मलेरियावर प्रतिबंध घालण्यात भारताला मोठे यश मिळाले आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मलेरियासाठी AdFalciVax नावाची एक स्वदेशी लस तयार केली आहे. भुवनेश्वर इथल्या प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्राने एक प्रगत मलेरिया लस विकसित केली आहे. ही लस लोकांमध्ये प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम संसर्ग रोखण्यात प्रभावी ठरू शकते. ही लस प्रामुख्याने प्लास्मोडियम फाल्सीपेरमच्या दोन भागांना लक्ष्य करते. हा माणसात मलेरियाचा सर्वात सामान्य स्त्रोत आहे. असं असताना भारतात हा रोग प्लास्मोडियम व्हिवाक्समुळे पसरतो आणि त्याविरुद्धच AdFalciVax ही लस प्रभावी आहे.

ही लस महत्त्वाची का आहे?

मलेरिया हा डासांद्वारे पसरणारा एक परजीवी संसर्ग आहे. यामध्ये साधारणपणे ताप, थंडी वाजून येणे, रात्री घाम येणे, मळमळ, उलट्या आणि अतिसार अशी लक्षणे दिसतात. काही प्रकरणांमध्ये या संसर्गामुळे झटके येणे, फुप्फुसात द्रवपदार्थ जमा होणे, अवयवांचे नुकसान होणे आणि मृत्यू असे गंभीर परिणाम ओढवू शकतात. लाखो लोकांचा बळी घेणारा मलेरिया हा मानवी इतिहासातील सर्वात घातक आजारांपैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, हा आजार दरवर्षी सुमारे चार लाख लोकांचा बळी घेतो. आफ्रिकेत मलेरियाचा संसर्ग सर्वात जास्त प्रमाणात आहे. दरवर्षीच्या आकडेवारीपैकी ५० टक्के मृत्यू नायजेरिया, काँगो, टान्झानिया, मोझाम्बिका, नायजर आणि बुर्किना फासो या भागांत होत आहेत.

भारतातही मलेरियाचे प्रमाण मोठे आहे. अलीकडच्या काळात भारतात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये झपाट्याने घट झाली आहे. राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम (NVBDCP)नुसार, १९९५ मध्ये मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या १,१५१ होती आणि २०२० मध्ये ती फक्त ९३ आणि २०२२ मध्ये ८३ इतकी खाली आली होती. WHO च्या जागतिक मलेरिया अहवालात, २०२२ मध्ये भारतात या आजारामुळे ५,५११ मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. मलेरियाचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञ गेल्या काही दशकांपासून लस विकसित करण्यासाठी काम करत आहेत. मात्र, त्यांना मर्यादित यश मिळाले. अलीकडेच RTS,S आणि R21 या दोन्ही लसी वापरासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचा प्रभाव ७५ टक्क्यांनी कमी आहे, त्यामुळे आयसीएमआरच्या या नवीन लसीमुळे या आजाराविरुद्धच्या लढाईत नवीन आशा निर्माण झाली आहे.

AdFalciVax लस कशी काम करते?

AdFalciVax ही लस एक काइमेरिक रीकॉम्बनंट लस आहे. ही लस जगातील सर्वात धोकादायक मलेरिया परजीवी, म्हणजेच प्लाझ्मोडियम फाल्सीपेरमच्या वेगवेगळ्या भागांना लक्ष्य करून प्रथिने तयार करते. ही प्रथिने इंजेक्शन दिल्यानंतर रोगप्रतिकारक प्रतिसादाला चालना देतात. AdFalciVax दोन वेगवेगळ्या प्रकारे संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी दोन प्रकारचे लक्ष्य प्रथिने वापरते, ज्यांचे लसीकरण झाले आहे त्या व्यक्तीमध्ये संसर्ग रोखण्यासाठी ते सर्कमस्पोरोझोइट प्रथिने (सीएसपी) वापरली जातात. सीएसपी परजीवीच्या स्पोरोझोइट टप्प्यात (म्हणजे जेव्हा एक परजीवी नवीन संक्रमण करू शकतो) आणि यकृत टप्प्यात (म्हणजे जेव्हा एक परजीवी यकृत पेशींमध्ये प्रवेश करतो आणि नंतर लाल रक्तपेशींना संक्रमित करतो) तयार होतो.

