म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीत अडकविण्यात आलेल्या ६० भारतीयांची महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर शाखेने नुकतीच सुटका केली. या प्रकरणी एका परदेशी नागरिकासह पाच दलालांना अटकही करण्यात आली. अटक झालेल्या व्यक्तींमध्ये वेब सिरीज आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमामधील एका कलाकाराचा समावेश आहे. भारतातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून परदेशात पाठवून सायबर गुलामगिरीमध्ये ढकलल्याचा हा पहिला प्रकार नाही. गेल्या वर्षी थायलंडमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून भारतातील तरुणांना बेकायदेशिररित्या लाओसमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना बेकायदा कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात केलेल्या कारवाईत सुमारे २५० ते ३०० तरुणांची सुटका करण्यात आली होती. उच्चशिक्षित बेरोजगारांना सायबर गुलामगिरीत अडकवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रकार नेमका काय आहे, याचा आढावा.

म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीचे काय प्रकरण?

आरोपींनी विविध समाज माध्यमांद्वारे भारतातील ६० पीडित नागरिकांशी संपर्क साधून त्यांना थायलंड आणि पूर्व आशियाई देशांमधील मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवले. नोकरीसाठी तयार झालेल्या नागरिकांना दलालांमार्फत पारपत्र आणि विमानाची तिकिटे देण्यात आली. या सर्व नागरिकांना पर्यटक व्हिसावर थायलंडमध्ये पाठविण्यात आले. तेथून त्यांना म्यानमारच्या सीमेवर पाठवण्यात आले. तेथील एका लहान नदीतून त्यांना एका ठिकाणी नेण्यात आले. तेथे या नागरिकांना सशस्त्र बंडखोरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना डिजिटल घोटाळ्यापासून औद्योगिक स्तरावर बनावट गुंतवणूक योजनांमार्फत सायबर फसवणूक करण्यास भाग पाडण्यात आले.

कोणाला अटक?

सायबर गुलामगिरीसाठी म्यानमारमध्ये माणसे पाठविल्याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये मनीष ग्रे ऊर्फ मॅडी, तैसन ऊर्फ आदित्य रवी चंद्रन, रूपनारायण रामधर गुप्ता, जेन्सी राणी डी. आणि कझाकस्तानचा नागरिक असलेला तलानिती नुलाक्सी यांचा समावेश आहे. मनीष ग्रे ऊर्फ मॅडी हा वेब सिरिजमध्ये अभिनेता म्हणून काम करीत होता. या प्रकरणी महाराष्ट्र सायबरने तीन प्रथम माहिती अहवाल नोंदवले आहेत. भारतातील नागरिकांना परदेशातील नोकरीचे आमिष दाखवणारे एजंट आणि फसव्या कॉल सेंटर कंपन्यांचे नेटवर्क उघडकीस आले असून, अनेक कंपन्या रोजगार एजन्सीच्या नावाखाली कार्यरत मानवी तस्करी करीत आहेत. मनीष ग्रे याने पीडित व्यक्तींना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना म्यानमारमध्ये पाठवले होते. तसेच भारतात सायबर गुन्हे करण्यासाठी एक युनिट सुरू करण्याची योजना तलानिती नुलाक्सी याने आखली होती. महाराष्ट्र सायबरने अन्य संस्थाच्या मदतीने कारवाई करून या ६० नागरिकांची सुटका केली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची पुढील चौकशी सुरू असल्याचे महाराष्ट्र सायबरमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र ही कारवाई म्यानमारमध्ये करण्यात आली होती का याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे.

सायबर गुलामगिरी म्हणजे काय?

सायबर गुलामगिरीच्या प्रकरणांमध्ये लठ्ठ पगाराच्या नोकरीचे प्रलोभन दाखवून बेरोजगारांना परदेशात नेण्यात येते आणि तेथे त्यांना सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांत अडकविण्यात येते, त्यांची पिळवणूक केली जाते. मानवी तस्करीच्या या आधुनिक प्रकाराला सायबर गुलामगिरी म्हणतात. अग्नेय आशियातील कंबोडिया, म्यानमार, लाओस आणि हाँगकाँगसारख्या देशांमध्ये बेरोजगारांना सायबर गुलामगिरीत ढकलणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे अशा टोळ्या चालवणारे भारतीयच आहेत.

