चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील मोनोरेल गाडी मंगळवारी अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आणि मोठ्या संख्येने प्रवासी गाडीत दीड ते दोन तास अडकले. या प्रवाशांना अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडकीची काच तोडून सुखरूप क्रेनने बाहेर काढले आणि एक मोठी दुर्घटना टळली. मोनोरेल प्रकल्प आर्थिक तोट्यात असून प्रवाशी संख्याही मोनोरेलला मिळत नसल्याने या प्रकल्पास पांढरा हत्ती म्हटले जाते. अशात मोनोरेल गाड्या बंद पडण्याच्या, तांत्रिक बिघाडामुळे सेवा विस्कळीत होण्याच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मोनोरेल प्रकल्पाचा आणि १९ ऑगस्टच्या घटनेचा हा आढावा…
देशातील पहिली आणि एकमेव मोनोरेल
मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठी एमएमआरडीएने साधारणतः २००७-२००८ मध्ये मोनोरेल प्रकल्प आणला. एमएमआरमध्ये १८५ किमीचे मोनोरेलचे जाळे विणण्यासाठी मोनोरेल प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार अनेक मोनोरेल मार्गिकांची आखणी करण्यात आली. यातील पहिली मोनोरेल मार्गिका होती ती म्हणजे चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल. या पहिल्या मार्गिकेचे काम एमएमआरडीएने हाती घेतले. जिथे रेल्वे पोहचलेली नाही, जिथे बेस्ट बसची सुविधा पुरेशी नाही अशा ठिकाणीहुन मोनोरेल नेण्याचा निर्णय घेत त्या दृष्टीने मार्गिकेची आखणी करण्यात आली. दोन टप्प्यात ही मार्गिका बांधून पूर्ण करण्यात आली असून देशातील पहिली आणि एकमेव मोनोरेल मुंबईत धावत आहे. मात्र त्याच वेळी मोनोरेल १ चा २० किमीचा मार्ग वगळता अंदाजे १६५ किमीचा मोनोरेल प्रकल्प एमएमआरडीएने गुंडाळला. पहिली मोनोरेल मार्गिका अपयशी ठरत असल्याचे संकेत मिळाल्याबरोबर एमएमआरडीएने संपूर्ण प्रकल्प गुंडाळला. त्यामुळे मुंबईतील ही २० किमीची मोनोरेल मार्गिका असून देशातील पहिली आणि एकमेव ठरली आहे.
कशी आहे मार्गिका?
बेस्ट बसही पुरेशा संख्येने ज्या परिसरात जात नाही, अशा परिसरातून मोनोरेल मार्गिका नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशा २० किमीच्या मोनोरेल मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले. चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक अशा दोन टप्प्यांत मार्गिकेची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चेंबूर ते वडाळा असा ८.९३ किमीचा पहिला टप्पा पूर्ण करत ४ फेब्रुवारी २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा ११.२० किमीचा टप्पा २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हा टप्पा रखडला आणि अखेर फेब्रुवारी २०१९ मध्ये हा टप्पा पूर्ण झाला. १७ स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेवर चार डब्यांची मोनोरेल धावू लागली. २४६० कोटी रुपये खर्च करत देशातील पहिली मोनोरेल मार्गिका उभारण्यात आली. एका मोनोरेल गाडीची प्रवाशी संख्या ५६२ अशी आहे.
२०१७ मध्ये मोनोरेल गाडी जळून खाक?
मोनोरेल सेवेत दाखल झाली खरी, पण प्रवाशांचा प्रतिसादच न मिळाल्याने ही सेवा तोट्यात आहे. मोनोरेलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरू आहेत. पण दुसरीकडे मोनोरेल बंद पडण्याच्या, तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मोनोरेलच्या संचलन, व्यवस्थापन आणि देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी स्कोमी आणि एल अँड टी कंपनीकडून काढून स्वतकडे घेतल्यानंतरही मोनोरेल गाडीतील तांत्रिक बिघाड होण्याचे प्रकार रोखण्यात एमएमआरडीएला यश आलेले नाही. मोनोरेल गाड्या अल्पावधीतच खराब झाल्या आहेत. त्यामुळे सातत्याने दुर्घटना घडताना दिसतात. दरम्यान मोनोरेल प्रकल्पाची जबाबदारी स्कोमी, एल अँड टीकडे असताना २०१७ मध्ये मोनोरेलच्या डब्याला आग लागली. या आगीत मोनोरेल अक्षरशः जळून खाक झाली. या दुर्घटनेमुळे तब्बल नऊ महिने मोनो बंद होती. याचाही मोठा आर्थिक फटका एमएमआरडीएला बसला. या घटनेनंतरच एमएमआरडीएने मोनोरेल प्रकल्प खासगी कंपनीकडून काढून स्वतःकडे घेतला. तर सध्याच्या गाड्या या परदेशी बनावटीच्या असून त्याची दुरुस्ती करणे अवघड ठरते. त्यामुळे आता मोनोरेलच्या ताफ्यात देशी बनावटच्या १० मोनोरेल गाड्या डिसेंबरपर्यंत दाखल केल्या जाणार आहेत. यातील सात गाड्या मुंबईत दाखल झाल्या असून त्यांच्या चाचण्या सुरु आहेत.
मोठी दुर्घटना टळली?
मागील चार दिवसांपासून मुंबईत अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसातही मोनोरेलची सेवा सुरळीत सुरु होती. मात्र मंगळवारी सायंकाळी चेंबूरवरून निघालेली मोनोरेल म्हैसूर कॉलनी स्थानकानजीक अचानक थांबली. वीजपुरवठा खंडित झाल्याने ती मध्येच थांबली. या घटनेची माहिती मिळताच एमएमआरडीए आणि मोनोरेलच्या संचलनाची जबाबदारी असलेल्या महामुंबई मेट्रो ऑपरेशन काॅर्पोरेशन लिमिटेडचे (एमएमएमओसीएल) अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहचले. गाडीतून प्रवाशांना काढणे हे महत्त्वाचे होते. त्यासाठी ट्रॅकवर दुसरी गाडी आणण्यात आली. प्रवाशांना बाहेर काढत या गाडीने स्थानकावर नेण्यात येणार होते. मात्र मोनोरेल गाडीचे दरवाजेच उघडत नसल्याने अधिकाऱ्यांना प्रवाशांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. दरम्यान येथे पोलीस, अग्निशमन दल आणि पालिकेचे पथक दाखल होते. अग्निशमन दलाने पुढाकार घेत क्रेन आणली आणि गाडीची एक काच तोडून प्रवाशांना बाहेर काढले. दीड तासाहून अधिक काळ प्रवाशी बंद गाडी असल्याने अनेकांना गुदमरल्यासारखे होत होते. मात्र बाहेर पडल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. तर अग्निशमन दलामुळे एक मोठी दुर्घटना टळली.
चौकशीनंतर कारण स्पष्ट होणार?
मोनोरेलची घटना तांत्रिक बिघाडामुळे, गाडीचा वीज पुरवठा खंडित झाल्याने घडल्याचे एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे. मात्र याचे खरे कारण काय हे आता चौकशीनंतर स्पष्ट होईल. याप्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार एमएमआरडीएकडून चौकशी झाल्यानंतर गाडी बंद का पडली याचे कारण आणि यासाठी दोषी कोण हे समजेल.