दीपावली पर्वात जळगावची सुवर्णनगरी देशभरातील ग्राहकांना आकर्षित करत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा सोन्याचे दर अधिक असूनही धनत्रयोदशीच्या एकाच दिवशी ग्राहकांनी जिल्ह्यात १०० किलोपेक्षा अधिक सोने खरेदी केल्याचे व्यावसायिक सांगतात. दीपावलीत पारंपरिक ग्राहकांबरोबर लग्नसराईच्या खरेदीसाठी मुहूर्त साधला जात आहे. पावणेदोनशे वर्षाची परंपरा लाभलेली सुवर्णनगरी खरेदीचे आजवरचे विक्रम मोडीत काढण्याच्या मार्गावर आहे.

सुवर्ण बाजारातील सद्यःस्थिती काय?

देशभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावमध्ये सोने खरेदीसाठी नेहमीच गर्दी असते. नवरात्रोत्सवापासून सुरू झालेला सोने खरेदीचा उत्साह अद्याप कायम आहे. धनत्रयोदशीला सोने प्रतितोळा ६१ हजार रुपयांवर असतानाही ग्राहकांचा प्रतिसाद लाभला. अनेक ग्राहकांनी दीपावलीत दागिने खरेदीसाठी आगाऊ पैसे भरून नोंदणी केली आहे. सराफी पेढीत ग्राहकांना अर्ध्या ग्रॅमपासून विविध प्रकारच्या आकर्षक दागिन्यांसह देवीच्या मूर्तीही उपलब्ध आहेत. लग्नघरांतूनही मुहूर्त साधत वधू-वरांसाठी दागिन्यांची खरेदी केली जात आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहता यंदा दागिने विक्रीचे सर्व विक्रम मोडण्याची शक्यता सराफ व्यावसायिक वर्तवितात. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर बाजारपेठ चांगलीच गजबजली होती. जिल्ह्यात एकाच दिवसात १०० किलोपेक्षा अधिक सोने विक्री होऊन कोट्यवधींची उलाढाल झाली.

cold water sold in the name of mineral water
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म
Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…

ग्राहकांची जळगावला पसंती का?

सोने खरेदीसाठी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर, लगतच्या गुजरात, मध्य प्रदेशसह देशभरातील ग्राहक जळगावला प्राधान्य देतात. शुद्धता, विश्वासार्हता व सचोटी या त्रिसूत्रीवर या ठिकाणी काम होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जाते. या बाजाराचे आपले म्हणून एक वेगळेपण आहे. काही पेढ्यांमधून खरेदी केलेल्या दागिन्यांसाठी तो परत करताना अथवा नवीन दागिना खरेदी करताना घडणावळ धरली जात नाही. त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होत नाही. दागिन्यांचे नावीन्यपूर्ण प्रकार, सोने देण्या-घेण्याचा चोख व्यवहार हे आणखी एक वैशिष्ट्य. सोन्याच्या दागिन्यांचे मजुरी दर तुलनेत कमी असते. सोने व्यापारात जळगाव राज्यात द्वितीयस्थानी आहे. सुवर्णनगरीत दिवसाला परराज्यांतून तीसपेक्षा अधिक कुटुंबे केवळ दागिने खरेदीसाठी येतात.

बाजाराचा विस्तार कसा झाला?

जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेला तब्बल १७५ वर्षांची परंपरा आहे. देशातील सर्वात जुनी बाजारपेेठ म्हणून तिची गणना होते. १८५४ मध्ये राजमल लखीचंद ज्वेलर्सने जळगावच्या सराफ बाजाराची मुहूर्तमेढ रोवली. पुढील ५० वर्षे जिल्ह्यात अवघ्या २० ते २२ सुवर्णपेढ्या होत्या. त्यानंतरच्या काळात हळूहळू वाढ झाली. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचे तत्त्व व्यावसायिकांनी कटाक्षाने पाळल्याने देशातील सोन्याची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ती नावारूपास आली. आजमितीस जळगाव शहरात काही सुवर्ण मॉल्ससह सुमारे हजारावर सुवर्णपेढ्या आहेत, तर जिल्ह्याची आकडेवारी अडीच हजारांवर आहे.

