Pakistan attacked Dwarka in 1965: ३० ऑक्टोबर रोजी तिन्ही भारतीय सेनादलं एकत्र येवून गुजरातच्या समुद्रात युद्धसराव करणार आहेत. त्यामुळे फ्रिगेट्स, विनाशिका आणि दीर्घ पल्ल्याची टेहळणी विमानं यांच्या एकत्रित सराव मोहिमेने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मोहिमेचं नाव त्रिशूल २०२५ आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर तिन्ही सेनादलांचा असा हा पहिलाच एकत्रित सराव आहे. अलीकडेच पाकिस्तानने कच्छमधील सर क्रीकवर आपला हक्क असल्याचा दावा केला. त्याच पार्श्वभूमीवर ही युद्धअभ्यास सरावाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या लष्करी सरावात भारतीय सेनेचे एक दल डिव्हिजन रणगाडा, पायदळ, तोफखाना आणि हेलिकॉप्टर गनशिपसह सहभागी होईल, तसेच वायुदलाची सु-३०एमकेआय आणि राफेल लढाऊ विमानं देखील या १५ दिवस चालणार्‍या युद्धसरावात सहभागी होत आहेत. गुजरातनजीक अरबी समुद्रात होणाऱ्या या युद्धसरावामुळे ६० वर्षांपूर्वी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

साठ वर्षांपूर्वी, १९६५ साली भारत-पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाल्यावर एप्रिल महिन्यात पाकिस्तान लष्कराने नव्याने मिळवलेले पॅटन रणगाडे आणि एफ-८६ सॅबर जेट वापरून कच्छवर हल्ला केला होता. १ सप्टेंबर १९६५ रोजी पाकिस्तानने ऑपरेशन ग्रँड स्लॅम सुरू केले होते. हा एक बख्तरबंद हल्ला होता. या हल्ल्यात अखनूरला लक्ष्य करण्यात आले होते, या हल्ल्याचा हेतू जम्मू-काश्मीरला भारतापासून तोडणे हा होता.

त्यानंतर पाकिस्तानने ७ सप्टेंबरच्या रात्री आणखी एक हल्ला केला. पाकिस्तान नौदलाची युद्धनौका पीएनएस बाबर, पीएनएस टिपू सुलतान, पीएनएस खैबर, पीएनएस शाहजहान, पीएनएस बद्र, पीएनएस आलमगीर, पीएनएस जहांगीर आणि ताफ्याचे इंधनवाहक जहाज पीएनएस ढाका हा सर्व ताफा द्वारका किनाऱ्याजवळ (कराचीपासून सुमारे २०० कि.मी.वर) पोहोचला. या ताफ्याने किनाऱ्यावरूनच द्वारका मंदिरावर गोळीबार (shore bombardment) केला.

नौदलाचा तोफगोळ्यांचा मारा सुमारे ३० मिनिटे सुरू होता आणि सुमारे ५० तोफगोळे (प्रत्येक १३० मिमी हाउझर गोळ्यांच्या तोडीचा) डागण्यात आले. त्यापैकी बहुतेक गोळे द्वारका मंदिराच्या आणि रेल्वे स्थानकाच्या परिसरात पडले. परिणामी फक्त रेल्वे गेस्ट हाऊसचे नुकसान झाले आणि एका गाईचा मृत्यू झाला. फक्त १० गोळेच प्रत्यक्षात फुटले. तरीही पाकिस्तान नौदलाने याला आपला विजय मानला.

पाकिस्तानी योजनेचा हेतू

पाकिस्तानची योजना अत्यंत धाडसी आणि चलाखीची होती. द्वारकेवर झालेला हा हल्ला लक्ष वळवण्यासाठीचा डाव (ruse) होता. या हल्ल्यामुळे भारतीय नौदलाने बॉम्बे (मुंबई) बंदरातून बाहेर येईल आणि मग बाहेर थांबलेली पाकिस्तानची पीएनएस गाझी पाणबुडी (त्या काळात उपखंडातील एकमेव पाणबुडी) भारतीय जहाजांवर हल्ला करेल, असा यामागचा हेतू होता. प्रत्यक्षात द्वारकेवरचा हा हल्ला लष्करीदृष्ट्या निष्फळ ठरला. कोणतेही नुकसान झाले नाही. पण पाकिस्तानी नौदलाने तो प्रतिकात्मक विजय मानला आणि म्हणूनच पाकिस्तानमध्ये ८ सप्टेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय नौदलातील प्रतिक्रिया

