Cyber Attack on United States अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला झाल्याची माहिती नव्या तपासात समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह कोट्यवधी नागरिकांच्या डेटाची चोरी केल्याचा आरोप अमेरिकेने चीनवर केला आहे. अमेरिकेतील जवळजवळ प्रत्येक अमेरिकन व्यक्तीचा डेटा एका चिनी हॅकर गटाच्या हातात असण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनुसार, या चिनी हॅकर गटाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांच्यासारख्या व्यक्तींचाही डेटा चोरला असण्याची शक्यता आहे. तपासकर्त्यांचे म्हणणे आहे की, हा सायबर हल्ला खूपच मोठा आहे आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर त्यांना हा हल्ला यशस्वी करण्यात यश आले आहे. पण या हल्ल्यामागे नक्की कोण आहे? हा सायबर हल्ला किती गंभीर आहे? आणि त्याचा परिणाम कोणाकोणावर झाला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात…

हा सायबर हल्ला नेमका काय आहे?

  • गेल्या डिसेंबरमध्ये अनेक वृत्तसंस्थांनी बातमी दिली होती की ‘सॉल्ट टायफून’ (Salt Typhoon) नावाच्या चिनी हॅकर्सनी अमेरिकन दूरसंचार कंपन्यांमध्ये घुसखोरी करून अमेरिकन कॉल्सशी संबंधित डेटा चोरला आहे.
  • ‘रॉयटर्स’च्या एका वृत्तानुसार, हा सायबर हल्ला २०२२ मध्ये सुरू झाला होता. या सायबर हल्ल्यात मोठ्या संख्येने अमेरिकन लोकांचा ‘मेटाडेटा’ चोरीला गेल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.
  • यात जगभरातील कंपन्यांना हॅकर्सनी लक्ष्य केले होते, त्यात अमेरिकेतील किमान आठ दूरसंचार कंपन्यांचा समावेश आहे.
  • त्यावेळी सिनेट इंटेलिजन्स कमिटीचे अध्यक्ष व सिनेटचे सदस्य मार्क वॉर्नर यांनी याला आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वांत वाईट हॅकिंग, असे म्हटले होते. या हल्ल्यामुळे रशियन हॅकर्सनी केलेले आधीचे सायबर हल्ले बालिश खेळासारखे वाटतात, असेही ते म्हणाले होते.
हा हल्ला अत्यंत धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे आणि त्यामुळे जवळजवळ प्रत्येक अमेरिकन व्यक्तीची माहिती धोक्यात आली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हा हल्ला किती धोकादायक?

हा हल्ला अत्यंत धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे आणि त्यामुळे जवळजवळ प्रत्येक अमेरिकन व्यक्तीची माहिती धोक्यात आली आहे. अनेक महिन्यांच्या तपासानंतर अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, इटली, फिनलंड, स्पेन आणि इतर देशांतील अधिकाऱ्यांनी शोध लावला की, सायबर गुन्हेगारांनी जागतिक स्तरावर दूरसंचार, सरकार, वाहतूक, निवास आणि लष्करी पायाभूत सुविधांच्या नेटवर्कला लक्ष्य केले होते. एफबीआयच्या सायबर विभागाच्या माजी अधिकारी सिंथिया कैसर यांनी एका अमेरिकन वृत्तसंस्थेला सांगितले, “या हल्ल्याच्या व्याप्तीचा विचार केल्यास, कोणताही अमेरिकन नागरिक यातून वाचला असेल, असे मला वाटत नाही.”

तपासकर्त्यांनी असे नमूद केले आहे की, या हॅकिंगचा उद्देश चीनला त्यांच्या जगभरातील लक्ष्यांचे संभाषण व हालचाली ओळखण्यात मदत करणे आणि त्यांचा मागोवा घेण्याची क्षमता प्रदान करणे हा होता. या सायबर हल्ल्याच्या अनेक लक्ष्यांमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी वान्सदेखील होते. या हल्ल्याचा तपास करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी दूरसंचार आणि इंटरनेट सेवा कंपन्यांकडून डेटा चोरला. त्यांनी पुढे सांगितले की, या हल्ल्यामुळे चीन लक्ष्यित व्यक्तींचे फोन कॉल्स ऐकू शकले, मजकूर संदेश वाचू शकले आणि त्यांच्या डिव्हायसेसवरील स्थानिकरीत्या साठवलेल्या फाइल्समध्ये प्रवेश करू शकले.

