भक्ती बिसुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक स्तरावरील तापमान वाढ आणि हवामान बदल हा सर्वांच्याच चिंतेचा विषय ठरत आहे. यंदा भारतातही उष्णतेच्या लाटांचे तीव्र परिणाम मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच दिसून येत आहेत. तापमान वाढ आणि हवामान बदलांशी संबंधित असलेल्या या उष्णतेच्या लाटांचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसतो, मात्र अनेक मानवी कृती आणि तापमान वाढ यांचाही परस्पर संबंध या लाटांच्या मागे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. देशातील अनेक भागांमध्ये विशेषतः शहरी भागांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यानिमित्ताने हे विश्लेषण.

भारतातील चित्र काय?

कोणत्याही मैदानी प्रदेशात ४० अंश सेल्सिअस आणि किनारपट्टीच्या प्रदेशात ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होते तेव्हा त्या परिस्थितीला उष्णतेची लाट म्हणून संबोधले जाते. डोंगराळ भागात हे तापमान ३० अंश सेल्सिअस असल्यास त्याला उष्णतेची लाट मानले जाते. यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारतातील विविध भागांमध्ये उष्णतेच्या लाटांची नोंद झाली आहे. मार्च महिन्यात यावर्षी या मोसमातील पहिली उष्णतेची लाट तब्बल चार दिवस कर्नाटकमध्ये नोंदवण्यात आली होती. गोव्यात चार दिवस, गुजरातमध्ये दोन दिवस उष्णतेच्या लाटांची नोंद झाली. त्यानंतरही हे चित्र देशातील विविध भागांमध्ये कायम आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीसह बहुतांश प्रदेशाला यदा उष्णतेच्या लाटांचा धोका असल्याचे सांगण्यात आले. मध्य प्रदेशातील रतलामसह काही शहरे, राजस्थानमधील जैसलमेर येथे नुकतेच देशातील सर्वात जास्त कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. नवी दिल्ली, विजयवाडा, चंदीगड या शहरांनाही अलीकडेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत समाविष्ट केले होते.

भारतातील उष्णतेच्या लाटांमुळे होणारे मृत्यू?

नवी मुंबईतील खारघर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यात सुमारे १५ ते १६ व्यक्ती उष्माघातामुळे दगावल्याची अधिकृत संख्या नोंद करण्यात आली. लोकसंख्येची घनता, पायाभूत सुविधांचा अभाव आणि आरोग्यसेवांच्या उपलब्धतेतील मर्यादा अशा गोष्टींमुळे उष्णतेच्या लाटांच्या झळा भारतात तीव्र होत आहेत. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या वापराची मर्यादित उपलब्धता, वायुप्रदूषण, वातानुकूलित यंत्रांचा शहरी भागातील प्रमाणाबाहेर वाढलेला वापर, त्यामुळे पायाभूत सुविधांवर येणारा ताण अशा अनेक कारणांचा संबंध तापमान वाढीशी जोडला जातो. पत्र्याची घरे, हवा खेळती न राहणे यांचाही उष्णतेच्या लाटांदरम्यान होणाऱ्या मृत्यूंशी संबंध आहे. रोजंदारीवर काम करणारे बांधकाम मजूर, रस्त्यावरील विक्रेते, खाणकामगार यांचा उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये प्रामुख्याने समावेश आहे. १९६७ ते २०२० या काळात देशभरात सुमारे ४१ हजार मृत्यू उष्माघाताने झाल्याची अधिकृत नोंद आहे.

विश्लेषण: ‘अर्बन हीट’ हा काय प्रकार आहे? तापमानात वाढ की आणखी काय?

टांगती तलवार शहरांवर?

देशातील उष्णतेच्या लाटांची टांगती तलवार ही प्रामुख्याने शहरी भागांवर असून ग्रामीण भागात हे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे शहरी भागांचा उल्लेख ‘उष्णतेची बेटे’ असा करण्यात येतो. शहरी भागांतील लोकसंख्येची घनता, औद्योगिकीकरण, प्रदूषण आणि इतर अनेक मार्गांनी हवेत मिसळणारी प्रदूषके यांचा वाढणाऱ्या उष्णतेशी संबंध आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती, त्या तुलनेत अत्यंत अरुंद रस्ते, दिवसेंदिवस घटत चाललेले हरीत आच्छादन, रहदारी आणि वाहतूक कोंडी, त्यातून निर्माण होणारे प्रदूषण आणि हवेत सोडली जाणारी उत्सर्जके या गोष्टी शहरी भागांना उष्णतेचे बेट बनवण्यास प्रामुख्याने कारणीभूत असल्याच्या निष्कर्षाप्रत संशोधक येतात. शहरांचे रुपांतर उष्णतेच्या बेटांमध्ये होण्यामुळे केवळ उन्हाळी आजार आणि उष्माघातच नव्हे तर हृदयविकार, पक्षाघाताचा झटका आणि इतर अनेक जीवनशैलीजन्य विकारांचाही या परिस्थितीशी संबंध नाकारता येत नाही, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात.

भारतातील तापमान वाढ संथच?

भारत सरकारच्या हवामान विभागाने २०२० मध्ये प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालानुसार जगातील इतर प्रदेशांच्या तुलनेत भारतीय उपखंडामध्ये दिसून येत असलेली तापमान वाढ अद्यापही संथ स्वरुपाची आहे. १९०० पासून भारतीय उपखंडात ०.७ अंश सेल्सिअस एवढे सरासरी तापमान वाढत असल्याचे दिसून आले आहे. जागतिक स्तरावर जमिनीचे तापमान १.५९ अंश सेल्सिअस एवढे वाढत असताना त्या तुलनेत भारतीय उपखंडातील ही वाढ संथ आणि सौम्य असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर उर्वरित जगाच्या तुलनेत भारतासमोर तापमान वाढीचे असलेले संकटही सौम्यच आहे, असा निष्कर्षही हा अहवाल काढतो. तापमान वाढीचा संबंध हा त्या त्या क्षेत्राच्या भौगोलिक स्थानाशीही संबंधित आहे.

विश्लेषण: जगासमोर आव्हान मुदतपूर्व जन्म रोखण्याचे?

भारताचे भौगोलिक स्थान पहाता येथील तापमान वाढ संथ असण्यात काही आश्चर्य नाही, असे तज्ज्ञ सांगतात. विषुववृत्ताजवळील प्रदेशांच्या तुलनेत ध्रुवीय प्रदेशांजवळ, उंचावरील प्रदेशात तापमान वाढ अधिक ठळकपणे होताना दिसते. मात्र, भारताचे स्थान विषुववृत्ताच्या अगदी जवळ आणि मुळातच उष्णकटीबंधीय प्रदेशात असल्यामुळे येथील तापमान वाढीची तुलना जगाच्या इतर भागांतील तापमान वाढीशी करणे योग्य नाही, असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. हवामान बदल आणि तापमान वाढीचा परिणाम कमाल तापमानाच्या वाढीवर पर्यायाने उष्णतेच्या लाटांमध्ये होताना दिसत असला तरी तेवढ्या प्रमाणात येथील किमान तापमानावर या दोन्ही घटकांचा परिणाम अद्याप दिसून येत नाही, याकडेही हवामानाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून लक्ष वेधण्यात येत आहे.

bhakti.bisure@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heatwave worldwide creating issue reasons for temperature print exp pmw
First published on: 15-05-2023 at 16:06 IST