– राहुल खळदकर
कृषीप्रधान देश अशी ओळख असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत मोसमी (मान्सून) पावसाचे मोठे योगदान आहे. मोसमी पावसावर भारताची कृषी व्यवस्था अवलंबून असून दरवर्षी शेतकरी आणि इतर नागरिकही त्याची वाट पाहात असतात. मोसमी पावसाच्या आगमनाची तारीख म्हणजे देशभरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदवार्ता ठरते. यंदा मोसमी पावसाचे आगमन वेळेपूर्वीच होणार असल्याने शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे.

मोसमी पावसाचे आगमन कसे कळते?

मोसमी पावसाचे आगमन भौगोलिक स्थितीमुळे कळते. वायव्य भारतातील कमीत कमी तापमानाची नोंद तसेच भारतीय प्रायद्वीप पठाराच्या दक्षिण भागातील (गंगा आणि यमुना नद्यांच्या क्षेत्रातील विशाल परिसर) पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण यावरून मोसमी पावसाचा अंदाज बांधला जातो. दक्षिण चीनच्या समुद्रावरील बहिर्गामी दीर्घतरंग विकिरण (ओएलआर) ज्याचा ओलावा आणि आर्द्रतेवर परिणाम होतो; याचा तसेच आग्नेय हिंद महासागरात खालील भागात क्षोभमंडलातील (ट्रोपोस्फिअर) हवेचा दाब, पूर्व भागातील भूमध्यरेखीय हिंद महासागराच्या भागातील क्षोभमंडलातील हवेचा दाब आणि नैर्ऋत्य प्रशांत महासागरातील बहिर्गामी दीर्घतरंग विकिरण आदी सर्व भौगोलिक परिस्थिती आणि नोंदींचा अभ्यास करून मोसमी पावसाच्या आगमनाचे संकेत दिले जातात. या सर्व अंदाजांना उपग्रहांद्वारे दिल्या जाणाऱ्या संदेशाची जोड असते.

हवामान विषयक अंदाज अचूक असतात का?

हवामान विभागाकडून प्रसृत केल्या जाणाऱ्या अंदाजांना काही वर्षांपूर्वी फारसे महत्त्व दिले जात नसे. पावसाच्या अंदाजावर कृषी क्षेत्र पूर्णपणे अवलंबून आहे. अंदाज चुकल्यामुळे सर्वाधिक नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असे. भारतीय हवामान विभाग आणि शास्त्रज्ञांना अमेरिका तसेच अन्य प्रगत देशांकडून मोसमी पावसाबाबतचे संदेश किंवा संकेत दिले जात असत. त्यावरून भारतीय संशोधक त्या गणितीय माॅडेल आणि हवामान बदलांचा अभ्यास करुन मोसमी पावसाचे अंदाज बांधत होते. सन २०१५ मध्ये मोसमी पावसाने चकवा दिला होता आणि भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले हाेते. हवामान विषयक अंदाज पूर्णपणे अचूक येण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी सखोल संशोधन केले. संशोधनातून अचूक अंदाज बांधता येणे शक्य झाले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हवामान विभागाचे अंदाज बऱ्यापैकी अचूक ठरले आहेत.

भारतीय माॅडेल प्रभावी का?

मोसमी पावसाच्या अंदाजात परदेशातून मिळणारी माहिती उपयुक्त असते. त्याबरोबरच भारतीय उपखंडातील भाैगोलिक परिस्थितींच्या नोंदी, अभ्यास, महासागरातील हवमानाची स्थिती आदी बाबींचा गणितीय माॅडेलमध्ये बऱ्याचदा पावसाचा अंदाज चुकायचा. २००४ नंतर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वत:चे माॅडेल विकसित केले. हे माॅडेल पूर्वीच्या अंदाजपद्धतीपेक्षा अधिक अचूक आहे. हवामान अंदाज देणारे भारतीय माॅडेल परदेशातील अंदाजांपेक्षा अधिक सरस आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गेल्या पाच वर्षांतील माेसमी पावसाच्या आगमनाचा अंदाज आणि मोसमी पाऊस प्रत्यक्ष आल्याची तारीख –

वर्ष आगमन अंदाज   प्रत्यक्ष आगमन

२०१७      ३० मे                   ३० मे

२०१८       २९ मे                  २९ मे

२०१९        ६ जून               ८ जून

२०२०   ५ जून                १ जून

२०२१        ३१ मे               ३ जून

यंदा मोसमी पावसाची वाट सुकर?

बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ शमल्यानंतर कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने माेसमी पावसाची वाट सुकर झाली आहे. त्यामुळे दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात वेळेपूर्वीच माेसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान दरवर्षी माेसमी पाऊस अंदमानात १८ ते २० मे दरम्यान दाखल होतो. यंदा अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचे आगमन लवकर होणार आहे.

यंदा पर्जन्यमान्य किती अपेक्षित?

जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८८०.६ मिमी पाऊस पडतो. यंदा पावसाची ९८ टक्के शक्यता आहे. यंदा गुजरातमध्ये नेहमीपेक्षा कमी पाऊस पडेल, तर पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात जास्त पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. इतकेच नाही, तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी की, यंदाचा पाऊस शेतीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. हवामान अंदाज देणाऱ्या खासगी स्कायमेट संस्थेने मोसमी पावसाचा अंदाज दिला आहे. त्यानुसार यंदा ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे.