पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात अनेक पावले उचलली आहेत. याच निर्णयाच्या अंतर्गत केंद्र सरकारने भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणारे अनेक व्हिसा रद्द केले, ज्यात वैद्यकीय व्हिसाचादेखील समावेश आहे. वैद्यकीय व्हिसा घेऊन भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची अंतिम मुदत मंगळवारी (२९ एप्रिल) संपली आहे.
मात्र, पाकिस्तानच्या अनेक नागरिकांनी केंद्र सरकारला त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. अल्पकालीन व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना रविवारी (२७ एप्रिल) पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. वैद्यकीय व्हिसा रद्द केल्याने पाकिस्तानी नागरिक अडचणीत का आले? भारत सरकारच्या निर्णयाचा फटका पाकिस्तानी नागरिकांना कसा बसला? त्याविषयी जाणून घेऊ.

वैद्यकीय व्हिसा रद्द केल्याचा परिणाम
वैद्यकीय व्हिसाधारकांसाठीची अंतिम मुदत संपली असल्याने पाकिस्तानी नागरिकांना भारतातून निघून जावे लागले आहे. काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला, त्यानंतर भारत सरकारकडून दीर्घकालीन, राजनैतिक आणि अधिकृत व्हिसा वगळता सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. पाकिस्तानच्या जिओ न्यूजशी बोलताना सिंध प्रांतातील हैदराबाद येथील एका व्यक्तीने त्यांच्या दोन मुलांचे वैद्यकीय उपचार होईपर्यंत त्यांना देशात राहण्याची परवानगी मागितली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या नऊ आणि सात वर्षांच्या मुलांना जन्मजात हृदयरोग आहे आणि या आठवड्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. “त्यांना हृदयरोग आहे आणि भारतातील प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे त्यांच्यावर नवी दिल्लीत उपचार शक्य झाले आहेत. परंतु, पहलगाम घटनेनंतर आम्हाला ताबडतोब पाकिस्तानला परतण्यास सांगण्यात आले आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, पोलिस त्यांच्यावर भारत सोडण्यासाठी दबाव आणत आहेत. “मी सरकारला आवाहन करतो की, त्यांनी माझ्या मुलांचे वैद्यकीय उपचार पूर्ण करण्याची परवानगी द्यावी, कारण आम्ही आतापर्यंत त्यासाठी आमच्या प्रवासावर, राहण्यावर आणि त्यांच्या उपचारांवर सुमारे एक कोटी रुपये खर्च केले आहेत.” दोन्ही सीमेपलीकडील नागरिकांना नातेवाईकांना निरोप देताना अश्रू अनावर झाले. भारताने पंजाबमधील अटारी सीमेवरील तपासणी नाका बंद केला आहे, तर पाकिस्तानने वाघा सीमा बंद केली आहे. व्यापार आणि प्रवाशांना ये-जा करण्यासाठी अटारी-वाघा बॉर्डर हा दोन्ही देशांकरिता एकमेव जमिनी मार्ग आहे.
अटारी सीमेवर राहणारी पाकिस्तानी नागरिक समरीनने ‘एएनआय’ला सांगितले की, ती सप्टेंबरमध्ये ४५ दिवसांच्या व्हिसावर भारतात आली होती. तिचे लग्न येथे झाले होते, पण दीर्घकालीन व्हिसा मिळू शकला नाही म्हणून तिला तिच्या देशात परतावे लागले. “अचानक मला देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. दहशतवाद्यांना प्रश्न केला पाहिजे की आमची काय चूक आहे? आम्हाला शिक्षा का होत आहे? ज्या लोकांचे नातेवाईक देशात आहेत त्यांना राहू दिले पाहिजे,” असे ती म्हणाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिलपासून अटारी-वाघा सीमेवरून ५३७ पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात परतले आहेत, तर ८५० भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.

