भक्ती बिसुरे
चीन आणि तेथे नोंदवण्यात येणारे विविध प्रकारच्या विषाणूचे संसर्ग हा आताशा जगभराच्या कुतूहलाचा तरी काळजीचा विषय ठरू लागला आहे. बर्ड फ्लू हा खरे म्हणजे पक्ष्यांना होणारा आजार. बर्ड फ्लूमुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांचे पक्षी मृत होऊन आर्थिक नुकसान झाल्याच्या घटना पूर्वी आपल्याकडेही नोंदवण्यात आल्या आहेत. मात्र, चीनमध्ये नुकताच बर्ड फ्लूमुळे मानवी मृत्यू नोंदवण्यात आला आहे. बर्ड फ्लू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इन्फ्लूएन्झाच्या ‘एच३एन८’ या विषाणू प्रकाराचा संसर्ग चीनमधील तीन व्यक्तींना झाला. त्यांपैकी एका रुग्णाचा नुकताच मृत्यूही झाला आहे. या संसर्गालाच ‘एव्हियन इन्फ्लूएन्झा’ असेही म्हणतात. बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू ही सर्वसाधारण बाब असली, तरी मानव दगावल्याची ही पहिलीच ज्ञात घटना आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.




बर्ड फ्लू म्हणजे काय?
बर्ड फ्लू हा एव्हियन इन्फ्लूएन्झा म्हणूनही ओळखला जातो. एच३एन८ या विषाणू प्रकारामुळे हा संसर्ग होतो. सहसा कोंबड्या, मोर, टर्की, बदक अशा पक्ष्यांना होणारा हा संसर्ग बाधित पक्ष्यांच्या संपर्कात आलेल्या माणसांना होण्याचा धोकाही असतो. बर्ड फ्लूची लक्षणे ही कोणत्याही विषाणूजन्य आजारासारखी म्हणजे तापासारखीच असतात. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. सतत उलटी होईल असे वाटते. ताप, कफ, डोकेदुखी, घशाला सूज येणे, पोटात जंत होणे, सर्दी, न्युमोनियासारखी लक्षणे, तसेच डोळ्यांची आग होणे ही लक्षणे सर्वसाधारणपणे दिसतात.
चीनमध्ये काय घडले?
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चीनच्या गुआंगडोंग प्रांतात ५६ वर्षीय महिलेला एच३एन८ या आजाराचा संसर्ग झाला. तिला न्यूमोनियासदृश गंभीर लक्षणे दिसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मार्च महिन्यात उपचारादरम्यानच रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. ही महिला कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत होती. सर्वसाधारणपणे विषाणूजन्य आजारांमध्ये दिसणारी सर्व लक्षणे तिच्यात होती, मात्र करोनाप्रमाणे किमान तिच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. या महिलेबरोबरच आणखी दोन व्यक्तींना चीनमध्ये या आजाराचा संसर्ग झाल्याची नोंद आहे. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांमध्येही संसर्गाची लक्षणे नाहीत. त्यामुळे हा आजार एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे जाण्याच्या संक्रमण क्षमतेच्या दृष्टीने क्षीण आणि कमीत कमी धोकादायक आहे, या निष्कर्षाप्रत जागतिक आरोग्य संघटना येऊन पोहोचली आहे.
बर्ड फ्लूचा धोका कोणाला अधिक?
बर्ड फ्लू हा प्रामुख्याने पक्ष्यांना होणारा आजार आहे. मात्र, आजारी पक्ष्यांच्या कळत किंवा नकळत संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनाही या आजाराचा धोका असतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा आजार संक्रमित होतो, मात्र त्याचा वेग तुलनेने संथ आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. कोंबड्या, मोर, बदक, टर्की या पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण होत असली, तरी भारतात यापूर्वी प्रामुख्याने कोंबड्यांनाच बर्ड फ्लू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायातील व्यक्तींनाही त्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. पक्ष्यांचा मल असलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास माणसाला बर्ड फ्लू होऊ शकतो. संक्रमित पक्षी असणाऱ्या ठिकाणी माणसांनी श्वास घेतल्यामुळे त्यांच्या विष्ठेतील कण शरीरात गेल्याने माणसांना बर्ड फ्लूचा धोका संभवतो. पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना या आजाराचा धोका जास्त असतो. कच्चे किंवा अर्धवट शिजलेले चिकन खाण्यामुळेही बर्ड फ्लूची लागण होण्याची शक्यता असते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना काय?
चीनमधील एव्हियन फ्लू रुग्ण आणि मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जिवंत प्राणी आणि पक्ष्यांशी संबंधित व्यवसायातील व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने चीनला केले आहे. प्राणी आणि पक्ष्यांच्या हाताळणीनंतर हात धुणे, त्यांच्या विष्ठेतून विषाणू मानवी शरीरात जाऊ नये यासाठी मुखपट्टीचा वापर करणे आणि काटेकोर स्वच्छता पाळणे आवश्यक असल्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आजारी किंवा मृत प्राण्यांशी संपर्क टाळावा, विशेषत: परदेशी प्रवाशांना पर्यटन किंवा इतर कारणांसाठी अशा बाजारांपासून दूर ठेवावे, असेही संघटनेकडून चीनला सांगण्यात आले आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग असलेल्या परिसरातील नागरिकांनी संक्रमित पक्षी, मेलेल्या पक्ष्यांपासून दूर राहावे, पक्ष्यांमध्ये आजाराची साथ असताना मांसाहार (चिकन) टाळावा, केवळ स्वच्छ पोल्ट्रीतूनच मांस खरेदी करावे असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करतात. इतर विषाणूजन्य आजारांच्या काळात पाळले जाणारे सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळावेत. आपले हात सतत धूत राहणे, सॅनिटायझरचा वापर करणे, संक्रमण असणाऱ्या जागेत न जाण्याचा प्रयत्न करणे, जाणे अपरिहार्य असेल तर मुखपट्टी वापरावी आणि नियमितपणे इन्फ्लूएन्झाची लस घ्यावी, असेही तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
bhakti.bisure@expressindia.com