जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून पाकिस्तानविरोधात मोठे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (सीएसएस) बैठक पार पडली. या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह अटारी बॉर्डर तत्काळ प्रभावाने बंद करण्यात आली, पाकिस्तानी नागरिकांना मिळणारा सार्क व्हिसा रद्द करण्यात आला, पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील लष्करी, नौदल व हवाई सल्लागारांना ‘पर्सना नॉन ग्राटा’ घोषित करण्यात आले आणि उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यावर प्रत्युत्तर देत भारताने घेतलेले हे निर्णय एकतर्फी असल्याची टीका पाकिस्तानकडून करण्यात आली आणि पाकिस्तानकडूनदेखील भारताविरोधात काही निर्णय घेण्यात आले. त्यातील एक निर्णय म्हणजे भारतीय विमानांसाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेशास मनाई. पाकिस्तानने भारतातील विमान वाहतूक क्षेत्राला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. परंतु, हा निर्णय पाकिस्तानवरच उलटल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केल्याने कोट्यवधींचा फटका पाकिस्तानला बसणार आहे. त्यामागील कारण काय? पाकिस्तानवर या निर्णयाचा काय परिणाम होणार? या निर्णयानंतर भारताला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार? त्याविषयी जाणून घेऊ.

पाकिस्तानला स्वतःच्याच निर्णयाचा फटका
पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद करण्याचे पाऊल भारतासमोर समस्या निर्माण करण्यासाठी उचलले असले तरी प्रत्यक्षात त्यामुळे पाकिस्तानला लाखो डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागणार आहे आणि त्याचा परिणाम थेट पाकिस्तानला मिळणाऱ्या विमान वाहतूक महसुलावर होणार आहे. भारतीय विमाने आता पाकिस्तानवरून जात नसल्याने, त्या हवाई क्षेत्रातून जाणाऱ्या भारतीय विमानांकडून आकारण्यात येणारे ओव्हरफ्लाइट शुल्क आता पाकिस्तानला मिळणार नाही. एका पाकिस्तानी वापरकर्त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये एक भारतीय विमान पाकिस्तानऐवजी लांबचा मार्ग निवडत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर त्याने म्हटले आहे की, हा भारताबरोबर वैर घेण्याचा परिणाम आहे.
याच पोस्टवर प्रतिक्रिया देत एक्स वापरकर्ता नरेन मेनन यांनी पाकिस्तानच्या या निर्णयाचा आर्थिक परिणाम काय होईल, त्याविषयी लिहिले आहे. त्यांनी लिहिले, “जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या आणि सर्वांत वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक बाजारपेठेतून आता पाकिस्तानला ‘ओव्हरफ्लाइट फी’ मिळणार नाही. दरवर्षी ‘ओव्हरफ्लाइट फी’द्वारे पाकिस्तानला शेकडो दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळत होते. मानवजातीच्या इतिहासात कोणी कधीही इतका मोठा मूर्खपणा केलेला नाही.” मेनन यांनी स्पष्ट केले की, हवाई क्षेत्र बंद केल्याने भारतातून युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे मोठ्या संख्येने जाणारी उड्डाणे वेगळा मार्ग निवडतील, जे पाकिस्तानसाठी चांगलेच महागडे ठरेल. मेनन यांनी म्हटले की, भारतातून पश्चिमेकडे जाणारी बहुतेक उड्डाणे एअर इंडिया आणि इंडिगोसारख्या भारतीय विमान कंपन्यांद्वारे चालवली जातात. त्यामुळे पाकिस्तानला कोट्यवधींची ओव्हरफ्लाइट फी गमवावी लागणार आहे.
भारतीय विमान कंपन्यादेखील पर्यायी मार्ग निवडावा लागत असल्याने इंधन खर्च वाढणार असून उड्डाणांच्या वेळेतही वाढ होणार आहे. मात्र, पाकिस्तानला थेट त्यांच्या विमान उत्पन्नाला फटका बसणार आहे. ही परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झालेली नाही. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने जुलै २०१९ मध्ये वृत्त दिले होते की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केल्याने त्यांचे जवळजवळ १०० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले होते. त्या काळात दररोज होणारी सुमारे ४०० उड्डाणे आणि पाकिस्तानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरण (सीएए) व पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमान कंपनी (पीआयए)वर त्या निर्णयाचा विपरीत परिणाम झाला होता.