पाकिस्तानला भारताच्या वैद्यकीय व्हिसाची गरज का?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधून भारतात होणाऱ्या वैद्यकीय व्हिसावर येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ‘न्यूजलॉन्ड्री’नुसार, २०२४ मध्ये भारताने वैद्यकीय प्रवासासाठी ४,६३,७२५ व्हिसा जारी केले होते. गेल्या काही वर्षांत भारतात वैद्यकीय व्हिसावर येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २०२०-२१ च्या वैद्यकीय पर्यटन निर्देशांकात भारत १० व्या क्रमांकावर आहे. परंतु, पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय व्हिसांमध्ये घट होत आहे. २०१६ मध्ये भारताने पाकिस्तानसाठी १,६०० हून अधिक वैद्यकीय व्हिसा जारी केले होते, परंतु २०२४ मध्ये हा आकडा २०० करण्यात आला, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने दिले आहे.
पाकिस्तानच्या ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’च्या २०१६ च्या अहवालात २०१३ ची आकडेवारी गृहीत धरून असे म्हटले आहे की, दरवर्षी भारतात येणाऱ्या सर्व विदेशी नगरिकांपैकी १५ ते २० टक्के नागरिक पाकिस्तानचे होते. पश्चिमेकडील देशांच्या तुलनेत भारतात चांगल्या दर्जाचे उपचार आणि किफायतशीर उपचाराचे पर्याय उपलब्ध असल्याने पाकिस्तानी नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या संख्येने भारतात येतात. नवी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटल्सचे डॉ. अनुपम सिब्बल यांनी ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ला सांगितले होते की, पाकिस्तानातील रुग्ण अवयव प्रत्यारोपणासह काही गुंतगुंतीच्या शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी भारतात येतात.
“आमच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात घन अवयव प्रत्यारोपण, यकृत आणि एकत्रित यकृत-मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे रुग्ण पाहतो. हे नागरिक कर्करोग न्यूरोसायन्स, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि बालरोग व ऑर्थोपेडिक्सच्या उपचारांसाठीदेखील भारतात येतात,” असे ते म्हणाले. पाकिस्तान मेडिकल असोसिएशन (पीएमए) चे तत्कालीन सरचिटणीस डॉ. मिर्झा अली अझहर म्हणाले की, पाकिस्तानी रुग्ण मुलांना जन्मजात हृदयविकार असल्यास उपचारासाठी भारतात आणतात. ते म्हणाले, “बंगळुरू येथे हृदयविकार असलेल्या मुलांच्या उपचारांसाठी एक मोठे केंद्र आहे, इथे हे रुग्ण उपचारासाठी येतात, ” असे त्यांनी ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ला सांगितले.
वैद्यकीय व्हिसामध्ये घट
२०१७ मध्ये पाकिस्तानने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भारताचा हेर म्हणून दोषी ठरवले. कुलभूषण जाधव यांची सुटका करण्यास पाकिस्तानने नकार दिल्याने राजनैतिक संकट निर्माण झाले. या प्रकरणानंतर, भारताने पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेल्या वैद्यकीय व्हिसामध्ये मोठी घट केली. २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचे संबंध आणखी बिघडले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार २०१६ मध्ये पाकिस्तानी नागरिकांना १,६७८ वैद्यकीय व्हिसा देण्यात आले होते, परंतु, २०१९ ते २०२४ मध्ये केवळ १,२२८ व्हिसा जारी करण्यात आले. २०१९ मध्ये ५५४, २०२० मध्ये ९७, २०२१ मध्ये ९६, २०२२ मध्ये १४५, २०२३ मध्ये १११ आणि २०२४ मध्ये २२५ वैद्यकीय व्हिसा पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आले. आता आरोग्य सेवा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वैद्यकीय कारणांसाठी पाकिस्तानमधून भारतात येणे पूर्णपणे बंद होऊ शकते.
वैद्यकीय प्रवास सहाय्य कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले, “पाकिस्तानातील रुग्ण यकृत प्रत्यारोपण आणि जन्मजात दोषांवर उपचार करण्यासाठी भारतात येत असतात. हे उपचार त्यांच्या देशात उपलब्ध नाहीत आणि अमेरिका व ब्रिटनसारख्या देशात हे उपचार खूप महाग आहेत. परंतु, गेल्या सहा ते सात वर्षांत पाकिस्तानी नागरिकांची संख्या खूपच कमी झाली आहे आणि आता पहलगाम घटनेनंतर ही संख्या अधिक घटण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि भारतातील तणाव आणखी वाढेल का आणि नागरिकांना किती काळ त्याचा फटका सहन करावा लागेल, याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे.