scorecardresearch

Premium

भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीच का? जाणून घ्या…

हेन्री कार्टियर-ब्रेसन, मार्गारेट बोर्के-व्हाईट व मॅक्स डेसफोर अशा दिग्गज फोटोग्राफर्सनी महात्मा गांधी यांचे अनेक फोटो काढले.

mahatma_gandhi
दोन हजार रुपयांची नोट (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

इंग्रजांची सत्ता असताना भारतातील सर्व आर्थिक व्यवहार हे इंग्रजांनी निर्माण केलेल्या चलनाच्याच आधारे व्हायचा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही काळ भारतात ब्रिटिशांच्या चलनावरच सर्व व्यवहार केले जायचे. कालांतराने भारतीय चलनांत अनेक बदल होत गेले. भारतीय चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, हा फोटो कसा आला? चलनी नोटांमध्ये कसे बदल होत गेले? हे जाणून घेऊ.

हेन्री कार्टियर-ब्रेसन, मार्गारेट बोर्के-व्हाईट व मॅक्स डेसफोर अशा दिग्गज फोटोग्राफर्सनी महात्मा गांधी यांचे अनेकदा फोटो काढले. मात्र, भारतीय चलनी नोटांवर दिसणाऱ्या गांधींच्या फोटोंची कथा वेगळीच आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधी यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. याच कारणामुळे त्यांना राष्ट्रपिता म्हटले जाते. ते राष्ट्रपिता असल्यामुळे भारतीय चलनी नोटांवर त्यांचाच फोटो असेल, असे जवळजवळ सर्वांनीच गृहीत धरले होते. मात्र, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय चलनी नोटांवर लगेच महात्मा गांधी यांचा फोटो आलेला नाही. त्यासाठी काही दशकांची वाट पाहावी लागली.

Praniti Shinde
“रावणाची पूजा करतात, पण कुंभकर्णाचं काय?”, राहुल गांधींच्या पोस्टरवरून प्रणिती शिंदेंचा भाजपाला थेट सवाल
Kokanhearted Girl Ankita Walawalkar Revels Crush not Onkar Bhojane But On Married Actor Says He Showed Bad Attitude
Video: कोकणहार्टेड गर्लने त्या ‘क्रश’ला केलं अनफॉलो! म्हणाली, “मला त्याने एका कार्यक्रमात खूप…”
Do you need multivitamin supplement Why a balanced diet is still the best nutrient boost
मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्सची गरज आहे का? संतुलित आहार हा अजूनही सर्वोत्तम पोषक घटक का आहे?
what is startup
Money Mantra: स्टार्टअपची व्याख्या, कर सवलती व अन्य फायदे

नोटांवरील गांधींचा फोटो कोठून घेण्यात आला?

महात्मा गांधी यांचा भारतीय चलनी नोटांवरील फोटो हे एखादे रेखाचित्र नाही. १९४६ साली काढलेल्या एका पूर्ण फोटोमधून हा फोटो घेण्यात आलेला आहे. ब्रिटिश राजकारणी लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पेथिक-लॉरेन्स यांच्यासोबत महात्मा गांधी उभे होते. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता. महात्मा गांधी या फोटोमध्ये हसत असल्यामुळे या फोटोची पुढे चलनी नोटांसाठी निवड करण्यात आली. दुर्दैवाने हा फोटो कोणी काढला; तसेच चलनी नोटांवर छापण्यासाठी या फोटोची निवड कोणी केली, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.

आरबीआय अॅक्ट १९३४ काय सांगतो?

चलनी नोटांवर नेमके काय असावे, हे ठरवण्याची, तसेच या नोटांची रचना करण्याची जबाबदारी ही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन व्यवस्थापन विभागाकडे असते. नोटेची रचना ठरवल्यानंतर या विभागाला केंद्र सरकार, तसेच रिझर्व्ह बँकेची मंजुरी घ्यावी लागते. नोटांच्या छपाईबाबत आरबीआय अॅक्ट १९३४ मध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या कायद्यातील कलम २५ मध्ये “चलनी नोटांची रचना, नोटेसाठी वापरावयाचे साहित्य हे केंद्रीय बोर्डाने शिफारस केल्यानंतरच केंद्र सरकारकडून मंजूर केले जाईल,” असे नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधींचा फोटो नोटांवर पहिल्यांदा कधी आला?

