कालबाह्य झालेल्या औषधांची विल्हेवाट कशी लावायची हे तुम्हाला माहीत आहे का? ती फक्त कचऱ्याच्या डब्यात टाकायची की आणखी काही? जर तसं असेल, तर या सूचना तुमच्यासाठी आहेत… भारतातील सर्वोच्च औषध नियामक संस्थेने कालबाह्य झालेली औषधे आणि त्यांची विल्हेवाट कशी लावावी याबाबत काही सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे काही ठरावीक औषधांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली नाही, तर त्याचे काय परिणाम होतात याबाबतही इशारा दिला आहे.
सेंट्रल ड्रग्ज कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ)ने अशा १७ औषधांची यादी जारी केली आहे, जी कालबाह्य झाल्यास किंवा वापरात नसल्यास ती कचराकुंडीत न टाकता, सरळ टॉयलेटमध्ये फ्लश करावीत, असे सांगण्यात आले आहे. अशा औषधांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली नाही, तर ती माणसांना आणि पर्यावरणाला हानिकारक ठरू शकतात, असा इशारा सीडीएससीओने दिला आहे.
अशी औषधे नेमकी कोणती?
सीडीएससीओने १७ औषधांची यादी जारी केली आहे. त्यामध्ये बहुतेक अमली पदार्थांचा समावेश असलेली औषधे आहेत, जी काटेकोरपणे टॉयलेटमध्ये फ्लश करावीत, अशी आहेत. त्याशिवाय त्यामध्ये फेंटानिल, टॅपेंटाडोल, ऑक्सिकोडोन आणि इतर अनेक वेदनाशामक औषधे तसेच डायझेपाम अशा औषधांचा समावेश आहे.
१७ औषधांची यादी:
- फेंटानिल
- फेंटानिल सायट्रेट
- डायझेपाम
- बुप्रेनॉर्फाईन
- बुप्रेनॉर्फाईन हायड्रोक्लोराईड
- मॉर्फिन सल्फेट
- मेटाडोन हायड्रोक्लोराईड
- हायड्रोमोर्फोन हायड्रोक्लोराईड
- हायड्रोकोडोन बिटारट्रेट
- टॅपेंटाडोल
- ऑक्सिकोडोन हायड्रोक्लोराईड
- ऑक्सिकोडोन
- ऑक्सिमोर्फोन हायड्रोक्लोराईड
- सोडियम ऑक्सिबेट
- ट्रॅमडोल
- मेथाईलफेनिडेट
- मेपराडाईन हायड्रोक्लोराईड
यामागे नेमके कारण काय?
सीडीएससीओच्या मते, ही १७ औषधे ज्या रुग्णांसाठी दिली आहेत, त्या रुग्णांव्यतिरिक्त इतर कोणीही घेतल्यास ती हानिकारक किंवा प्राणघातक ठरू शकतात. ही अशी औषधे आहेत, ज्याचा चुकून घेतला गेलेला एखादा डोससुद्धा जीवावर बेतू शकतो. पीटीआयने दिलल्या वृत्तानुसार, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कालबाह्य किंवा न वापरलेल्या औषधांची सुरक्षित आणि योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे, असे सीडीएसीओने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे. जर ही औषधे घरात पडून असतील आणि ती वापरात नसतील किंवा कालबाह्य झाली असतील, तर ती सरळ सिंक किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकावीत. असे केल्याने इतर लोकांना किंवा पाळीव प्राण्यांना धोका निर्माण होणार नाही, असे यामध्ये सीडीएससीओने सांगितले आहे.
कालबाह्य किंवा ना वापरलेल्या औषधांची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावणे मनुष्य, प्राणी आणि पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्यामुळे जवळच्या परिसरातील किंवा वन्यजीवांना लागणाऱ्या पाणीपुरवठ्यात मिसळून, तसेच स्थानिक जलस्रोत दूषित होऊन, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. ही औषधे उघड्यावरील कचराकुंडीत टाकून दिल्यास त्याचा धोका सफाई कामगारांना किंवा रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना होऊ शकतो, असेही यामध्ये म्हटले आहे.
