-दत्ता जाधव
हवामान विभागाने जाहीर केले असले, तरी नैर्ऋत्य मोसमी पावसाने अद्याप संपूर्ण राज्य व्यापलेले नाही. यंदा सरासरी इतका पाऊस पडणार असल्याची सुवार्ता हवामान विभागाने दिल्यानंतर कृषी विभागाकडून राज्यातील खरीप हंगामाची जय्यत तयारी झाली आहे. हा हंगाम नेमका कसा असेल?

किती क्षेत्रावर होणार लागवड?

राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर आहे. त्यातील पेरणी योग्य क्षेत्र १६६.५० लाख हेक्टर आहे. प्रत्यक्षात खरीप हंगामातील पेरणी योग्य क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर आहे. राज्यातील एकूण १.५३ कोटी शेतकरी हंगामात पेरणी करतात. त्यापैकी २८.३९ टक्के शेतकरी लहान आणि ५१.१३ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. राज्यभरात जून ते ऑक्टोबर या काळात सरासरी १०७५.३ मिलीमीटर पाऊस पडतो. कोकण विभागात सर्वाधिक, त्या खालोखाल पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भ, असा उतरता क्रम आहे. 

कोणत्या पिकाची होईल लागवड?

खरीप हंगामात राज्यात भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, कापूस, सोयाबीन, ऊस या पिकांची लागवड होते. यंदा सोयाबीन, कापूस आणि मक्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. साधारणपणे राज्यातील सोयाबीनची लागवड एकूण क्षेत्राच्या ३३ टक्के म्हणजे ४६.१७ लाख हेक्टरवर होईल. त्या खालोखाल कापूस २८ टक्के (३९.५४ लाख हेक्टर), भात ११ टक्के (१५.४९ लाख हेक्टर), तूर ९ टक्के, मका ६ टक्के, बाजरी ४ टक्के, मूग आणि उडीद ३ टक्के, खरीप ज्वारी, भुईमूग आणि रागी प्रत्येकी एक टक्का पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

किती उत्पादन होईल?

सरासरी पाऊस आणि इतर सकारात्मक परिस्थिती गृहीत धरून कृषी विभागाने खरिपात सोयाबीनचे उत्पादन ५४.२२ लाख टन, भात ३२.३२ लाख टन, मका २३.३२ लाख टन, तूर १३.७० लाख टन, कापूस, रुई १२.१० लाख टन, भुईमूग २.४० लाख टन, उडीद २.३५ लाख टन, बाजरी ४.५७ लाख टन, मूग १.८३ लाख टन आणि रागी ०.९३ लाख टन इतके उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

बियाणांची गरज आणि उपलब्धता किती?

राज्यात एकूण १७ लाख ९५ हजार २७१ क्विंटल बियाणांची गरज आहे. त्या तुलनते १९ लाख ८८ हजार १७९ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे कृषी खात्याने म्हटले आहे. सोयाबीन, कापूस, भात, तूर, मका या पिकांसाठी आवश्यक असणारे बियाणे गरजेपेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती, राज्याच्या कृषी खात्याने दिली आहे. मात्र महाबीजकडील उपलब्ध बियाणांचे प्रमाण यंदा कमी दिसते एकूण १९ लाख ८८ हजार १७९ क्विंटल उपलब्ध बियाणांपैकी महाबीजकडे फक्त १ लाख ७२ हजार २२८ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तर खासगी कंपन्या आणि शेतकऱ्यांकडे १८ लाख १ हजार २०१ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. मागील खरीप हंगामात पीक काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस पडल्यामुळे महाबीजकडे पुरेशा प्रमाणात दर्जेदार बियाणे नसल्याची माहिती समोर येत आहे.

रासायनिक खतांचा पुरेसा साठा आहे का?

जागतिक परिस्थितीचा परिणाम म्हणून जगभरात रासायनिक खतांची टंचाई आहे. देशातील स्थिती याहून वेगळी नाही. त्यात भर म्हणून खतांच्या किंमती सुमारे ५० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामावर खत टंचाईचे सावट कायम असणार आहे. कृषी विभाग खत टंचाई नाही, खत पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन केले असल्याचा दावा करीत असले तरीही प्रत्यक्ष ग्रामीण भागात आताच खतांची टंचाई स्पष्टपणे दिसून येते. युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते, एसएसपी आदी रासायनिक खतांची सुमारे ५२ लाख टन इतकी गरज असून, कृषी खात्याकडून ४५ .२० लाख टन खतांचे नियोजन केले आहे. त्यापैकी एक एप्रिलपर्यंत १२. १५ लाख टन खते उपलब्ध झाली आहेत. खरीप हंगामासाठी १७ मेपर्यंत ९.०८ लाख टन खतांचा पुरवठा झाला आहे. १७ मेपर्यंत ३.५५ लाख टन खतांची विक्री झाली आहे. १७ मेअखेर राज्यात १७.६८ लाख टन इतके खत उपलब्ध आहे. खतांची एकूण आकडेमोड पाहता खरिपात खत टंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने टंचाई टाळण्यासाठी १० लाख टन युरिया आणि ५० हजार टन डीएपीचा संरक्षित साठा करून ठेवला आहे. विभागाकडून सेंद्रीय खतांच्या वापराबाबत जागृती करण्यात येत आहे. युरियाची टंचाई टाळण्यासाठी नॅनो युरियाचा पर्याय उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे.

शेतकरी नेमके काय करतो?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तरी गावनिहाय झालेला पाऊस भिन्न असतो. शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा पोत, कस, उत्पादकता माहीत असते. त्यामुळे शेतकरी झालेला पाऊस, बाजारात कोणत्या शेतीमालाला दर आहे. भविष्यात कशाला दर मिळेल आणि आपल्या शेतीत काय चांगले पिकेल, याचा ढोबळ अंदाज बांधून लागवड करतो. तो हवामान विभाग, कृषी विभाग आणि त्यांच्या शिफारशी यांना फारसे गांभीर्याने घेत नाही. तो त्याच्या मनाचा राजा असतो आणि त्याला जे योग्य वाटेल, ते पीक ते घेत असतो. कृषी विभागाचे नियोजन पावसाच्या अंदाजावर केलेले असते. पावसाचा अंदाज चुकला तर सर्वच नियोजन चुकलेले दिसून येते.