अभ्यासातून असे समोर आले आहे की, पाकिस्तानवरून उड्डाण करणाऱ्या बोईंग ७३७ विमानाला ओव्हरफ्लाइट शुल्काच्या स्वरूपात सुमारे ५८० डॉलर्स द्यावे लागत होते. मोठ्या विमानांसाठी हे शुल्क आणखी जास्त होते. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार २०१९ मध्ये हवाई क्षेत्र बंद करण्यात आले होते तेव्हा पाकिस्तानला दररोज सुमारे २,३२,००० डॉलर्सचा तोटा होत होता. जेव्हा लँडिंग आणि पार्किंगसारखे इतरही शुल्क जोडण्यात आले, तेव्हा दररोजचे नुकसान सुमारे ३,००,००० डॉलर्स होते. तसेच आंतरराष्ट्रीय मार्ग बंद झाल्यामुळे आणि देशांतर्गत मार्गांवर उड्डाणांच्या जास्त वेळेमुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला दररोज सुमारे ४,६०,००० डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला. आता पहलगाम हल्ल्यानंतर हवाई क्षेत्र बंद केले गेल्याने पाकिस्तानवर पुन्हा अशीच परिस्थिती ओढवण्याची शक्यता स्पष्ट दिसून येत आहे.
पाकिस्तानच्या निर्णयाचा भारतावर परिणाम
एअर इंडिया आणि इंडिगोने आधीच सांगितले आहे की, त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये समस्या येत आहेत. दिल्ली, अमृतसर, जयपूर, लखनौ व वाराणसी यांसारख्या शहरांमधून येणाऱ्या विमानांना लांबच्या मार्गांनी प्रवास करावा लागत आहे. ही विमाने पाकिस्तानवरून उड्डाण करण्याऐवजी, आता अरबी समुद्रावरून म्हणजे लांबच्या मार्गाने प्रवास करीत आहेत. एका वरिष्ठ वैमानिकाने पीटीआयला सांगितले की, नवीन मार्गांमुळे अमेरिका आणि युरोपला जाणाऱ्या विमानांना सुमारे दोन ते अडीच तास जास्त वेळ लागेल. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद केल्याने दिल्लीसह उत्तर भारतातील शहरांमधून पश्चिमेकडे जाणाऱ्या सर्व विमान सेवांवर विपरीत परिणाम होईल.
वरिष्ठ विमान अधिकारी आणि वैमानिकांनी पीटीआयला सांगितले की, या विमानांना पर्यायी लांबच्या मार्गाने म्हणजे अरबी समुद्रावरून जावे लागेल. त्यामुळे भारताकडून मध्य आशिया, काकेशस, पश्चिम आशिया, युरोप, यूके आणि उत्तर अमेरिकेतील गंतव्य स्थानांवर जाणाऱ्या विमानांमध्ये व्यत्यय येईल, असे वृत्त ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. परिणामी, लांबच्या उड्डाण मार्गांमुळे विमान कंपन्यांना अधिक इंधनाची आवश्यकता भासेल. त्यामुळे खर्च वाढेल आणि पेलोड व्यवस्थापनात आव्हाने निर्माण होतील.
एका ट्रॅव्हल उद्योगातील अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले, “हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकिटांच्या किमती ८ ते १२ टक्क्यांनी वाढू शकतात. जर परिस्थिती अशीच राहिली, तर भाडे आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रवासासाठी लांबच्या मार्गांचा वापर केल्यास जास्त प्रमाणात इंधन लागेल आणि त्यामुळे खर्चही वाढेल. उड्डाणाचा कालावधी वाढल्याने विमान कंपन्यांना जास्तीचे इंधन वाहून न्यावे लागेल आणि त्यामुळे पेलोड समस्याही निर्माण होऊ शकतात.