Illegal immigration US अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून त्यांनी एकापाठोपाठ एक निर्णयाचा धडाका लावला आहे. विशेषतः त्यांनी बेकायदा स्थलांतरितांविरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यापासून तब्बल १६ लाख बेकायदा स्थलांतरितांनी देश सोडल्याचा दावा सरकारने केला आहे. २०० दिवसांत लाखोंच्या संख्येने नागरिक देशातून निघून गेले, असे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा सचिव (Homeland Security Secretary) क्रिस्टी नोएम यांनी बेकायदा स्थलांतरितांनी देश सोडल्याचे वारंवार सांगितले आहे. त्याद्वारे त्यांनी बेकायदा स्थलांतरितांवर केलेल्या कारवाईच्या यशाचा पुरावा सादर केला आहे. परंतु, काही तज्ज्ञांचे याबाबत वेगळे मत आहे. खरंच इतक्या मोठ्या संख्येने बेकायदा स्थलांतरितांनी देश सोडलाय काय? ट्रम्प सरकारचे याबाबत म्हणणे काय? तज्ज्ञांचा दावा काय? त्याविषयी जाणून घेऊयात.
अमेरिकी सरकारचा दावा काय?
- गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (Department of Homeland Security – DHS) एक निवेदन जारी केले.
- त्यात म्हटले आहे की, जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून सुमारे १६ लाख बेकायदा स्थलांतरितांनी देश सोडला आहे.
- क्रिस्टी नोएम यांनी या आकड्याला यशाचा पुरावा म्हणून मांडले. “२०० दिवसांपेक्षा कमी काळात १६ लाख बेकायदा स्थलांतरितांनी अमेरिका सोडला आहे. हा आकडा खूप मोठा आहे. याचा अर्थ, देश अधिक सुरक्षित झाला आहे, करदात्यांच्या पैशांची बचत झाली आहे, शाळा आणि रुग्णालयांवरील दबाव कमी झाला आहे आणि अमेरिकन लोकांसाठी नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार.”
- गुरुवारी ‘फॉक्स न्यूज’वर बोलताना, नोएम यांनी प्रशासनाच्या या दृष्टिकोनाचे कौतुक केले आणि म्हटले, “१६ लाख बेकायदा स्थलांतरित आहेत, ज्यांनी स्वेच्छेने हा देश सोडला आहे. मला वाटते की, हे आकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिभेचे अचूक दर्शन घडवतात.”

‘ऑपरेशन होमकमिंग’ काय आहे?
डीएचएसच्या धोरणांपैकी सर्वांत वेगळा आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘ऑपरेशन होमकमिंग’ (Operation Homecoming). बेकायदा स्थलांतरितांना औपचारिकपणे हद्दपार न करताच त्यांना देश सोडण्यास प्रोत्साहित करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत जे लोक स्वतःहून देश सोडून जाण्यास सहमत आहेत, त्यांच्या विनामूल्य प्रवासाची व्यवस्था आणि त्यांना १,००० डॉलर्सचा आर्थिक प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो. हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी अनेक दशलक्ष डॉलर्सची आंतरराष्ट्रीय जाहिरात मोहीम राबवण्यात आली. “आता स्वेच्छेने निघून जा; अन्यथा अटक आणि हद्दपारीचा सामना करा,” अशी जाहिरात करण्यात आली. सरकारने हे धोरण एक व्यावहारिक उपाय म्हणून सादर केले गेले. बेकायदा स्थलांतरितांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर निघून जाण्यास सक्षम करणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट असल्याचे सरकारने म्हटले. परंतु, समीक्षकांचे म्हणणे आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोडून जाणारे लोक परत येणार नाहीत याची हमी देता येत नाही.
ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात किती जणांना अटक आणि हद्दपार करण्यात आले?
इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) आणि कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी) यांना अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या लोकांना शोधण्यासाठी विशेष छापे टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डीएचएसच्या मते, ट्रम्प यांनी पुन्हा पदभार स्वीकारल्यापासून ३,५२,००० पेक्षा जास्त बेकायदा स्थलांतरितांना अटक करण्यात आली आहे; तर ३,२४,००० हून अधिक लोकांना हद्दपार करण्यात आले आहे. या आक्रमक भूमिकेमुळेही दररोजच्या अटक कारवायांमध्ये घट झाली आहे. १ ते २७ जुलैदरम्यान इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने दररोज सरासरी ९९० लोकांना अटक केली; तर जूनमध्ये हा आकडा १२२४ होता.
१६ लाख बेकायदा स्थलांतरितांनी देश सोडल्याचा पुरावा आहे का?
१६ बेकायदा स्थलांतरितांनी देश सोडल्याचे सेंटर फॉर इमिग्रेशन स्टडीज (सीआयएस) या थिंक टँकच्या विश्लेषणातून समोर आले. सीआयएसने अमेरिकेच्या जनगणना ब्यूरोच्या (Census Bureau) ‘करंट पॉप्युलेशन सर्व्हे’ (सीपीएस)च्या आकडेवारीचे परीक्षण केले आणि अंदाज लावला की, या वर्षी जुलैपर्यंत बेकायदा स्थलांतरितांची संख्या १४.२ दशलक्षपर्यंत कमी झाली आहे. या वर्षी जानेवारीत बेकायदा स्थलांतरितांची संख्या १५.८ दशलक्ष इतकी होती. या संस्थेने म्हटले की, ही घट सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे.
ट्रम्प यांनी आतापर्यंत काय दावे केले आहेत?
बेकायदा स्थलांतरितांची लोकसंख्या हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. कारण- विविध संस्थांनी वेगवेगळे आकडे दिले आहेत. ट्रम्प यांनी स्वतः स्वतंत्र संशोधकांनी दिलेल्या आकड्यांपेक्षा कितीतरी जास्त आकडे सांगितले आहेत. मार्चमध्ये अमेरिकन काँग्रेसला (अमेरिकन संसदेला) संबोधित करताना त्यांनी दावा केला होता की, मागील चार वर्षांत २१ दशलक्ष स्थलांतरितांनी देशात प्रवेश केला आहे. हा अंदाज प्यू (Pew)च्या आकडेवारीपेक्षा खूप जास्त आहे आणि फेडरेशन फॉर अमेरिकन इमिग्रेशन रिफॉर्म (FAIR)च्या आकडेवारीपेक्षाही जास्त आहे. फेडरेशन फॉर अमेरिकन इमिग्रेशन रिफॉर्मने मार्चमध्ये हा आकडा १८.६ दशलक्ष असल्याचे सांगितले होते.
सीआयएसचा जुलैमध्ये १४.२ दशलक्ष इतक्या संख्येने बेकायदा स्थलांतरित असल्याचा अंदाज, डीएचएसच्या स्वतःच्या ‘ऑफिस ऑफ होमलँड सिक्युरिटी स्टॅटिस्टिक्स’च्या (Office of Homeland Security Statistics) आकडेवारीपेक्षा जास्त आहे. त्यांनी २०२२ मध्ये ११ दशलक्ष बेकायदा व्यक्ती देशात असल्याचा अंदाज लावला होता. दरम्यान, ‘सेंटर फॉर मायग्रेशन स्टडीज’ने (Center for Migration Studies) २०२२ मध्ये १२.२ दशलक्ष स्थलांतरित असल्याचा अहवाल दिला होता.