Pacific tsunami warning रशियाच्या पूर्व द्वीपकल्प कामचात्का या भागाला एक अतिशय शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर या परिसरात त्सुनामीचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. जिओलॉजिकल सर्वेक्षणानुसार रशियातील भूकंपाची तीव्रता ८.८ रिश्टर स्केल इतकी होती. त्यानंतर रशियाच्या कुरिल कोस्टल आयलंड, जपानच्या होक्काइडो व अमेरिकेत त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. इक्वेडोर, इंडोनेशिया, पेरू, कोलंबिया व जपानसारख्या देशांसाठीही विविध स्तरांचे त्सुनामी अलर्ट जारी करण्यात आले आहेत. भूकंपामुळे त्सुनामी कशी निर्माण होते? आणि रशियातील भूकंपामुळे अमेरिकेला त्सुनामीचा इशारा का देण्यात आला? त्याविषयी जाणून घेऊयात…

भूकंप कशामुळे होतो?

पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील टेक्टोनिक प्लेट्सच्या सततच्या सरकण्याने, एकमेकांवर आदळण्याने किंवा एकमेकांच्या वर-खाली जाण्याने या भागांत मोठ्या प्रमाणात भूकंप होतात. भूकंपामुळे भूगर्भीय ताणतणावांमुळे उत्सर्जित झालेली ऊर्जा भूगर्भाच्या अंतर्पृष्ठावरून परावर्तित होऊन भूकंप लहरींच्या (seismic waves) स्वरूपात बाहेर पडते. पृथ्वीचा सर्वांत बाहेरील थर म्हणजे कवच टेक्टोनिक प्लेट्समध्ये विभागलेले आहे. या पट्ट्यांच्या कडांना प्लेट बाउंड्री (plate boundaries) म्हणतात.

मुळात या प्लेट्सच्या कडा खडबडीत असतात. त्यामुळे त्या एकमेकांना चिकटून राहतात आणि उर्वरित प्लेट्स सतत हलत राहतात. मात्र, भूकंप तेव्हा होतो, जेव्हा या प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात आणि दुसऱ्या प्लेटच्या वर किंवा खाली सरकतात. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकलचे सर्वेक्षण (USGS) सांगते, “पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली म्हणजे जिथे भूकंप होतो, त्या ठिकाणाला हायपोसेंटर (hypocenter) म्हणतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याच्या थेट वरच्या ठिकाणाला एपिसेंटर (epicenter) म्हणतात.”

भूकंपामुळे त्सुनामी कशी येते?

त्सुनामी हा जपानी शब्द ‘त्सू’ म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लहर यांवरून आला आहे. भूकंप, भूस्खलन किंवा ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या एखाद्या घटनेमुळे समुद्रात त्सुनामीसदृश महाकाय लाटांची मालिका तयार होते. त्सुनामी निर्माण होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. ते खालीलप्रमाणे :

  • जागा आणि खोली (Location & Depth) : भूकंपामुळे समुद्रातील भूभाग हादरतो. बहुतेक विनाशकारी त्सुनामी समुद्राखालील भूकंपांमुळे निर्माण होतात. उथळ भूकंपांची खोली साधारणपणे शून्य ते ७० किलोमीटरदरम्यान असते. कामचात्का भूकंप रशियातील पेट्रोपाव्लोव्स्क-कामचात्कास्की या किनारपट्टीवरील शहराच्या १३६ किलोमीटर पूर्वेला आणि केवळ १९.३ किलोमीटरच्या उथळ खोलीवर झाला. त्यामुळेच या भूकंपामुळे त्सुनामी लाटा निर्माण झाल्या.
पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील टेक्टोनिक प्लेट्सच्या सततच्या सरकण्याने, एकमेकांवर आदळण्याने किंवा एकमेकांच्या वर-खाली जाण्याने या भागांत मोठ्या प्रमाणात भूकंप होतात. (छायाचित्र-फायनान्शियाल एक्सप्रेस)
  • फॉल्टचा प्रकार (Type of Fault) : त्सुनामीला कारणीभूत ठरणारे भूकंप साधारणपणे ‘रिव्हर्स फॉल्टिंग’ (reverse faulting) मुळे होतात. रिव्हर्स फॉल्टमध्ये फॉल्ट लाईनच्या वरचा खडकांचा थर, फॉल्ट लाईनच्या खालील थराच्या तुलनेत वर सरकतो. ही हालचाल त्या भागात दाब निर्माण झाल्यामुळे होते. नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) च्या अहवालानुसार, “हा दाब जास्त असल्यास त्सुनामी निर्माण होते.” यूएसजीएसने सांगितले की, कामचात्का भूकंपदेखील रिव्हर्स फॉल्टिंगचाच परिणाम होता. कामचात्का द्वीपकल्पाजवळ कुरिल-कामचात्का ट्रेंच (Kuril-Kamchatka Trench) आहे, हा ट्रेंच कामचात्का द्वीपकल्पाच्या सर्वांत खोल ठिकाणी म्हणजेच सुमारे १० किलोमीटर खोल असल्याचा अंदाज आहे. या भूगर्भीय हालचालींमुळे हा प्रदेश भूकंपीयदृष्ट्या अत्यंत अस्थिर आहे. या भागात पॅसिफिक प्लेट ओखोत्स्क प्लेटच्या खाली प्रत्येक वर्षी अंदाजे ८६ मिमी वेगाने सरकत असल्यामुळे आणि मेगाथ्रस्ट सीमेवरील दरडींमुळे ठरावीक कालावधीने भूकंप आणि उत्तर पॅसिफिक महासागरात त्सुनामी येतात.
  • तीव्रता (Magnitude) : त्सुनामी सामान्यतः ७.० रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपांमुळे निर्माण होतात. परंतु, सर्वांत विनाशकारी त्सुनामी सामान्यतः ८.० रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपांमुळे होतात. अशा प्रकारच्या त्सुनामी मोठ्या अंतरापर्यंत प्रवास करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवू शकतात. कामचात्का भूकंपाची तीव्रता ८.८ होती आणि हा भूकंप १९०० नंतरच्या सर्वांत शक्तिशाली भूकंपांपैकी एक होता.

