करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आरोग्य क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर सातत्याने चर्चा होत आहे. कधी ऑक्सिजन व बेड, तर कधी लसींचा तुटवडा. यात गेल्या काही दिवसांपासून प्लाझ्मा थेरपी चर्चेचा विषय ठरली आहे. प्लाझ्मा थेरपीचा अतार्किक वापर थांबवण्याचा आणि ती उपचारातून वगळ्याचा सूर गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्रात उमटत होता. केंद्राने राष्ट्रीय टास्क फोर्स आणि संयुक्त निरीक्षण गट नियुक्त केला होता. या समितीच्या शिफारशीनंतर सरकारने प्लाझ्मा थेरपी उपचाराच्या यादीतून वगळली. पण, त्यामागची कारणं काय आहेत?
करोनाचा विषाणूचा देशात शिरकाव झाल्यानंतर सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. विशेषतः करोनावरती विशिष्ट अशी कोणतीही औषधी नव्हती. त्यामुळे करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध औषधींचा समावेश असलेली उपचार पद्धती निश्चित करण्यात आली होती. पुढे करोना रुग्णांवर रक्तद्रव्य उपचार पद्धती म्हणजेच प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत असल्याचं आढळून आल्यानंतर आयसीएमआरने प्लाझ्मा थेरपीचा करोना उपचारांमध्ये समावेश केला होता.
प्लाझ्मा पद्धती म्हणजे काय?
करोना किंवा कुठल्याही विषाणू-जीवाणूजन्य आजारात बऱ्या झालेल्या रुग्णातील रक्तद्रव त्याच विषाणू किंवा जीवाणूमुळे गंभीर आजार झालेल्या दुसऱ्या रुग्णास दिला जातो, तेव्हा त्या रुग्णात प्रतिकारशक्ती वाढून तो बरा होतो. यालाच प्लाझ्मा थेरपी म्हणतात. बऱ्या झालेल्या व्यक्तीचा रक्तद्रव टोचल्याने त्या व्यक्तीच्या रक्तात विषाणू किंवा जीवाणूविरोधात निर्माण झालेलं अॅण्टीबॉडीज (प्रतिपिंड) नवीन रुग्णास मिळतात. त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती प्रणाली ही विषाणू किंवा जीवाणूशी चांगला लढा देते.
असं काय झालं की सरकारला प्लाझ्मा थेरपी उपचारातून वगळवी लागली?
काही दिवसांपूर्वी वैज्ञानिक आणि डॉक्टरांनी केंद्र सरकारचे प्रधान वैद्यकीय सल्लागार के. विजय राघवन यांना पत्र लिहिलं होतं. प्लाझ्मा थेरपीचा देशभरात अवैज्ञानिकपण वापर सुरू असल्याचं या पत्रात म्हटलं होतं. केंद्रीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गवा आणि एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठवण्यात आलं होतं. प्लाझ्मा उपचारावरून आधीच वादविवाद सुरू असताना या तज्ज्ञांनी पत्रातून काही मुद्द्यांकडे त्यांचं लक्ष वेधलं होतं.
करोनामुळे होणारे मृत्यू आणि रुग्णाच्या आजाराचा कालावधी यावर प्लाझ्मा थेरपीमुळे कोणताही सकारात्मक परिणाम होत नसल्याचं वैद्यक क्षेत्रातील जगप्रसिद्ध जर्नल लान्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वैद्यकीय अहवाल सांगण्यात आलेलं आहे. मागील महिन्यात आयसीएमआरने प्लाझ्मा थेरपीसंदर्भात काही बदल केले होते. प्लाझ्मा उपचारावर काही प्रमाणात बंधन घातली होती. मध्यम स्वरूपाच्या कोविड रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीवर बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर लक्षणं दिसून आल्याच्या सात दिवसांनंतर प्लाझ्मा थेरपी करण्यावरही बंदी आणली होती.
देशातील राज्यांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा अतार्किक व अवैज्ञानिकपणे वापर केला जात असून, त्यामुळे कोविडचे वेगवेगळे स्ट्रेन निर्माण झालेले असू शकतात. असे स्ट्रेन ज्यांच्यामध्ये अॅण्टीबॉडीजवर मात करण्यासाठी पूर्ण क्षमता आहे, असं तज्ज्ञांनी केंद्राचे प्रधान वैद्यकीय सल्लागार, आयसीएमआर प्रमुख आणि एम्सच्या संचालकांना म्हटलं होतं. त्याचबरोबर प्लाझ्माचा असा अविवेकपूर्ण पद्धतीने वापर होत राहिल्यास करोनाचा प्रचंड घातक स्ट्रेन निर्माण होऊ शकतो. जो आगीत तेल ओतण्यासारखा असेल,” असं त्या पत्रात म्हटलेलं होतं. त्यानंतर केंद्रानं समिती नेमून या गोष्टींचा अभ्यास केला आणि समितीच्या शिफारशीनंतर आयसीएमआरने प्लाझ्मा थेरपी करोना उपचारातून पूर्णपणे वगळली आहे.