नियामक संस्थेने असाही इशारा दिला आहे की, टाकाऊ औषधांच्या साठ्यातून किंवा वर्गीकरणादरम्यान ही औषधे पुनर्विक्रीसाठी बाजारात येऊ शकतात आणि त्यांचा गैरवापरही होऊ शकतो. असे असताना सीडीएससीओने असेही अधोरेखित केले की, लोकांनी साधारणपणे पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी टाकाऊ औषधांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य औषध नियंत्रण विभाग आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी संयुक्तपणे ‘ड्रग टेक बॅक’ हा उपक्रम सुरू करण्याची शिफारस केली आहे. त्याअंतर्गत लोक न वापरलेली किंवा कालबाह्य झालेली औषधे परत करू शकतात.
सुरुवातीला राज्य औषध नियंत्रण विभाग आणि संबंधित केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन संयुक्तपणे ठरवलेल्या काही ठिकाणी हा उपक्रम सुरू करू शकतात. जिथे लोक त्यांच्या घरातली कालबाह्य किंवा न वापरलेली औषधे जमा करू शकतील आणि नोंदणीकृत किंवा परवानाधारक एजन्सींच्या मदतीने संबंधित राज्य औषध परवाना प्राधिकरणाला याची माहिती देऊन, अशा संघटनांद्वारे त्या औषधांची विल्हेवाट लावली जाईल, असेही सीडीएससीओने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ठळक मुद्दे:
- सीडीएससीओने १७ औषधे फ्लश करण्याच्या सूचना दिल्या
- या औषधे कचराकुंडीत टाकल्यामुळे मनुष्याप्रमाणे प्राण्यांनाही धोका उद्भवू शकतो
- इतर साधारण औषधांप्रमाणे कचराकुंडीत न टाकण्याचा सल्ला
औषधांची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावल्यास पर्यावरणाला धोका कसा होतो?
पूर्वीचे अनेक अहवाल आणि अभ्यासांतून असे दिसून आलेय की, वापरात नसलेल्या किंवा कालबाह्य झालेल्या औषधांची अवैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावल्याने पर्यावरण कशा प्रकारे दूषित झाले आहे, तसेच मानवी आरोग्यावर त्याचा कसा परिणाम झाला आहे.
एम्सच्या ऑक्युलर फार्माकोलॉजी विभागाने २०१८ मध्ये केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, कचऱ्याच्या डब्क्यात टाकलेली औषधे वातावरणात मिसळतात. यमुना नदीतील सात ठिकाणांवरील पाण्याचे नमुने, दिल्ली-एनसीआरमधील ३५ बोअरवेल आणि गाजीपूर लँडफील साइटवरील कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या विश्लेषणावर आधारित हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यमुना नदीकिनारी आणि गाजीपूर कचराकुंडीजवळील भागात अँटी-बायोटिक्स आणि इतर औषधांचे अंश संशोधकांना आढळले आहेत.
टाकून दिलेल्या औषधांमुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण कमी करणे आणि सार्वजनिक आरोग्यास होणारा धोका कमी करणे हा सीडीएससीओच्या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश आहे. “वापर न झालेल्या किंवा कालबाह्य झालेल्या औषधांच्या विल्हेवाटीबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा सरकारचा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. याबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी रुग्णालयातून डिस्चार्ज देताना सर्व रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल एक पुस्तिका विकसित करण्याची आमची योजना आहे”, असे मॅक्स हेल्थकेअरच्या संचालिका व फार्मसी प्रमुख देवरती मजुमदार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.
“कालबाह्य औषधे ही मूळात रासायनिक कचरा असतात”, असे एका वरिष्ठ पर्यावरण तज्ज्ञाने न्यूज १८ ला सांगितले. ही औषधे भूजल आणि नद्यांमध्ये मिसळतात. त्यामुळे मासे, वनस्पती आणि अखेर मनुष्यावर त्याचा परिणाम होतो. “त्यामुळेच आता देशव्यापी जागरूकता मोहीम आणि योग्य विल्हेवाट लावण्यासाठीचे प्रोटोकॉल आवश्यक आहेत”, असे मजुमदार यांनी पुढे सांगितले