गेल्यावर्षी तब्बल २१ वर्षांनी भारताने ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा खिताब जिंकला. भारताची सौंदर्यवती हरनाझ संधू ‘मिस युनिव्हर्स २०२१’ या मुकुटाची मानकरी ठरली होती. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेली हरनाझ संधू पुन्हा चर्चेत आली आहे. नुकताच पार पडलेला ‘मिस युनिव्हर्स २०२२’ च्या अंतिम सोहळ्यात हरनाझने हजेरी लावली. यावेळी तिचं वाढलेलं वजन हा चर्चेचा विषय बनला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कारणामुळे अनेकांनी तिला पुन्हा ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मध्यंतरी तिने यावर प्रतिक्रियादेखील दिली होती. एका मुलाखतीत तिला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर हरनाझने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा ती म्हणाली होती की, “मला ट्रोलिंगचा काहीही फरक पडत नाही. प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. मी माझ्या शरीराचा आदर करते. मला माझ्यावर लावण्यात येणारे आरोप पुसताही येतात. मी बॉडी शेमिंग करणाऱ्यांचा तिरस्कार करते.” याबरोबरच ती एका आजाराशी झुंज देत असल्याचंही तिने कबूल केलं होतं.

आणखी वाचा : लहान मुलांना पालकाच्या भाजीचं महत्त्व पटवून देणारा ‘पॉपॉय’ झाला ९४ वर्षांचा; जाणून घ्या लाडक्या कार्टूनबद्दल रंजक गोष्टी

हरनाझने यावर स्पष्टीकरण देत सांगितलं की, “मला सेलिॲक नावाचा आजार आहे. अनेक लोकांना माहिती नाही पण मला ग्लूटेनची अॅलर्जी आहे. ग्लूटेन म्हणजे प्रोलेमीन प्रोटीनचा एक भाग आहे. ग्लूटेन गहू, जव, तांदूळसारख्या पदार्थांमध्ये असतात. ग्लूटेन गरम झाल्यावर त्यातला चिकटपणा जास्त वाढतो. ग्लूटेन तुमच्या शरीरासाठी हानिकारक असतं. हा आतड्यासंबंधीचा एक आजार आहे.” हरनाझला झालेला हा आजार नेमका आहे तरी काय याबद्दल आपण जाणून घेऊयात.

सेलिॲक म्हणजे नेमकं काय?

सेलिॲक हा एक असा आजार आहे ज्यामध्ये तुमचं शरीर कोणत्याही प्रकारचं ग्लूटेन पचवू शकत नाही. यामुळे आतड्यावर परिणाम होतो. जागतिक स्तरावर हा आजार १०० लोकांमधून एखाद्या व्यक्तीलाच होतो. इतकंच नाही तर हा आजार थेट तुमच्या पचनसंस्थेवर घाला घालतो.

याचे गंभीर परिणाम कोणते?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आतड्यावर या आजारामुळे थकवा, वजन घटणे, सूज येणे तसेच एनीमियासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. लहान मुलांना हा आजार झाल्याच त्यांची शारीरिक वाढ खुंटू शकते. आरोग्य तज्ञांच्या मते हा आजार आनुवंशिकसुद्धा असू शकतो. शिवाय हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात ज्यामध्ये टाइप १ मधुमेह आणि स्क्लेरोसिससारखे गंभीर आजार होऊ शकतात.

यावर उपाय काय?

सध्यातरी या आजारावर ठोस असा इलाज काहीच नाही. सेलिॲक डिसीज फाउंडेशनच्या अभ्यासानुसार शक्य होईल तितकं ग्लूटेन मुक्त आहार घेणं हाच यावरील एकमेव उपाय आहे. हा आजार असलेल्या लोकांनी गहू, ज्वारी, इतर धान्य तसेच बियरसारख्या गोष्टींचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे. तर हा आजार असणाऱ्या लोकांनी फळं, भाज्या, मांसाहार, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर ग्लूटेन मुक्त पदार्थांचे सेवन करावे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harnaaz sandhu got trolled again for her weight gain what is celiac disease she is suffering from avn
First published on: 17-01-2023 at 16:28 IST