३०० तरुणांना डांबून ठेवल्याचा प्रकार

ठाण्यात राहणाऱ्या तरुणाचे एक नातेवाईक विलेपार्ले येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये कामाला होते. त्यांच्यामार्फत तक्रारदाराची परदेशात नोकरी देणाऱ्या दलालांशी ओळख झाली. त्यांनी थायलंडमध्ये ६५ हजार रुपयांची नोकरी देण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराकडून ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याला थायलंडमध्ये पाठवले. तक्रारदार आणि अन्य भारतीयांना तेथून बोटीने बेकायदेशीररित्या लाओसला नेण्यात आले. तेथे टास्क देण्याच्या नावाखाली सायबर फसवणूक करणाऱ्या एका कॉलसेंटरमध्ये या तरुणांना काम करण्यास भाग पाडण्यात आले. तेथे सुमारे ३० भारतीय तरुण काम करीत होते. जाचक अटी लादून त्यांचा पगार कापण्यात येत होता. नेहमीच्या जाचाला कंटाळून तरुणांनी तेथील भारतीय वकिलातीशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकाराची संबंधितांना माहिती दिली. हे समजताच आरोपींनी त्यांचे मोबाइल काढून घेतले. तसेच भारतीय वकिलातीकडे करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. त्यांना खुर्चीला बांधून त्यांचे मोबाइल काढून घेण्यात आले. मोबाइलमधील सर्व तपशीलही आरोपींनी डिलिट केला. तसेच आरोपींनी तक्रारदाराकडून २०० चिनी युआन खंडणी म्हणून घेतले. अखेर स्थानिक भारतीय वकिलातीमार्फत चार तरुणांना भारतात परत आणण्यात यश आले. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करून टप्प्याटप्प्याने ३०० जणांना भारतात आणण्यात आले.

भारतीय यंत्रणांनी मोहीम कशी राबवली?

याप्रकरणी भारतीय वकिलातीकडे तक्रार केल्यानंतर लाओसमधील स्थानिक यंत्रणांच्या मदतीने या तरुणांची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्या सर्वांना भारतात परत पाठवले गेले. लाओसमध्ये राहणारे जेरी जेकब, गॉडफ्री व सनी यांच्याविरोधात ठार मारण्याची धमकी देणे, खंडणी वसूल करणे, डांबून ठेवणे व फसवणूक करणे अशा विविध कलमांतर्गत विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपी जेरी जेकब व गॉडफ्री अल्वारेस यांना लाओसमधून प्रत्यार्पण करून मुंबईत पाठवण्यात आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कक्ष ८ च्या पोलिसांनी तपास करून जेरी जेकब व गॉडफ्री अल्वारेस यांना अटक केली. आशियातील छोट्या देशांमध्ये सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट कार्यरत असून नोकरीच्या शोधात असलेल्या भारतीय तरुणांना चांगल्या पगाराचे आमिष दाखवून त्यांना परदेशात पाठवण्यात येत आहे. त्यानंतर सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरमध्ये त्यांना बळजबरीने काम करण्यास भाग पाडण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले. अग्नेय आशियातील छोट्या देशात अडकलेल्या अनेक तरुणांनी तक्रार केली आहे.

इतर देशांतील तरुणांचा समावेश?

लाओस येथील कॉल सेंटर प्रकरणी २५० ते ३०० तरुणांची सुटका करण्यात आली होती. त्यात भारत, श्रीलंकेतील तरुणांचा समावेश आहे. विशेष करून अग्नेय आशियायी देशांमध्ये सायबर फसवणूक करणारे कॉल सेंटर कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत अमेरिका, कॅनडा व युरोपीयन नागरिकांची सायबर फसवणूक करण्यात येते. आरोपी जेकब व अल्वारेस यांचे कोणतेही संकेतस्थळ नव्हते. पण नोकरीच्या शोधात असलेले तरुण मोठ्या संख्येने त्यांच्या संपर्कात आले होते.

कोणती काळजी घ्याल?

परदेशात नोकरी करायला जाताना सर्व पडताळणी करणे आवश्यक आहे. केवळ दलालांच्या भरवशावर परदेशात नोकरी करायचा जाणे खूपच त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे फसवणूकही होऊ शकते. या तरुणांना थायलंडमध्ये ६५ हजार रुपयांची नोकरी देण्याचे आमिष दाखवून परदेशात पाठवण्यात आले होते. पण तेथून बेकायदेशीररित्या लाओसला नेऊन त्यांना सायबर फसणूक करणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडण्यात आले. यापूर्वीही नोकरीच्या नावाखाली परदेशात पाठवून फसवणूक झाल्याची अनेक प्रकरण आहेत. परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या तीन महिलांना नुकतीच सहार पोलिसांनी अटक केली होती. दलालाने बनावट कागदपत्र तयार करून त्यांच्याकडे दिले होते. पण विमानतळावर या महिलांना अडवून अटक करण्यात आली. त्यामुळे परदेशात नोकरीसाठी जाण्यापूर्वी कंपनीची इत्थंभूत माहिती मिळवून त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी तेथील परिचित व्यक्ती, संकेतस्थळ व वाणिज्य वकिलातीची मदत घेणे आवश्यक आहे.