महात्मा गांधी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने काही विशेष नोटा जारी करण्याचे ठरवले होते. याच निर्णयांतर्गत भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो पहिल्यांदा १९६९ साली आला. तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर एल. के. झा होते. नोटांवर महात्मा गांधी यांच्या फोटोमागे सेवाग्राम आश्रमही दाखवण्यात आला होता. त्यानंतर १९८७ साली महात्मा गांधी यांचा फोटो असलेल्या ५०० रुपयांच्या चलनी नोटा जारी करण्यात आल्या.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या नोटा कशा होत्या?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे काही महिने आरबीआयने किंग जॉर्ज सहावा यांचे छायाचित्र असलेल्या नोटाच चलनात कायम ठेवल्या. त्यानंतर १९४९ साली आरबीआयने एक रुपयाची नोट जारी केली. या नोटेत मात्र किंग जॉर्ज यांची प्रतिमा नव्हती. या प्रतिमेऐवजी सारनाथ येथील अशोकस्तंभावरील सिंह प्रतिमा असलेल्या भारतीय राष्ट्रचिन्हाचा फोटो लावण्यात आला. पुढे भारतीय चलनी नोटांत वेळोवेळी अनेक बदल होत गेले. आरबीआय म्युझियमच्या संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. “भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नोटांवर भारतीय चिन्ह असणे गरजेचे होते. तेव्हा किंग जॉर्ज यांच्या फोटोऐवजी महात्मा गांधी यांचा फोटो वापरावा, असे ठरवण्यात आले. त्या दृष्टीने नोटेची रचनाही करण्यात आली होती. मात्र, महात्मा गांधी यांच्या फोटोऐवजी सारनाथमधील अशोकस्तंभावरील सिंह प्रतिमेचा फोटो लावण्याचे ठरवण्यात आले. तेव्हा भारताच्या नोटेची रचना ही ब्रिटिश नोटेप्रमाणेच होती,” असे या संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे. पुढे १९५० साली प्रजासत्ताक भारताच्या दोन, पाच, दहा, शंभर रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या. या नोटांवर अशोकस्तंभावरील सिंह प्रतिमेचा फोटो होता.

आर्यभट्ट उपग्रह ते शेतकऱ्याचा फोटो

कालांतराने भारतीय संस्कृती, तसेच अन्य गोष्टी समस्त जगाला समजाव्यात म्हणून वेगवेगळ्या ठिकाणांचे, प्राण्यांचे फोटो नोटांच्या मागच्या बाजूस छापण्यात आले. त्यामध्ये वाघ, हरीण अशा प्राण्यांचा समावेश होता. १९७० साली कृषी क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी शेती करीत असलेल्या शेतकऱ्याचा फोटो नोटांच्या मागच्या बाजूस छापण्यात आला. १९८० साली विज्ञान, कला, तंत्रज्ञान यांचे महत्त्व विशद करण्यासाठी दोन रुपयांच्या नोटेवर भारताच्या आर्यभट्ट उपग्रहाचा फोटो छापण्यात आला. पाच रुपयांच्या नोटेवर कोणार्क मंदिरातील चाकाचाही फोटो छापण्यात आला होता. अशा प्रकारे भारतीय चलनी नोटांत कालांतराने बदल होत गेले.

महात्मा गांधींचे फोटो नोटेवर कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय कधी झाला?

नोटांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणारी पारंपरिक वैशिष्ट्ये पुरेशी नाहीत, असे आरबीआयला वाटू लगले. त्यामुळे १९९० साली आरबीआयने या नोटांच्या रचनेत आणखी काही बदल करण्याचा निर्णय घेतला. डिजिटल प्रिंटिंग, स्कॅनिंग, फोटोग्राफी व झेरोग्राफी हे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे भारतीय नोटा आणखी सुरक्षित करण्याची गरज आरबीआयला जाणवू लागली. म्हणूनच नोटांच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच काळात महात्मा गांधी यांचा फोटो नोटांवर छापण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधी हे सर्वमान्य व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्याला कोणी विरोधही केला नाही. याच निर्णयांतर्गत १९९६ साली भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटांवर असलेल्या अशोकस्तंभावरील सिंहमुद्रेऐवजी महात्मा गांधी यांचा फोटो वापरण्यास सुरुवात केली. यावेळी कोणी नोटांची नक्कल करू नये, यासाठी अनेक सुरक्षाविषयक बदल करण्यात आले.

नोटांवर स्वच्छ भारत मोहिमेचा लोगो

२०१६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधी यांचा फोटो असलेल्या नोटांची नवी सीरिज आणली. त्यामध्ये महात्मा गांधी यांचा फोटो तर होताच; शिवाय नोटेच्या मागच्या बाजूला स्वच्छ भारत अभियानाच्या लोगोचाही समावेश यात करण्यात आला.

नोटांवर अन्य नेत्यांचे फोटो छापण्याचीही मागणी

महात्मा गांधी यांच्याव्यतिरिक्त अन्य नेत्यांची, तसेच देव-देवतांचेही फोटो छापण्याची मागणी अनेकांनी केलेली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गणेश, तसेच लक्ष्मीमातेचा फोटो छापावा, अशी मागणी पंतप्रधान, तसेच केंद्र सरकारकडे केली होती. २०१४ साली नोबेल पारितोषक विजेते रवींद्रनाथ टागोर, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा फोटो नोटांवर छापण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, लोकसभेत बोलताना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आरबीआयने महात्मा गांधी यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीचा फोटा नोटांवर छापण्यास मनाई केली आहे, असे सांगितले होते. महात्मा गांधी यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती भारतीय लोकांचे तेवढ्याच क्षमतेने प्रतिनिधित्व करू शकत नाही, असे आरबीआयने म्हटले होते.

रघुराम राजन काय म्हणाले होते?

त्याच वर्षी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीदेखील देशात अनेक महान पुरुष होऊन गेले. मात्र, त्यापैकी महात्मा गांधी हे सर्वोच्च आहेत. तसेच यापैकी अनेक नेते हे कोणत्या तरी कारणामुळे वादग्रस्त असू शकतात, असे राजन म्हणाले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: History of mahatma gandhi photo on indian currency note prd

First published on: 01-10-2023 at 18:40 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×