‘सुखोई ३० एमकेआय’ या लढाऊ विमानावर ब्राह्मोस क्षेपणास्त्र बसविल्याने आपली हवाई शक्ती कमालीची वाढली आहे. इतके वजनदार क्षेपणास्त्र लढाऊ विमानावर बसविण्याचा जगातील हा पहिलाच प्रयत्न मानला जातो. इतके वजनदार क्षेपणास्त्र नसले, तरी विमानासाठी तयार करण्यात आलेल्या मूळ क्षेपणास्त्रांपेक्षा इतर क्षेपणास्त्रे विमानांवर बसविण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. लढाऊ विमाने, त्यांच्या मूळ रूपांतील सुधारणा आणि त्यांच्यावरील शस्त्रप्रणाली यांचा घेतलेला हा आढावा…
युद्धामध्ये गरज असते, ती कुशल अशा मानवी लढाई कौशल्याची आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तंत्रज्ञानातील अद्ययावतता आणि बदललेली युद्धनीती अधोरेखित झाली. मात्र, या बदलत्या युद्धपद्धतीकडे आणि तंत्रज्ञानात अग्रेसर राहण्यासाठीचे आपले प्रयत्न दीर्घ काळापासून सुरू आहेत. याचा ताजा दाखला द्यायचा असेल, तर तो सुखोई लढाऊ विमाने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज करण्याचा देता येईल. इतर अनेक हवाई संरक्षण आणि हवाई प्रतिहल्ला करण्याच्या साधनांमध्ये अशा प्रकारची दुर्मीळ भेदकता भारताने या दोन शस्त्रप्रणालींना एकत्र करून साधली आहे.
‘सुखोई’मध्ये १०० हून अधिक सुधारणा
रशियाचे ‘सुखोई-३०’ विमानात हिंदुस्तान एअरोनोटिक्स लिमिटेड (एचएएल) येथे शंभरहून अधिक वेळा सुधारणा केल्याचे वक्तव्य ‘एचएएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांनी नुकतेच नागपूर येथे केले. ‘सुखोई-३० एमकेआय’ विमानांवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज करण्याचा संदर्भ त्यामागे होता. याच ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये प्रभावी कामगिरी बजावल्याचे वक्तव्य गेल्या महिन्यात पुणे येथे संरक्षण, संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष समीर कामत यांनी केले होते. ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’च्या पदवीप्रदान कार्यक्रमाला ते उपस्थित होते. ही वक्तव्ये नीट समजून घ्यायची असतील, तर क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, लढाऊ विमानांची क्षेपणास्त्रे आणि त्यामध्ये सातत्याने होणारी सुधारणा, भारताकडील लढाऊ विमाने – त्यांची क्षमता आणि आपल्याकडील मर्यादा या सर्वांकडे पाहावे लागते.
लढाऊ विमाने
लढाऊ विमाने हा आपला कळीचा विषय राहिलेला आहे. बदलत्या युद्धतंत्रातही लढाऊ विमानांचे महत्त्व कमी झालेले नाही. विशेषत: भारताच्या बाबतीत, दोन आघाड्यांवर युद्धाचे आव्हान असताना ही विमाने जितकी अद्ययावत असतील, तितके ते आपल्या फायद्याचे राहते. लढाऊ विमानांच्या उत्पादनात भारत अद्यापही स्वयंपूर्ण नाही. तेजस हलके लढाऊ विमान देशी बनावटीचे असले, तरी इंजिनसाठी अद्याप आपण परदेशावर अवलंबून आहोत. आपल्याकडे विविध देशांची लढाऊ विमाने आतापर्यंत राहिली आहेत. यात स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात ब्रिटिश, अमेरिकी नंतरच्या काळात फ्रान्स, रशियन आदी विमानांचा समावेश करता येईल. प्रत्येक विमानाची क्षमता वेगळी असते आणि युद्धामधील विमानांचे कार्य त्यानुसार ठरते. लढाऊ विमानांची संख्या हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येथे अधोरेखित करावा लागेल. लढाऊ विमानांची गरज आणि त्यांची प्रत्यक्षात असणारी संख्या हा नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. ४० हून अधिक स्क्वाड्रन्सची गरज असताना आणि लढाऊ विमानांची आपल्याकडील संख्या सध्या खूप कमी आहे. त्यात स्वयंपूर्णता नसल्याने स्वदेशी उत्पादनाला मर्यादा आहेत.
