भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून ८ मे रोजी ड्रोनहल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भारतीय सैन्याने हे सर्व हल्ले हाणून पाडले. मात्र, पाकिस्तानकडून पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे. भारतीय सशस्त्र दलांनी त्यांचा हा हल्लादेखील हाणून पाडला. सीमावर्ती भागात तोफखाना, ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या व्यापक संघर्षाचा भाग असलेली ही घटना उच्च लष्करी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या अनेक विधानांनंतर उघडकीस आली आहे. पूर्वतयारी, अचूक बुद्धिमत्ता आणि भारताजवळील आधुनिक हवाई संरक्षण प्रणालींच्या तैनातीच्या परिणामस्वरूपी भारताने या धोक्यांना यशस्वीपणे रोखले आहे. पाकिस्तानने या हल्ल्यात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतातील धार्मिक संस्थांना लक्ष्य केले. पाकिस्तानचा हा हल्ला भारतीय सैन्याने कसा हाणून पाडला? पाकिस्तानने सुवर्णमंदिराला लक्ष्य का केले? या हल्ल्याबाबत लष्करी अधिकाऱ्यांनी काय खुलासा केला? त्याविषयी जाणून घेऊयात.
पाकिस्तानने सुवर्णमंदिराला लक्ष्य का केले?
नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तणाव वाढत असताना भारतीय गुप्तचर संस्थांना असे संकेत मिळाले होते की, कायदेशीर लष्करी लक्ष्ये नसणारे पाकिस्तानी सैन्य भारतातील धार्मिक आणि नागरी स्थळांवर हल्ला करण्याची तयारी करीत आहेत. या गुप्तचर माहितीमधून समोर आलेल्या सर्वांत प्रमुख लक्ष्यांपैकी एक म्हणजे अमृतसरमधील सुवर्णमंदिर. हे मंदिर शीख धर्मातील सर्वांत पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे. १५ व्या इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्री यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने नागरी आणि धार्मिक स्थळांवर हल्ले करून प्रतीकात्मक आणि मानसिक नुकसान करण्याचा हेतू ठेवला होता.

“त्यांच्याकडे लक्ष्य करण्यासाठी ठरावीक असे लक्ष्य नाही हे माहीत असल्याने, आम्ही अंदाज बांधला की, ते भारतीय लष्कराचे तळ, नागरी वस्त्या यांसह धार्मिक स्थळांना लक्ष्य करतील. त्यापैकी सुवर्णमंदिर हे सर्वांत ठळक लक्ष्य असल्याचे दिसून आले. सुवर्णमंदिराला संपूर्ण एअर डिफेन्स अम्ब्रेला कव्हर देण्यासाठी आम्ही अतिरिक्त आधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केली”, अशी माहिती त्यांनी ‘एएनआय’ला दिली. ८ मे रोजी पहाटे पाकिस्तानने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचा वापर करून हवाई हल्ला केला गेला होता.
“हा मोठा हवाई हल्ला अंधाराच्या वेळी झाला आणि तो थेट नागरी वस्ती व संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करून करण्यात आला. त्यामध्ये सुवर्णमंदिर हे लक्ष्यांच्या यादीत सर्वांत वर होते. “आम्हाला याची पूर्वकल्पना असल्याने आम्ही पूर्णपणे तयार होतो. आमच्या धाडसी व सतर्क लष्कराच्या हवाई संरक्षण गनर्सनी पाकिस्तानी सैन्याच्या नापाक योजना उधळून लावल्या आणि सुवर्णमंदिराला लक्ष्य केलेले सर्व ड्रोन्स व क्षेपणास्त्रे हाणून पाडली. अशा प्रकारे पवित्र सुवर्णमंदिरावर एकही ओरखडा येऊ दिला नाही,” असे ते म्हणाले.
सुवर्णमंदिरावरील हल्ला कसा केला निकामी?
