पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारताकडून पाकिस्तानविरोधात अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र, त्यातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ती म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने सायबर हल्ल्यांमध्ये वाढ केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत असलेला तणाव सायबर हल्ल्यांमधून समोर येत आहे.
मुख्य म्हणजे, हे सायबर हल्ले पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर (LoC) सतत सुरू असलेल्या गोळीबारादरम्यान करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूरजवळ असणाऱ्या नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू आहे. भारतातील वेबसाइट हॅक करण्यामागे नक्की कोणाचा हात आहे? ही पाकिस्तानची भारताविरुद्ध डिजिटल युद्धाची रणनीती आहे का? त्याविषयी जाणून घेऊयात.

सायबर हल्ल्यांमध्ये कोणाला केले लक्ष्य?
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर म्हणजेच २५ एप्रिल रोजी भारतातील आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगची वेबसाइट हॅक झाल्याची माहिती समोर आली. हॅकर्सनी आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वेबसाइटवर भावना भडकवणारा एक संदेश पोस्ट केला. इंग्रजी आणि उर्दूमध्ये असलेल्या या संदेशात लिहिले होते, “आमचा धर्म, चालीरीती एकमेकांपासून अनेक मैल दूर आहेत. आम्ही मुस्लीम आहोत, तुम्ही हिंदू आहात. अल्लाह आमच्याबरोबर आहे. तुमचा धर्म तुम्हाला वाचवू शकणार नाही, पण तो तुमच्या मृत्यूचे कारण असेल. आम्ही खूप शक्तिशाली आहोत,” असे या संदेशात लिहिण्यात आले होते. अशाच पद्धतीचे विधान पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यानेदेखील आपल्या अलीकडच्या भाषणात केले होते. त्याच्या भाषणात त्याने म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तान हे मूलभूतपणे वेगळे राष्ट्र आहेत.
त्याच्या काहीच दिवसांनंतर आर्मी पब्लिक स्कूल, श्रीनगर आणि आर्मी पब्लिक स्कूल रानीखेतच्या वेबसाइट हॅक करण्यात आल्या. दोन्ही साइट्सच्या होमपेजवर प्रचारसंबंधित माहिती पोस्ट करण्यात आली. त्यानंतर डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसवर (DDoS) देखील हल्ला करण्यात आला, त्यामुळे वेबसाइट तात्पुरती बंद झाली. “ते होमपेज हॅक करण्यात आणि डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसमध्ये व्यत्यय आणण्यात यश मिळवले, परंतु वेब व्यवस्थापकांनी ही समस्या लवकर सोडवली,” असे लष्कराच्या एका सूत्राने सांगितले. तसेच, आर्मी वेल्फेअर हाऊसिंग ऑर्गनायझेशन (AWHO) च्या डेटाबेसचे उल्लंघन करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आणि भारतीय हवाई दल प्लेसमेंट ऑर्गनायझेशन पोर्टलही हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मंगळवारी (२९ एप्रिल) राजस्थान शिक्षण विभागाची वेबसाइटदेखील हॅक झाली. त्याच्या होमपेजवर २०१९ मध्ये पाकिस्तानने हवाई दलाचे अधिकारी अभिनंदन वर्धमान यांना पकडल्याबद्दल भारतीय प्रशासनाची खिल्ली उडवणारा एक संदेश पोस्ट करण्यात आला. हॅकर्सनी पहलगाम हल्ल्याबाबतदेखील आक्षेपार्ह मजकूरदेखील पोस्ट केला. त्यांनी संदेशात असे लिहिले, तुम्ही आग लावली, आता विघटनाची तयारी ठेवा.” ते म्हणाले, “कुठल्या सीमा नाहीत, इशारा नाही, दया नाही. पुढचा हल्ला गोळ्यांचा नाही, बाइट्सचा असेल.”
सायबर हल्ल्यांसाठी जबाबदार कोण?