या सायबर हल्ल्याचे लक्ष्य केवळ अमेरिकाच नाही. अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांनुसार, या सायबर हल्ल्याने किमान ८० देशांना धोका निर्माण केला आहे. या सायबर हल्ल्याबद्दल बोलताना तपासात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने फोर्ब्सला सांगितले, “ही फक्त सायबर घुसखोरी नाही.” एफबीआयचे वरिष्ठ सायबर अधिकारी ब्रेट लीदरमॅनदेखील म्हणाले, “अमेरिकेत आम्ही पाहिलेल्या सर्वांत गंभीर सायबर हेरगिरी हल्ल्यांपैकी हा एक आहे.”

तपासकर्त्यांनी असे नमूद केले आहे की, या हॅकिंगचा उद्देश चीनला त्यांच्या जगभरातील लक्ष्यांचे संभाषण व हालचाली ओळखण्याची आणि त्यांचा मागोवा घेण्याची क्षमता प्रदान करणे हा होता. (छायाचित्र-रॉयटर्स)

खरं तर, अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी सॉल्ट टायफून हॅकर्सनी निर्माण केलेला धोका एक राष्ट्रीय संरक्षण संकट म्हणून घोषित केला आहे. कारण- यामुळे जागतिक वेब ट्रॅफिक वाहून नेणाऱ्या मुख्य पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आहे. या सायबर हल्ल्याची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या हल्ल्यासाठी तीन खासगी चिनी कंपन्यांनी मदत केली. अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांनी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, या तीन कंपन्यांची नावे बीजिंग हुआन्यु तियानचियोंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सिचुआन झिशिन रुईजी नेटवर्क टेक्नॉलॉजी व सिचुआन ज्युक्सिनहे नेटवर्क टेक्नॉलॉजी अशी आहेत. जानेवारीमध्ये ट्रेझरी विभागाने सॉल्ट टायफूनच्या कारवायांवर सिचुआनमधील सिचुआन ज्युक्सिनहे नेटवर्क टेक्नॉलॉजीवर निर्बंध लादले होते.

या सायबर हल्ल्यामागे नक्की कोण?

तपासकर्त्यांनुसार, हा हल्ला सॉल्ट टायफून नावाच्या चिनी गटाचे काम आहे. या गटाला घोस्ट एम्परर (Ghost Emperor) किंवा फेमसस्पॅरो (FamousSparrow) यांसारख्या इतर नावांनीही ओळखले जाते. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, सॉल्ट टायफून हे नाव मायक्रोसॉफ्टच्या हॅकिंग गटांना नावे देण्याच्या एका पद्धतीवर आधारित आहे. सॉल्ट टायफून हे नाव चीनमधील हॅकर्ससाठी, ‘सँडस्टॉर्म’हे नाव इराणच्या हॅकर्ससाठी व ‘ब्लिझार्ड’ रशियाच्या हॅकर्ससाठी वापरले जाते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सॉल्ट टायफून मुख्यत्वे गुप्तचर लक्ष्यांवर केंद्रित असल्याचे दिसते; तर इतर हॅकिंग गट कॉर्पोरेट डेटा, पैसा किंवा इतर गुप्त माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ‘सॉल्ट टायफून’ला चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयाचा पाठिंबा असल्याचा पुरेसा पुरावा आहे. विशेष म्हणजे हा गट काही काळापासून अस्तित्वात आहे आणि त्याने यापूर्वीही अनेक हॅकिंग हल्ले केले आहेत. तज्ज्ञांच्या मते, ‘सॉल्ट टायफून’ने केलेला हा हल्ला चीनच्या सायबर क्षमतांच्या एका नव्या युगाची सुरुवात आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर प्रभाव पाडण्याची चीनची महत्त्वाकांक्षा दिसून येते.