-राखी चव्हाण

जगभरात हत्तीची शिकार वाढली असून त्यांचा अधिवासही वेगात नष्ट होत असल्याने हत्तींची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. सर्वाधिक ६० टक्के हत्ती भारतात आहेत. उर्वरित थायलंड, मलेशिया, नेपाळ, म्यानमार, कंबोडिया, भूतान येथे आहेत. त्यांची प्रत्यक्षात असणारी संख्या जाणून घेण्यासाठी यावर्षी प्रथमच हत्तीच्या विष्ठेवरुन ‘डीएनए’ चाचणी करुन त्यांची ओळख निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतातील हत्तीची याेग्य संख्या समोर येईल. भारतात पहिल्यांदाच हत्ती गणनेसाठी ‘डीएनए’ चाचणीचा प्रयोग केला जात आहे. त्याचे निष्कर्ष जुलै २०२३ पर्यंत समोर येण्याची शक्यता आहे.

हत्तींची डीएनए चाचणी कशासाठी?
वाघांची मोजणी करण्याची शास्त्रोक्त पद्धत गेल्या दहा वर्षात अस्तित्त्वात आली, मात्र हत्ती मोजण्याच्या पद्धती आतापर्यंत तरी शास्त्रोक्त नव्हत्या. २०१२च्या गणनेत वेगवेगळ्या राज्यांनी हत्तीची गणना करण्यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले. त्यामुळे अचूक आकडेवारी समोर आली नाही. गणनेपेक्षा अधिक हत्ती असल्याचे लक्षात येत होते. त्यामुळे आता हत्तीच्या संख्येच्या अंदाज घेण्यासाठी वैज्ञानिक पद्धत विकसित करण्यात आली असून त्यात हत्तीच्या ‘डीएनए’ चाचणीचा समावेश आहे. यात चाचणीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व नमुने दोनदा तपासले जाणार आहेत.

डीएनए चाचणीचा उपयोग आणखी कशासाठी?
अफ्रिकेत हत्तीच्या डीएनए चाचणीवर संशोधन प्रसिद्ध झाले आहे. हा अभ्यास हस्तिदंतासाठी शिकार केल्या जाणाऱ्या हत्तींमधील कौटुंबिक संबंध प्रस्थापित करतो आणि शिकारी व तस्करांच्या परस्पर संबंधांवरही प्रकाश टाकतो. यात संशोधकांनी कायद्याची अंमलबजावणी करुन जप्त केलेल्या हस्तीदंतावर डीएनए चाचणीचा वापर केला. संशोधकाच्या चमुने १२ वेगवेगळ्या अफ्रिकन देशांमध्ये २००२ ते २०१९ या कालावधीत झालेल्या ४९ वेगवेगळ्या घटनांमधील चार हजार हत्तीच्या दातांची चाचणी केली. यात अफ्रिकेतून हस्तीदंत पाठवणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्याचा शोध घेण्यात आला. त्यामुळे भारतातही हत्तीची शिकार, हत्तींमधील कौटुंबिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी डीएनए चाचणीचा उपयोग होणार आहे.

हत्तीची प्रगणना कशी होणार?
हत्तीची प्रगणना तीन टप्प्यात केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात झाडांच्या तुटलेल्या फांद्या, हत्तीच्या पायाचे ठसे आणि हत्तीची विष्ठा यासह सापडलेल्या हत्तींच्या इतर खाणाखुणांचे निरीक्षण करण्यात येणार आहे. कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून हत्तींची संख्या मोजण्यात येईल. तसेच हत्तीच्या विष्ठेच्या नमुन्यांचे डीएनए विश्लेषण करण्यात येईल. हत्तींची ओळख त्यांच्या कळप, आरोग्य आणि पोषण पातळी शिवाय कान आणि दातांच्या आकारासारख्या शरीराच्या वैशिष्ट्यांवरून करण्यात येईल.

मानव-हत्ती संघर्षात वाढ?
अलीकडच्या काळात मानव-हत्ती संघर्षात वाढ झाली आहे. हत्ती एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरत असतात. त्याचप्रमाणे जंगलातून शेतात आणि राज्याच्या सीमा ओलांडूनही जाताना दिसले आहेत. हत्तींमुळे पिकांचे नुकसान झाले असून जीवित व वित्तहानीही असीकडे बरीच झाली आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल खात्यानुसार २०२० मध्ये मानव-हत्ती संघर्षामुळे ८७ हत्ती आणि ३५९ नागरिक मरण पावले. २०१९-२० मध्ये १९ हत्ती आणि ५८५ पेक्षा जास्त मानवी मृत्यू झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय मंत्रालयाचे आकडे काय सांगतात?
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्यानुसार २०१७ मध्ये केलेल्या हत्तींच्या प्रगणनेत भारतात २७ हजारपेक्षा अधिक हत्ती असल्याचे लक्षात आले आहे. यात सर्वाधिक हत्ती कर्नाटक, आसाम आणि केरळमध्ये होते. कर्नाटकात सहा हजार ४९ हत्ती, आसाममध्ये पाच हजार ७१९ तर केरळमध्ये तीन हजार ५४ एवढे हत्ती आहेत. यंदा डीएनए चाचणीनंतर या प्रगणनेत अधिक अचूकता येणे अपेक्षित आहे.