मुंबई महानगरातील बांधकाम व्यवसायिकांसह नागरिकांचे सर्वाधिक पसंतीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे महापालिका क्षेत्रात सातत्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. पालिका क्षेत्रात निर्सगाच्या कुशीत वसलेल्या आणि नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहत असून वाढत्या नागरीकरणामुळे या भागात पाणी टंचाईची समस्या शहराच्या तुलनेत अधिक जाणवताना दिसून येत आहे. यातूनच टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची मागणी गेल्या काही वर्षात वाढल्याने नागरिकांवर दुहेरी खर्चाचा ताण पडत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलगतच्या ठाणे शहरात पाणी टंचाईच्या झळा का बसत आहेत आणि ही समस्या कधी सुटू शकेल, याविषयी.

स्वमालकीचे धरणच नाही

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २८ लाखांच्या घरात गेली आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात शहराला चार जलस्रोतांमार्फत दररोज ५९० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. यामध्ये एमआयडीसी, स्टेम प्राधिकरण, मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेची स्वत:ची योजना या चार स्रोतांचा सामावेश आहे. ठाणे महापालिकेचे स्वमालकीचे धरण नाही. यामुळे पाणी पुरवठ्यासाठी पालिकेला वेगवेगळ्या स्रोतांवर अवलंबून रहावे लागत आहे. या स्रोतांमार्फत वाढीव पाणी मंजूर झाल्यानंतर ते शहराला मिळते. दोन ते तीन वर्षांपूर्वी शहराला ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत होता. या पुरवठ्यात वाढ होत तो ५९० दशलक्ष लीटर इतका झाला आहे. पाणी पुरवठ्यात गेल्या काही वर्षात वाढ करण्यात आली असली तरी नागरीकरणाचा वेग जास्त असल्याने हा पाणी पुरवठा अपुरा ठरत आहे. यातूनच पाणी टंचाईच्या समस्या निर्माण होत आहेत.

कोणत्या भागाला किती पुरवठा?

ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर म्हणजेच माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात १२० दशलक्षलीटर, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात ६५ दशलक्षलीटर, कळवा प्रभाग समिती क्षेत्रात ६८ दशलक्षलीटर, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ६५ दशलक्षलीटर, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात ६८ दशलक्षलीटर, वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात ५३ दशलक्षलीटर, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात ४५ दशलक्षलीटर, उथ‌ळसर प्रभाग समिती क्षेत्रात ५५ दशलक्षलीटर, नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ५१ दशलक्षलीटर असा एकूण ५९० दशलक्षलीटर इतका प्रतिदिन पाणी पुरवठा होतो. प्रति कुटुंब ४५० लीटर याप्रमाणे महापालिका शहरात पाणी पुरवठा करते. ठाणे शहरासह घोडबंदर भागात मोठ-मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. एकेका इमारतीत शंभर ते दिडशे कुटुंबे वास्तव्यास येत आहेत. ८ ते ९ हजार घरांच्या मोठ्या वसाहती उभ्या राहत आहेत. एकीकडे नागरीकरण वाढत असले तरी स्वमालकीचे धरण नसल्यामुळे विविध स्रोतांवर अवलंबून असलेल्या ठाणे महापालिकेला वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी मर्यादा येत आहेत. यामुळेच नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या जाणवते. शहरातील औद्योगिक क्षेत्राचे रहिवास क्षेत्रात झालेले रूपांतर आणि यामुळे बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर उभी राहणारी गृहसंकुले, क्लस्टर योजना यामुळे भविष्यात शहराची लोकसंख्येत वाढ होईल. पण, त्या तुलनेत पालिकेकडे पाणी उपलब्ध नाही. यामुळे ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

टंचाईची आणखी कारणे

इतरही विविध कारणांमुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण होते. यामध्ये धरण क्षेत्रातील पाणी नियोजन, जलवाहिन्या दुरुस्ती, विद्युत पुरवठा खंडित होणे, अतिवृष्टीमुळे पाणी उचल प्रक्रियेवर होणारा परिणाम अशा कारणांमुळे पाणी पुरवठा ठप्प होतो. पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेच्या आराखड्यानुसार पाण्याची गरज?

भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी सद्यःस्थितीत होणारा पाणी पुरवठा अपुरा पडणार आहे. ठाणे महापालिकेने गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला. मुंबई महानगर क्षेत्रातील स्थान, पायाभूत सुविधा, क्लस्टर योजना यांचा विचार करता शहरातील लोकसंख्येत भविष्यात मोठी वाढ होईल, असा पालिकेचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यःस्थितीत निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या तसेच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने पुढील ३० वर्षांचा पाणी नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार पुढील १५ वर्षांत अंदाजे ४४ लाख २४ हजार ४०१ लोकसंख्या होणार असून त्यासाठी प्रतिदिन ९१२ दशलक्षलीटर तर, पुढील ३० वर्षांत अंदाजे ६१ लाख ९६ हजार २२१ लोकसंख्या होणार असून प्रतिदिन १२८३ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. यामध्ये ३० टक्के पाणी गळती आणि वाढीव ५ टक्के लोकसंख्या गृहती धरून हे नियोजन आखण्यात आले आहे. प्रतिदिन १२८३ दशलक्षलीटर इतके पाणी मिळविण्यासाठी देहरजे धरणातून २०० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ५० दशलक्षलीटर, एमआयडीसी कडून १०० दशलक्षलीटर, महापालिकेच्या योजनेतून ५० आणि मुंबई महापालिकेकडून ५० आणि काळू धरणातून ४०० तर शाई धरणातून ६०० असे ८५० दशलक्षलीटर वाढीव पाण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला असून याबाबत बैठकाही पार पडल्या आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.