लढाऊ विमानांच्या बाबतीत रशियाची साथ भारताला मोठी लाभली आहे. तंत्रज्ञान हस्तांतर आणि भारतातच विमानांची बांधणी करायला रशिया तयार झाल्याने मिग, सुखोई अशी विमाने भारतात मोठ्या प्रमाणावर तयार झाली. कालपरत्वे या विमानांमध्ये सुधारणा केल्या गेल्या. विमानांचे आयुर्मान हादेखील चिंतेचा विषय आहे. विमानांच्या आयुर्मानाबाबत हवाई दलाचे निवृत्त उपप्रमुख एअर मार्शल भूषण गोखले यांनी सांगितले, ‘विमानांचे आयुर्मान दोन प्रकारे मोजतात. एक म्हणजे ‘कॅलेंडर लाइफ’ आणि दुसरे म्हणजे ‘टोटल टेक्निकल लाइफ’. कॅलेंडर लाइफ म्हणजे एखादे विमान खरेदी करतो, तेव्हा योग्य निगा राखली आणि विमानांचा पूर्ण वापर झाला, तर साधारण हे विमान किती काळ सेवा देऊ शकते, तो काळ. काही वेळा विमानांचा वापर म्हणावा तितका होत नाही. अशा वेळी तंत्रज्ञानाच्या मदतीने विमानांच्या सर्व भागांची तपासणी केली जाते. सर्व परिपूर्ण तपासण्या केल्यानंतर विमानांचे ‘कॅलेंडर लाइफ’ वाढविले जाते. विमानाच्या ‘टोटल टेक्निकल लाइफ’शी सुसंगत अशी ही वाढ असते. पण, विमानांची संख्याच अपुरी असेल, तर बऱ्याचदा हे ‘टोटल टेक्निकल लाइफ’ही वाढवावे लागते. त्याला पर्याय नसतो. नवी विमानेच दाखल होत नसल्याने हे उपाय करावे लागतात.’
लढाऊ विमानांच्या संख्येबरोबरच मोठ्या संख्येने असलेली जुनी विमाने आणि नव्याने दाखल होणारी कमी विमाने यांतील तफावत दूर करण्याचेही आपल्यासमोर आव्हान आहे.
क्षेपणास्त्रे
क्षेपणास्त्रांच्या बाबतीत सुदैवाने आपण जवळपास आत्मनिर्भर आहोत. बदलत्या युद्धतंत्रात आपली ही खूप मोठी जमेची बाजू आहे. विविध लक्ष्यांनुसार आपण विविध प्रकारची क्षेपणास्त्रे तयार केली आहेत. बॅलिस्टिक, क्रूझ क्षेपणास्त्रांसह एकूण हवाई संरक्षणाच्या पातळीवर आपण प्रगती करीत आहोत आणि तंत्रज्ञानामध्ये अद्ययावतपणा आणत आहोत.
क्षेपणास्त्र-लढाऊ विमानांची सांगड
लढाऊ विमानांमध्ये शत्रूच्या विमानांना, शत्रू प्रदेशातील लक्ष्यांना टिपण्यासाठी शस्त्रप्रणाली असते. मात्र, या मूळ शक्तीची भेदकता इतर क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने वाढविता येते. भारताच्या बाबतीत विचार केला, तर लढाऊ विमानांवर अशी अद्ययावत क्षेपणास्त्र प्रणाली बसविण्यास भारताला यश आले आहे. ब्राह्मोस हे अतिशय वजनदार असे क्षेपणास्त्र ‘सुखोई-३० एमकेआय’ या विमानांवर बसविल्यामुळे या विमानांची भेदक क्षमता कमालीची वाढली आहे. हवेतल्या हवेत इंधन भरण्याच्या क्षमतेमुळे ही भेदक क्षमता आणखी वाढली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्रे अचूक हल्ले करण्यासाठी ओळखली जातात. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये या क्षेपणास्त्रांनी बजावलेल्या अचूक कामगिरीमुळे आपली क्षेपणास्त्रसज्जता सिद्ध झाली आहे. ब्राह्मोस-सुखोई यांच्या यशस्वी एकत्रिकरणामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रापासून आफ्रिका-युरोपपर्यंतचा टप्पा गरज पडली तर आपण गाठू शकतो. हवाई शक्ती आणि भेदकता वाढविण्यासाठी पूर्वीही प्रयत्न झाले आहेत. पाश्चिमात्य क्षेपणास्त्रे रशियाच्या विमानांवरही आपण बसविली आहेत. असे करून विमानांची एकूण भेदक क्षमता वाढविण्यात आपल्याला यश आले आहे.
‘ब्राह्मोस एनजी’ या नव्या छोट्या क्षेपणास्त्रावर काम सुरू असून, भविष्यात अधिकाधिक सुखोई आणि इतर विमानेही या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असतील. लष्कर आणि नौदलाकडे ब्राह्मोस क्षेपणास्त्र यापूर्वीच दाखल झाले आहे.
पुढे काय?
केवळ लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे यांच्या एकत्रिकरणाचा हा विषय नसून, एकूण हवाई संरक्षण आणि हवाई हल्ल्यांचा आहे. कुठल्या क्षणी कुठले हत्यार वापरायचे हे युद्धातील स्थिती आणि लक्ष्य पाहून निश्चित केले जाते. अण्वस्त्रांपासून पारंपरिक शस्त्रांपर्यंत आणि नव्या अशा हायब्रिड युद्धपद्धतीतही भारत अधिकाधिक सक्षम आणि परिपक्व होत आहे. अतिशय वेगाने बदलणाऱ्या भूराजकीय स्थितीत हा अद्ययावतपणा गरजेचा आहे. जुनी लढाऊ विमाने आणि लढाऊ विमानांच्या इंजिनसाठी असलेले परावलंबित्व यावर खूप काम करावे लागणार आहे. क्षेपणास्त्रांच्या बाबतीतील सुसज्जता आपली जमेची बाजू आहे. भारताच्या या वाढत्या तंत्रकुशलतेची दखल साऱ्या जगात घेतली जात आहे. तंत्रकुशल आणि प्रभावी युद्धकौशल्य जितके अधिकाधिक सक्षम आणि धारदार होईल, आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा आवाज तितकाच बुलंद होत जाईल.
prasad.kulkarni@expressindia.com