त्या रात्री भारतीय नौदलाची आयएनएस तलवार (INS Talwar) ही युद्धनौका ओखा बंदरावर (द्वारकेपासून फक्त ३० कि.मी. अंतरावर) नांगरलेली होती. ही ब्रिटिश निर्मित व्हिटबी वर्गातील आधुनिक फ्रिगेट होती, या युद्धनौकेवर दुतर्फा मारा करणाऱ्या ४.५ इंच रडार-नियंत्रित तोफा बसवलेल्या होत्या. ही युद्धनौका त्या काळातील आशियातील सर्वाधिक आधुनिक युद्धनौकांपैकी एक होती. INS Talwar ने पाकिस्तानच्या ताफ्याचा शोध घेतला होता, पण गोळीबार केला नाही. कारण त्या वेळी भारतीय नौदलाला युद्धात भाग न घेण्याचे आदेश दिले गेले होते. भारतीय नौदलात याला अनौपचारिकरीत्या ‘तलवार प्रकरण (The Talwar Incident)’ म्हटले जाते. अनेक तरुण नौदल अधिकाऱ्यांमध्ये या घटनेमुळे संताप आणि असंतोषाची भावना निर्माण झाली.

भारतीय अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

व्हाइस अॅडमिरल एन. कृष्णन यांनी पाकिस्तानच्या या हल्ल्याचे वर्णन भारताच्या राष्ट्रीय सन्मानाला धक्का असे केले होते. त्यांनी उपहासाने म्हटले होते की, पाकिस्तान्यांनी फक्त एक गाईला मारलं, असं आपण हसून उडवू शकत नाही. निदान त्या गाईसाठी तरी एक स्मारक उभारूया. कारण ती पाकिस्तानी नौदलाविरुद्धच्या लढाईत स्वतःच्या पायांवर उभी राहून मरण पावली. (संदर्भ: अॅडमिरल मिशीर रॉय: War in the Indian Ocean)

१९७१ मधील प्रतिहल्ला (THE 1971 COMEBACK)

द्वारकेवर पडलेल्या तोफगोळ्यांचा सर्वात खोल परिणाम झाला तो म्हणजे अॅडमिरल सरदारीलाल मथरादास नंदा (S. M. Nanda) यांच्या मनावर. १९७१ साली ते भारतीय नौदलाचे प्रमुख होते. त्यांनी ठरवले होते की, १९६५ सारखी स्थिती पुन्हा निर्माण होऊ देणार नाहीत. त्यांनी अत्यंत आक्रमक नौदल योजना आखली.

१९७१ चा बदला; भारताचे जबरदस्त प्रत्युत्तर

  • १९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानला अक्षरशः समुद्रात गुडघे टेकायला लावले:
  • कराचीवर हल्ला: भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करून त्यांची अनेक युद्धनौकांना जलसमाधी दिली, यात १९६५ मध्ये द्वारकेवर हल्ला करणाऱ्या युद्धनौकांचाही समावेश होता.
  • समुद्री नाकेबंदी: भारताने पाकिस्तानला दोन्ही बाजूंनी (पूर्व आणि पश्चिम) समुद्रात घेरले, त्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला.
  • ‘गाझी’ पाणबुडीचा अंत: पाकिस्तानची अभिमान असलेली ‘पीएनएस गाझी’ पाणबुडीला विशाखापट्टणमच्या समुद्रात जलसमाधी देण्यात भारतीय नौदलाला यश आले. या पाणबुडीतील सर्व ९० पाकिस्तानी नौसैनिक मारले गेले.
  • पूर्वेकडील विजय: पूर्वेकडे (आताचा बांगलादेश), भारताच्या ‘आयएनएस विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेने पाकिस्तानी नौदलाला समुद्रातून पळून जाण्यापासून रोखले.

आजची परिस्थिती (२०२५)

आज परिस्थिती अशी आहे की, भारतीय नौदल पाकिस्तानच्या किनाऱ्याजवळ युद्धसराव करत आहे, पण, पाकिस्तानच्या नौदलाला भारतानजीक समुद्रात येण्याची हिंमत करत नाही. त्यांच्या बहुतेक युद्धनौका बंदरांमध्ये लपलेल्या आहेत. आणि याचीच प्रचिती ऑपरेशन सिंदूरदरम्यान आली होती.