हेही वाचा… विश्लेषण: बिहारमध्ये आरक्षणात वाढ का? अन्य राज्यांत त्याचे परिणाम काय?

जळगावातून सुवर्ण दालन संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. जुन्या पेढ्यांनी नवे व भव्य दालन उभारले. शहरातील काही व्यावसायिकांनी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आपला व्यवसाय विस्तारला. जळगावच्या बाजारपेठेकडील ग्राहकांचा कल पाहून बाहेरील बड्या सराफ पेढ्यांनी जळगावमध्ये आपला व्यवसाय थाटल्याचे दिसून येते.

सोने खरेदी वाढण्याची कारणे काय?

सोन्याला पारंपरिक महत्त्व आहे. पूर्वापार एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. गेल्या पाच-सहा वर्षांत दरातील चढ-उतारामुळे यातील गुंतवणूक अल्पमुदतीसाठी फायदेशीर ठरल्याचे सांगितले जाते. सोने खरेदी वाढण्याची अनेक कारणे आहेत. आगामी काळात लग्नसराई सुरू होत आहे. त्यानिमित्तानेही सोने खरेदी केली जात आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून तर, महिला आवड म्हणून सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. सद्यःस्थितीत पावसाअभावी दुष्काळी स्थिती आहे. दीपावलीत खरिपातील शेतीमालही घरात येतो. सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तूर आदी खरिपातील थोड्याफार आलेल्या कृषी उत्पादनांसह केळी विक्रीतून काही जणांकडे पैसा खेळता आहे. त्यांच्याकडूनही काही प्रमाणात सोने खरेदी झाली असून, नोकरदारांनी दीपावलीसाठी मिळालेल्या सानुग्रह अनुदानातून २० ते २५ टक्के गुंतवणूक सोन्यात केल्याचे सांगण्यात आले.

दागिने खरेदीचा कल कसा बदलत आहे?

ग्राहकांना दागिन्यांची रचना दाखवून नोंदणी करून काही दिवसांनंतर दागिना घडवून देण्याची पद्धत दोन ते अडीच दशकांपूर्वी प्रचलित होती. साधारणत: १९९० च्या दशकापासून घडविलेले दागिनेच विक्रीला ठेवून त्यातून हातोहात पसंती व विक्री होऊ लागली. अलीकडच्या काळात कारागिरांकडून सोन्याचे दागिने घडवून घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे. यामागे दागिने घडवून व हव्या त्या अंदाजपत्रकात दागिने बनविणे शक्य होत असल्याचे सराफांकडून सांगितले जाते. त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची मागणी वाढली. कारागिराकडे दागिने घडवून घेताना जुन्या दागिन्यांच्या वजनाएवढेच नवीन दागिने देण्याची प्रथा सराफा बाजारात सुरू झाली. सध्याच्या युगात यूट्यूबच्या माध्यमातून रचना दाखवून मनासारखे तसेच्या तसे दागिने घडवून घेताना ग्राहक विशेषतः महिला, युवती दिसून येत आहेत. ग्राहकांना दागिना निवडीसाठी घडविलेले दागिने उपलब्ध करून देताना वजन व रचना या दोन गोष्टींचा विचार केला जातो.

रोजगार निर्मिती, सुवर्ण पर्यटनात वाढ कशी?

परदेशातून आयात केलेली सोन्याची बिस्किटे देशभरातील सुवर्णपेढ्यांसह दागिने निर्मिती कारखान्यांत पाठवली जातात. जळगावात सुमारे ५० हून अधिक दागिने निर्मितीचे कारखाने आहेत. या ठिकाणी राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगालसह इतर राज्यातील अडीच हजारहून अधिक कारागीर काम करतात. पेढ्यांमधील कारागीर वेगळे आहेत. सुवर्ण बाजारातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहा हजारहून अधिक जणांना रोजगार मिळतो. देशभरातून खरेदीला येणाऱ्या ग्राहकांमुळे सुवर्ण पर्यटनाला चालना मिळत आहे. स्थानिक पातळीवरील निवास व हॉटेल व्यवस्थेचा व्यवसाय बहरला आहे. दागिने जिल्ह्यासह परराज्यांत पाठविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही निर्माण झाली आहे. परिणामी सुवर्णनगरीतील उलाढाल वाढली आहे.