Why is Pakistan Air Pollution so Bad : दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीचे सर्वांनाच विशेष आकर्षण असते. यंदा भारतीयांनी फटाक्यांवर तब्बल सात हजार कोटी रुपये इतका प्रचंड दौलतजादा केला. या आतषबाजीनंतर राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढली. यादरम्यान फटाक्यांमुळे निर्माण झालेल्या जाड धुरक्याची चादर पाकिस्तानपर्यंत पोहोचली असल्याचा आरोप तेथील नेत्यांनी केला. भारतात प्रचंड फटाके फोडले जात असल्याने लाहोर शहरातील लोकांना श्वास घेणेही कठीण झाल्याचे पाकिस्तानी नेत्यांनी म्हटले आहे, पण खरंच भारतातील फटाक्यांचा धूर पाकिस्तानपर्यंत गेला आहे का? त्या संदर्भातील हा आढावा…
गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे. मंगळवार सकाळपर्यंत लाहोर शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३६६ पर्यंत वाढला होता, त्यामुळे प्रदूषणाच्या यादीत नवी दिल्लीनंतर या शहराचा दुसरा क्रमांक लागला. सध्या भारताच्या राजधानीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४४२ इतका असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या बिघडलेल्या हवामानासाठी भारताला जबाबदार धरले आहे. वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे भारतातून येणारा फटाक्यांचा धूर पाकिस्तानमध्येच अडकून पडल्याचे वृत्त ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिले आहे.
भारतातील फटक्यांमुळे पाकिस्तानला फटका?
भारतातील दिवाळीच्या आतषबाजीनंतर पाकिस्तानला वायू प्रदूषणाचा गंभीर फटका बसल्याचा दावा तेथील नेत्यांकडून केला जात आहे. लाहोरसह अनेक प्रमुख शहरांची हवा गुदमरून टाकणाऱ्या पातळीवर पोहोचली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘डॉन’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या उत्सवानंतर भारतातून आलेल्या विषारी धुरामुळे पाकिस्तानमधील हवा दूषित झाली. त्यातच हवेचा वेग मंदावल्याने हा धूर पाकिस्तानी प्रांतातील हवेतच थांबून राहीला. पाकिस्तानच्या पंजाब पर्यावरण संरक्षण विभागाने सांगितले की, नवी दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर शहरांमधून आलेल्या प्रदूषणामुळे तेथील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. वाऱ्याचा ताशी वेग केवळ ४ ते ७ किमी असल्याने हवेतील सूक्ष्म कण सीमा ओलांडून फैसलाबाद, गुजरांवाला, साहिवाल आणि मुलतान या शहरांपर्यंत पसरले आहेत.
पाकिस्तानमधील कोणकोणती शहरे प्रदूषित?
पाकिस्तान पर्यावरण संरक्षण संस्थेच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी लाहोर शहरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक ३३२ इतका नोंदवला गेला, तर फैसलाबाद ३२५, शेखूपुरा ३११, डेरा गाझी खान २३९, गुजरानवाला २३३ आणि मुलतान शहरात हा निर्देशांक २२४ इतका होता. भारतातील नवी दिल्ली आणि कोलकातानंतर सोमवारी लाहोर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले होते. मात्र, मंगळवारपर्यंत लाहोरने एक पायरी चढत दुसरा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, लाहोरची हवेची गुणवत्ता खालावण्यामागे फक्त दिवाळीतील फटाकेच जबाबदार नाहीत. मागील अनेक वर्षांपासून या शहराला हिवाळ्यातही खराब हवेचा सामना करावा लागत आहे.
पाकिस्तानमधील प्रदूषणाचे मूळ कारण काय?
गेल्या वर्षी याच काळात लाहोरमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३९४ पर्यंत नोंदवला गेला होता. शेतीतला कचरा जाळणे आणि औद्योगिक उत्सर्जन यांसारख्या स्थानिक कारणांमुळे शहराला आधीच दाट धूरक्याने वेढले होते. वाढत्या धूरक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब सरकारने आपत्कालीन उपाययोजना जारी केल्या आहेत. त्यामध्ये भारताकडून येणाऱ्या प्रदूषणाला तोंड देण्यासाठी आणि स्थानिक उत्सर्जन कमी करण्यासाठी कठोर कारवाईचा समावेश आहे. पंजाब सरकारने ‘Anti-Smog Guns’चा वापर सुरू केला आहे. त्याशिवाय लाहोरमधील मुख्य रस्त्यांवर पाण्याची फवारणी केली जात आहे. या मोहिमेत जवळपास नऊ सरकारी विभागांनी सहभाग घेतला आहे.
पाकिस्तानने प्रदूषणाबाबत काय इशारा दिला?
पंजाबचे मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रदूषण करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी काही पथकेदेखील तयार केली आहेत. नवाज यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री मरियम औरंगजेब यांनी या परिस्थितीचे वर्णन सीमेपलीकडचे पर्यावरणीय आव्हान असे केले आहे. त्यांनी नागरिकांना स्थानिक उत्सर्जन कमी करण्याचे आवाहन केले असून, भारताकडून येणाऱ्या प्रदूषणावर सरकारचे लक्ष असल्याचे म्हटले आहे. “भारतातील अमृतसर, लुधियाना आणि हरियाणा या तीन राज्यांमधून येणारे वारे प्रदूषण घेऊन येतील, त्यामुळे आगामी काळात लाहोर शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक २१० ते २३० दरम्यान राहील”, अशी पोस्ट त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केली आहे.
प्रदूषणाला जबाबदार असलेल्यांना होतेय अटक
प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तान सरकारने कठोर नियमांची अंमलबजावणी केली आहे. उघड्यावर ठेवलेले बांधकाम साहित्य झाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. महत्त्वाच्या मार्गांवरून धावणाऱ्या वाहनांची प्रदूषण चाचणी केली जात आहे. आतापर्यंत प्रदूषणाला जबाबदार असलेल्या ८३ लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रदूषित कारखाने चालवणारे आणि टायर व कचरा जाळणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. अलीकडच्या वर्षांत पाकिस्तानमध्ये वायू प्रदूषण हे सर्वात गंभीर सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय संकटांपैकी एक झाले आहे. ही परिस्थिती औद्योगिक उत्सर्जन, वाहनांचे प्रदूषण, गवत जाळणे आणि इतर वायू प्रदूषणामुळे उद्भवल्याचे सांगितले जात आहे. विषारी हवेचा सामना करण्यासाठी तेथील सरकारने लाहोरच्या प्रमुख रस्त्यांवर धुरविरोधी तोफा तैनात केल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे आगामी काळात पाकिस्तान वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात कितपत यशस्वी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.