प्रादेशिक मेडिकल रिसर्च सेंटरमधील लसीच्या विकासाचे प्रकल्प व्यवस्थापक सुभाष सिंग यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “या टप्प्यांत निर्माण होणारी रोगप्रतिकारक प्रतिक्रिया लसीकरण केलेल्या व्यक्तीला संसर्ग होण्यापासून वाचवते.” ही लस प्लाझ्मोडियम फाल्सीपेरमद्वारे उत्पादित केलेल्या दोन वेगवेगळ्या प्रथिनांच्या भागांचे मिश्रण असलेल्या प्रो६सी प्रथिनाचादेखील वापर करते. हे प्रथिन संसर्ग पसरण्यापासून रोखते. प्रो६सी प्रथिन रोगजनकाच्या संक्रमणात व्यत्यय आणून रोगाचा पुढील प्रसार थांबवते अशी माहिती सिंग यांनी दिली.

AdFalciVaxचे फायदे काय आहेत?

RTS,S आणि R21 या लसी फक्त सीएसपी प्रथिने वापरतात आणि फक्त लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये संसर्ग रोखू शकतात. त्यामुळे आयसीएमआरची ही नवीन लस संसर्गापासून उत्तम संरक्षण देण्याची शक्यता आहे, असे सिंग यांनी सांगितले. संशोधकांना असे आढळले की, AdFalciVaxमुळे उंदरांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त संरक्षण दिले आहे. या लसीच्या अद्याप मानवी चाचण्या झालेल्या नाहीत आणि प्राथमिक निकाल केवळ प्राण्यांच्या चाचणीवर आधारित आहेत. अभ्यासातून असेही दिसून आले की, AdFalciVax एक रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करते, जी इतर दोन लसींपेक्षा जास्त काळ संरक्षण देऊ शकते.

“सध्या अस्तित्वात असलेल्या लसींमधील एक आव्हान म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी काळ टिकते. चार प्राथमिक डोस घेतल्यानंतरही लोकांना पाचवा बूस्टर डोस आवश्यक असतो. मानवांमध्ये हे कसे काम करेल हे आम्हाला अद्याप ठाऊक नाही. मात्र, प्राथमिक संकेत असे सांगतात की, आयसीएमआरच्या या लसीच्या तीन डोसने तीन महिन्यांहून अधिक काळ उंदरांमध्ये संसर्गाविरुद्ध उत्तम संरक्षण निर्माण केले. हा काळ म्हणजे मानवी आयुष्यातील अंदाजे एक दशक आहे”, अशी माहितीदेखील सिंग यांनी दिली.

महत्त्वाचे मुद्दे:

  • भारतात विकसित झालेली ही पहिली स्वदेशी मलेरिया लस
  • ती प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम विरोधात परिणामकारक आहे
  • ही लस उच्च तापमानातही टिकते, त्यामुळे साठवण व वाहतुकीसाठी अधिक सोयीची
  • ‘मलेरिया-मुक्त भारत 2030’ या उद्दिष्टपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण योगदान

AdFalciVax मध्ये एक सहायक घटकदेखील आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसीमध्ये फिटकरीचा वापर केला आहे. सिंग यांनी सांगितले की, फिटकरीचा वापर फायदेशीर आहे, कारण त्यामुळे दीर्घकालीन दाह होण्याचा धोका नाही. गेल्या काही वर्षांत बालपण लसीकरण कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या असंख्य लसींमध्ये फिटकरीचा वापर केला जात आहे. याचा आणखी एक फायदा म्हणजे AdFalciVaxमधील फिटकरी खोलीच्या तापमानावर किमान नऊ महिने स्थिर राहू शकते. यामुळे कोल्ड चेनशिवायही लसीची वाहतूक करणे शक्य आहे.

खाजगी कंपन्यांसाठी आयसीएमआरच्या अटी काय आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयसीएमआरला या लसीसाठी अशा कंपन्यांशी भागीदारी करायची आहे, ज्या ही लस आणखी उत्तमरित्या विकसित करू शकतात. तसंच या लसीच्या मानवी चाचण्या करून व्यावसायिक उत्पादन वाढवू शकतील. निवड केलेल्या खाजगी कंपनीसोबत आय़सीएमआरने या लसीचे तंत्रज्ञान शेअर केले तरी बौद्धिक संपदा हक्क त्यांच्याकडेच राहतील. सहकार्यादरम्यान निर्माण झालेले कोणतेही बौद्धिक संपदा हक्क आयसीएमआर आणि कंपनीकडे संयुक्तपणे असतील. आयसीएमआरला लसीच्या कोणत्याही विक्रीवर दोन टक्के रॉयल्टीदेखील मिळेल. लसीसंदर्भातील सर्व डेटा आयसीएमआर आणि निवडलेल्या खाजगी कंपनीच्या संयुक्त मालकीचा असेल.