दत्ता जाधव

यंदाचा उसाचा गाळप हंगाम संपल्याचे साखर आयुक्तांनी नुकतेच जाहीर केले आहे. उसाचा हा हंगाम कसा राहिला, अपेक्षित साखर उतारा मिळाला का, किती इथेनॉल उत्पादन झाले, त्यासाठी किती उसाचा वापर केला गेला, शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळाली का, राज्यातील साखर उद्योगाची एकूण आर्थिक उलाढाल किती झाली, याचा आढावा..

यंदा उसाचे गाळप, साखर उत्पादन किती?

राज्यात यंदा १५ ऑक्टोबर २०२२ रोजी साखर हंगाम सुरू झाला. राज्यातील १०६ सहकारी आणि १०४ खासगी, अशा एकूण २१०  कारखान्यांनी १०५२.८८ लाख टन गाळप करून सरासरी १० टक्के साखर उतारा मिळवत १०५३.१७ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. यंदाचा हंगाम सरासरी १२१ दिवसांचा राहिला. सर्वात कमी गाळप सात दिवस, तर सर्वात जास्त गाळप १६४ दिवस राहिले. राज्यातील कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता ८,८२,५५० टनांवर गेली आहे. यंदा ०.४५ लाख टनांनी गाळप क्षमतेत वाढ झाली आहे.

कारखान्यांची कामगिरी कशी राहिली?

सोलापुरातील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने सर्वाधिक १८,४१,४२१ टन ऊस गाळप केले. त्या खालोखाल साताऱ्यातील गुरू कमॉडिटी सव्‍‌र्हिसेस प्रा. लि. कारखान्याने १८,१८,४२१ टन (जरंडेश्वर शुगर, कोरेगाव) आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर शेतकरी कारखान्याने १८,०१,५८६ टन गाळप केले. जवाहर कारखान्याने सर्वाधिक साखर उत्पादन २२,०७,०७० क्विंटल तर त्या खालोखाल गुरू कमॉडिटीने १८,२६,५०० क्विंटल आणि विठ्ठलराव शिंदे कारखान्याने १६,५२,८०० क्विंटल घेतले. कोल्हापुरातील पंचगंगा कारखान्याने १२.८६ टक्के, सांगलीतील राजाराम बापू पाटील (युनिट नं ३, करंदवाडी) कारखान्याने १२.८६ टक्के आणि राजाराम बापू पाटील वाटेगाव कारखान्याने १२.८० टक्के साखर उतारा मिळवून आघाडी घेतली. लातूरच्या शेतकरी सहकारी कारखान्याने (किल्लारी) सर्वात कमी म्हणजे केवळ १५४० टन गाळप करून ८३१ क्विंटल साखर उत्पादन केले. नगरच्या सोपानराव ढसाळ अ‍ॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेडने ६३७७ टन गाळप करून १३८५ क्विंटल उत्पादन केले. यवतमाळच्या वसंत कारखान्याने १३,५७३ टन गाळप करून १३,५०० क्विंटल उत्पादन केले.

इथेनॉल उत्पादनाची स्थिती काय?

राज्यातील साखर कारखान्यांची इथेनॉल निर्मिती करण्याची वार्षिक क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटपर्यंत वाढली आहे. राज्यात नव्याने १६३ आसवणी प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. त्यात सहकारी ५४, खासगी ७१ तर स्वतंत्र प्रकल्पांची संख्या ३८ आहे. तेलउत्पादक कंपन्या इथेनॉलचा पुरवठा झाल्यानंतर २१ दिवसांत साखर कारखान्यांना पैसे देतात, त्यामुळे कारखान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. आसवणी प्रकल्प उभारणीसाठी मोठा खर्च येत असल्यामुळे  कर्जासाठी केंद्र सरकारने सहा टक्के अनुदानाची योजना सुरू केली आहे. तिचा फायदा घेत १२५ सहकारी आणि खासगी कारखान्यांनी १०७११ कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांना तत्त्वत: मंजुरी दिली आहे. याशिवाय स्वतंत्र मोलॉसिस व धान्यावर आधारित १०६६० कोटी रुपये किमतीच्या १४१ इथेनॉल प्रकल्पांना केंद्र सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे.

सहवीज निर्मितीची स्थिती काय?

राज्यात एकूण १२२ सहवीज प्रकल्प आहेत. त्यात सहकारी क्षेत्रातील एकूण प्रकल्प संख्या ६२ आहेत. कार्यान्वित प्रकल्पांची संख्या ६० आहे, तर उभारणी सुरू असलेले प्रकल्प दोन आहेत. खासगी प्रकल्प एकूण ६० आहेत. त्यात कार्यान्वित प्रकल्प ५९ तर एका प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. या सर्व प्रकल्पांची एकूण ऊर्जा निर्मितिक्षमता २२५४.७५ मेगावॉट आहे. या प्रकल्पांतून प्रत्यक्षात एकूण ८३६.७५ कोटी युनिट विजेचे उत्पादन झाले आहे, तर ४७२.६० कोटी युनिट विजेची निर्यात झाली आहे. कारखान्यांनी ३३८.७६ कोटी युनिट वीज वापरली आहे. कारखान्यांना वीज निर्यातीतून २९४७.३८ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साखर उद्योगाची आर्थिक उलाढाल ?

राज्यातील साखर उद्योगाची उलाढाल १.०८ लाख कोटींवर गेली आहे. २१० कारखान्यांचा देय एफआरपी ३३२७८ कोटी रुपयांवर गेली आहे. १२२ कारखान्यांची इथेनॉल निर्मितीतून होणारी उलाढाल १२००० कोटींवर गेली आहे. ११९ कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांची उलाढाल ६००० कोटींवर गेली आहे. रेक्टिफाइड स्पिरिटची उलाढाल ५००० कोटींवर गेली आहे. मद्य व्यवसायाची उलाढाल १२००० कोटींवर गेली आहे. रसायन निर्मितीची उलाढाल १००० कोटींवर, मोलॅसेसमधून ४००० कोटी, बगॅसमधून ५०० कोटी आणि साखर कारखान्यांत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख कामगारांच्या वेतनाचा खर्च ६०० कोटींवर गेला आहे. साखर निर्यातीची उलाढाल ८७४० कोटींवर गेली आहे. कारखान्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी १७५० कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दिला आहे. राज्य उत्पादन शुल्क ३००० कोटी भरले आहे. ३२००.२७ कोटींच्या सरकारी अर्थसाहाय्याची परतफेड केली आहे.