भारतात होत असलेल्या सायबर हल्ल्यांसाठी अनेक हॅकिंग गट जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. ‘टीम इन्सेन पीके’ या हॅकिंग गटाने इंडियन आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वेबसाइटच्या हॅकिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. या गटाने भारत सरकार आणि कंपन्या व शैक्षणिक संस्थांसह इतर वेबसाइटवर सायबर हल्ला केल्याचे मान्य केले आहे. भारतात २०२३ च्या जी २० शिखर परिषदेपूर्वी त्यांनी भारत सरकारच्या वेबसाइटलादेखील लक्ष्य केले होते. ‘क्लाउडसेक’च्या संशोधन पथकाच्या अहवालात असे आढळून आले की, जी २० शिखर परिषदेच्या काही दिवसांपूर्वी ‘इन्सेन पीके’ने ‘#OpIndia’ अंतर्गत अंदाजे २,४५० सायबर हल्ले केले. गेल्या वर्षी, त्यांच्याकडून प्रसिद्ध फास्ट-फूड चेन बर्गर सिंगची वेबसाइट हॅक करण्यात आली होती. ‘टीम इन्सेन पीके’ने बर्गर सिंगच्या डिजिटल संरक्षणात प्रवेश केला, तसेच वेबसाइटमध्ये अनेक बदल केले. ‘टीम इन्सेन पीके’ व्यतिरिक्त हे सायबर हल्ले ‘आयओके हॅकर’ किंवा ‘इंटरनेट ऑफ खिलाफत’ या नावाने कार्यरत असलेल्या एका गटाने केल्याचीदेखील माहिती आहे.
सायबर हल्ल्यांचे कारण काय?
भारतीय गुप्तचर संस्थांनी असे नोंदवले आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बदला म्हणून हे सायबर हल्ले करण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, हल्ला करण्यात आलेले सर्व सार्वजनिक प्लॅटफॉर्म होते. जेव्हा त्यांना राष्ट्रीय संरक्षण नेटवर्कला लक्ष्य करता आले नाही, तेव्हा पाकिस्तानने सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या कल्याणकारी आणि शैक्षणिक वेबसाइट्सकडे आपले प्रयत्न वळवले होते. अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे की, ही युद्धाची एक युक्ती आहे, जी पाकिस्तान वापरत आहे. हा पाकिस्तानचा भारतीय संस्थांना अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. याचा तपास सुरू आहे आणि हॅकर गटाचे मूळ नेटवर्क शोधण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.
तज्ज्ञांनी असे नमूद केले आहे की, हॅकिंगच्या या घटना पाकिस्तानकडून भारताविरुद्ध वापरल्या जाणाऱ्या युक्त्या आहेत. तज्ज्ञांनी उदाहरण देत सांगितले की, ट्रान्सपरंट ट्राइब (APT36) नावाचा गट हा कायम भारतीय वेबसाइट्सना, म्हणजेच लष्करी आणि शैक्षणिक वेबसाइट्सना लक्ष्य करत असतो. २०२४ मध्ये सायबरसुरक्षा फर्म असलेल्या ‘ब्लॅकबेरी’च्या एका अहवालात असे आढळून आले की, पाकिस्तानस्थित ‘ट्रान्सपरंट ट्राइब; या गटाने भारतीय संरक्षण आणि एरोस्पेस संघटनांविरुद्ध हेरगिरी मोहिमा सुरू केल्या. क्विक हीलची एंटरप्राइझ शाखा ‘सेक्राईट’नेदेखील याच स्वरूपाची माहिती दिली. त्यांनी म्हटले ‘ट्रान्सपरंट ट्राइब’ गेल्या दशकापासून भारत सरकार आणि लष्करी संस्थांना लक्ष्य करत आहे. या हॅकिंग हल्ल्यांमुळे माहितीचे नुकसान झाले नसले तरी हे हल्ले अधिक सतर्क राहण्याचा संदेश देतात.