रशियातील भूकंपामुळे अमेरिकेला त्सुनामीचा इशारा का देण्यात आला?

हा भूकंप बुधवारी सकाळी रशियाच्या पूर्वेकडील कामचात्का द्वीपकल्पावर झाला. भूकंपाची वेळ अंदाजे सकाळी ११.१४ वाजताची होती. परंतु, हजारो किलोमीटर दूर हवाईमध्ये आदल्याच दिवशी म्हणजे मंगळवारी मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या. याचे कारण म्हणजे या लाटांनी पॅसिफिक महासागरातील आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा (International Date Line) ओलांडली. २०११ मध्ये फुकुशिमामध्ये आलेल्या ९.१ तीव्रतेच्या भूकंपानंतर आलेला हा सर्वांत शक्तिशाली भूकंप होता. २०११ मधील भूकंपात १८,००० लोकांचा मृत्यू झाला होता आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, असे भूकंप सरासरी वर्षातून एकदाच होतात.

रशियामधील कामचात्का प्रदेश दोन प्रमुख सबडक्शन झोनजवळ आहे. तिथे पॅसिफिक प्लेट उत्तर अमेरिकन प्लेटच्या खाली सरकत आहे. हा भाग मोठ्या भूकंपांसाठी ओळखला जातो . या भागात १९५२ मध्ये एका भूकंपाची तीव्रता ९.० रिश्टर स्केल होती. अलीकडील भूकंपात कदाचित फॉल्ट लाइनच्या बाजूने मोठी हालचाल झाली असावी, असा अंदाज आहे. परिणामी समुद्राच्या तळाचा काही भाग वर सरकला आणि समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात वर ढकलले गेले. अशा प्रकारे त्सुनामी आली आणि ती पॅसिफिक महासागरातून अमेरिकेकडे सरकू लागली.

तज्ज्ञांनी सांगितले की, या लाटा अमेरिकेपर्यंत ५०० ते ८०० किलोमीटर प्रति तास वेगाने पोहोचल्या. त्यांचा वेग एका जेट विमानासारखा होता. परंतु, उथळ पाण्यात पोहोचल्यावर या लाटांचा वेग कमी झाला. या लाटांमुळे हवाई आणि पश्चिम किनारपट्टीचा भाग प्रभावित झाला. कारण- हा प्रदेश कामचात्का द्वीपकल्पाच्या थेट समोर होता. भूकंपाच्या सुमारे सहा तासांनंतर स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७.१० वाजता लाटा हवाईमध्ये पोहोचल्या. अलास्का आणि पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांनाही त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता.

अमेरिकेच्या कोणत्या भागांना फटका बसला? नुकसान किती झाले?

त्सुनामीच्या लाटांमुळे हवाई, अलास्का व अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांना फटका बसला. अधिकाऱ्यांनी हवाईसाठी स्थलांतराचे इशारे दिले. अमेरिकेतील ओआहू बेटाजवळ चार फुटांची लाट दिसली; तर माउईच्या काहुलुईमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त उंचीची लाट दिसली. हवाई काउंटीच्या हिलोमध्ये ४.५ फुटांची त्सुनामी लाट दिसली; तर हनाली गेजमध्ये ३.९ फुटांपर्यंतच्या लाटांची नोंद करण्यात आली. ओप्रानेही माउई काउंटीला मदत केली. असे सांगण्यात आले की, त्यांनी नागरिकांची मदत करण्यासाठी आपला खासगी रस्ता उघडला होता.