे, अशी माहिती MEIL कंपनीने आपल्या निवेदनाद्वारे दिली.

हेही वाचा- विश्लेषण : बिहारी ‘गब्बर’च्या मुसक्या आवळणारे ‘दबंग’ अधिकारी; ‘बिहार डायरीज’चे खऱ्या आयुष्यातील हिरो IPS अमित लोढा कोण?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘द हिंदू’ला सांगितलं की, या योजनेद्वारे प्रत्येक कुटुंबासाठी दररोज १३५ लिटर प्रक्रिया केलेले गंगाजल पुरवठा केला जाणार आहे. त्याचबरोबर गंगानदीचं पाणी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याने राजगीर, गया आणि बोधगया या तीन जिल्ह्यांतील भूजल पातळीही वाढण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा – विश्लेषण: इन-कॅमेरा खटल्याची तेजपाल यांची मागणी न्यायालयाने फेटाळली, अशाप्रकारे सुनावणी कधी होते? न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, गंगा नदीच्या पुराचं पाणी मोकामाजवळील हाथीदह येथून पाईपद्वारे १५० किलोमीटरचा प्रवास करून साडेसात लाख घरांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे. तत्पूर्वी, या पाण्यावर जल शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाईल. बिहारचे जलसंपदा मंत्री संजय कुमार झा म्हणाले की, हाथीदह येथून पंपांद्वारे पाणी उपसलं जाईल आणि ते पाणी पाईपलाईनद्वारे राजगीर, तेतर आणि गया येथील तीन जलाशयांमध्ये नेलं जाईल.

‘हर घर गंगाजल’ योजनेची गरज का होती?

बिहार सरकारने ‘जल, जीवन, हरियाली’ या योजनेचा एक भाग म्हणून गंगा पाणी पुरवठा योजना सुरू केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या प्रदेशातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ही योजना सुरू केली. राजगीर, गया आणि बोधगया या दक्षिण बिहारमधील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘बोअरवेल्स’ घेण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रदेशातील भूजल पातळी कमालीची कमी झाली आहे. परिणामी या प्रदेशात नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

हेही वाचा- विश्लेषण: तीन घुमट, एक बस-स्टॉप आणि राजकीय खडाजंगी; म्हैसूरमधील बस स्थानकामुळे निर्माण झालेला वाद नेमका काय?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृ्त्तानुसार, गया जिल्ह्यात जुलै २०२१ मध्ये सरासरी भूजल पातळी ३०.३० फुटांवर होती. पण जुलै २०२२ मध्ये येथील भूजल पातळी ४१.५० फुटांवर गेली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Har ghar gangajal scheme bihar govt cm nitish kumar rmm
First published on: 30-11-2022 at 17:28 IST