पाकिस्तानच्या अयशस्वी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालींनी हे हल्ले कसे निष्प्रभ केले हे दाखविण्यासाठी एक सविस्तर प्रात्यक्षिक आयोजित केले. अमृतसर आणि पंजाबमधील इतर भागांवरून येणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र प्रणालींना रोखण्यात स्वदेशी आकाश क्षेपणास्त्र प्लॅटफॉर्म आणि एल-७० एअर डिफेन्स गन यांसारख्या प्रणालींनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रात्यक्षिकातून हल्ल्याच्या परिस्थितीत अगदी अचूकतेने हवाई लक्ष्ये शोधण्याची, त्यांना ट्रॅक करण्याची आणि त्यांच्यावर हल्ला करण्याची या प्रणालींची क्षमता दिसून आली. योग्य प्रतिसादामुळे केवळ सुवर्ण मदिराचेच संरक्षण झाले नाही, तर पंजाबच्या इतर भागांनाही संरक्षण मिळाले. भारतीय हवाई संरक्षण दलांनी कोणतेही नुकसान होण्यापूर्वीच सर्व क्षेपणास्त्रे यशस्वीरीत्या नष्ट केली.
पाकिस्तानने धार्मिक स्थळांना कसे केले लक्ष्य?
भारताचे ऑपरेशन सिंदूरमधील हल्ले केवळ दहशतवादी पायाभूत सुविधांवर केंद्रित होते; परंतु पाकिस्तानने पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन स्वीकारला. पत्रकार परिषदेत भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी खुलासा केला की, पाकिस्तानी सैन्याने भारतातील धार्मिक स्थळांवर गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यामागे जातीय हिंसाचार भडकवण्याचा आणि आंतरराष्ट्रीय धारणा बदलण्याचा त्यांचा हेतू होता. मिस्री म्हणाले, “पाकिस्तान प्रार्थनास्थळांना लक्ष्य करीत असल्याचे आणि गोळीबार करीत असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यामध्ये गुरुद्वारा, कॉन्व्हेंट आणि मंदिरे यांचा समावेश आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “पाकिस्तान जातीय सलोखा बिघडवण्याच्या आणि विवाद निर्माण करण्याच्या उद्देशाने परिस्थितीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, भारताची सामाजिक एकता मजबूत आणि अढळ आहे”.
सुवर्णमंदिरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्याच दिवशी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील गुरुद्वारावर पाकिस्ताने गोळीबार केला. या हल्ल्यात तीन शीख नागरिकांचा मृत्यू झाला. हा हल्ला नियंत्रण रेषेवर झालेल्या तोफखाना आणि तोफगोळ्यांच्या हल्ल्याचा एक भाग होता. या हल्ल्यांमध्ये किमान १३ नागरिकांनी आपले जीव गमावले आणि ५९ जण जखमी झाले. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश होता. पुन्हा केलेल्या हल्ल्यांमध्ये पूंछमधील क्राइस्ट स्कूलजवळ गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात दोन विद्यार्थी ठार झाले आणि त्यांचे पालक जखमी झाले. तसेच मेरी इमॅक्युलेटच्या कार्मेलाइट्सच्या कॉन्व्हेंटचे नुकसान झाले.
मुख्य म्हणजे मिस्री यांनी मुझफ्फराबादमधील बिलाल मशिदीसारख्या धार्मिक स्थळांवर भारताने हल्ला केल्याचे पाकिस्तानी माध्यमांचे दावेही फेटाळून लावले. त्यांनी म्हटले, “पाकिस्तानात भारताकडून नानकाना साहिब गुरुद्वाराला लक्ष्य करून ड्रोनहल्ल्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दावे खोटे आहेत आणि पाकिस्तानच्या चुकीच्या माहिती मोहिमेचा एक भाग आहे.” ऑपरेशन सिंदूर हे केवळ दहशतवादी तळांपुरते मर्यादित होते आणि त्यात कोणत्याही बिगरलढाऊ पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही, असे ते म्हणाले.
बोलताना मेजर जनरल शेषाद्री यांनी सांगितले की, लष्कराने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांना अचूकतेने लक्ष्य केले. त्यामध्ये मुरिदके व बहावलपूर येथील दहशतवादी संघटनांची मुख्यालये यांचा समावेश होता. ते पुढे म्हणाले, “या (नऊ) लक्ष्यांपैकी लाहोरच्या जवळ असलेल्या मुरिदके येथील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद (जेईएम)चे मुख्यालय यांवर अचूकतेने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर ताबडतोब एक निवेदन जारी करीत आम्ही जाणीवपूर्वक कोणत्याही पाकिस्तानी लष्कर किंवा नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले नाही हे स्पष्ट केले”.