BrahMos missile vs Dhavni भारत आपले संरक्षण क्षेत्र बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. आपली संरक्षण प्रणाली अत्याधुनिक करण्यावर आणि अधिक मजबूत करण्यावर भारत लक्ष केंद्रित करत आहे. अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली, लढाऊ विमाने, प्रगत रडार नेटवर्क आणि मानवरहित प्लॅटफॉर्म विकसित करणे, असे अनेक प्रकल्प भारताने आपल्या हातात घेतले आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या प्रकल्पांवर काम करत आहे.
भारताने आता पुढच्या पिढीतील क्षेपणास्त्र युद्धात (Next-generation missile warfare) आपले पाऊल पुढे टाकले आहे. भारत ध्वनी मिसाईलवर काम करत आहे. मुख्य म्हणजे हे क्षेपणास्त्र ब्रह्मोसपेक्षाही अधिक शक्तिशाली आणि प्राणघातक असेल, असे सांगण्यात येत आहे. ‘ध्वनी’ नावाचे हे क्षेपणास्त्र, चीनच्या DF-26 क्षेपणास्त्रापेक्षाही घातक आहे. हे क्षेपणास्त्र सध्या विकासाधीन असलेल्या क्षेपणास्त्रांपैकी सर्वात प्रगत मानले जात आहे. काय आहे ध्वनी क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य? हे क्षेपणास्त्र ब्रम्होसपेक्षा घातक असेल का? जाणून घेऊयात…

काय आहे ध्वनी क्षेपणास्त्र?
- ‘ध्वनी’ या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि या वर्षाच्या अखेरीस त्याची चाचणी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
- हे क्षेपणास्त्र हायपरसॉनिक ग्लाइड व्हेईकल (HGV) म्हणून तयार केले जात आहे आणि या क्षेपणास्त्राचा वेग ताशी सुमारे ७,४०० किलोमीटर असेल.
- याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उड्डाण करताना हे क्षेपणास्त्र दिशा बदलू शकेल, ज्यामुळे अनपेक्षित दिशांनी लक्ष्यांवर मारा करता येईल.
- अमेरिकेची THAAD किंवा इस्रायलची Iron Dome हवाई संरक्षण प्रणालीसुद्धा ‘ध्वनी’ला पाडू शकणार नाही, असा संरक्षण तज्ज्ञांचा विश्वास आहे.
क्षेपणास्त्राची रचना
‘ध्वनी क्षेपणास्त्रामध्ये दोन-टप्प्यांची प्रणाली आहे. एक म्हणजे रॉकेट बूस्टर, जो त्याला वरच्या दिशेने ढकलतो. रॉकेट बूस्टर वेगळा झाल्यावर, ग्लाइड व्हेईकल हायपरसॉनिक वेगाने आपले लक्ष गाठेल. हे क्षेपणास्त्र ब्रह्मोसप्रमाणेच अतिशय कमी उंचीवरून प्रवास करण्यास सक्षम आहे, परंतु याचा वेग आवाजाच्या वेगाच्या सहापट असेल. वेग आणि कमी उंची यांचा हा मिलाफ या क्षेपणास्त्राला रोखणे अशक्य करतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही प्रणाली जमीन आणि समुद्र-आधारित दोन्ही लक्ष्यांवर अचूक मारा करू शकते.
चीनच्या DF-26 पेक्षा ध्वनी घातक कसे?
चीनचे DF-26 हे जगातील सर्वात विनाशकारी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जात होते. पण, ध्वनी क्षेपणास्त्राबरोबर याची तुलना केल्यास DF-26 मागे पडते. DF-26 अनेक वर्षांपासून तैनात आहे आणि लांब पल्ल्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. परंतु, त्याची रचना तुलनेने निश्चित मार्गांसाठी केली आहे. मात्र, ध्वनीला संरक्षण प्रणालींना चकमा देण्यासाठी आणि मध्य-मार्गात दिशा बदलण्यासाठी तयार केले जात आहे.
DF-26 च्या मारा करण्याच्या कक्षेलादेखील मर्यादा आहेत. रचनेनुसार, ध्वनी त्या मर्यादा मोडते. यामुळे भारताची सामरिक स्थिती लक्षणीयरीत्या प्रबळ होईल हे निश्चित आहे. तसेच हायपरसॉनिक शस्त्रे विकसित करणाऱ्या दुर्मीळ राष्ट्रांच्या गटात म्हणजेच अमेरिका, रशिया आणि चीनच्या या यादीत भारताला स्थान मिळेल.
क्षेपणास्त्राची चाचणी कधी?
मागील काही महिन्यांत, डीआरडीओने अनेक घटक चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. यात एरोडायनामिक मॉडेलिंग, थर्मल व्यवस्थापन, मार्गदर्शन प्रणाली आणि स्क्रॅमजेट प्रपल्शनचा समावेश आहे. अभियंत्यांनी वेगाने निर्माण होणारी अति उष्णता सहन करू शकणारे प्रगत सिरेमिक थर्मल बॅरियर कोटिंग्ज तपासले आहेत. या यशस्वी प्रगतीमुळे ध्वनीच्या उड्डाण चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे, जी २०२५ मध्ये होणे अपेक्षित आहे.
संरक्षण विश्लेषकांना विश्वास आहे की, ब्रह्मोस आणि ध्वनीची जोडी भारताची संरक्षण क्षमता अनेक पटीने बळकट करेल. विश्लेषकांच्या मते, हे भारताच्या धोरणात्मक आणि प्रादेशिक सुरक्षेला एक नवीन दिशा प्रदान करेल. किमान पुढील १५ वर्षांपर्यंत चीन किंवा पाकिस्तान यापैकी कोणताही देश या प्रणालींना तोंड देऊ शकणार नाही. ध्वनीच्या माध्यमातून भारत हा संकेत देत आहे की, भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम केवळ जागतिक शक्तींच्या बरोबरीचाच नाही, तर हायपरसॉनिक वर्चस्वाच्या शर्यतीत एक नवीन बेंचमार्क सेट करण्यास तयार आहे.
भारताचे ब्रम्होस
ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र असून, ते पाणबुड्या, जहाजे, विमाने किंवा जमिनीवर सोडले जाऊ शकते. ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वेग २.८ मॅक म्हणजेच ध्वनीच्या वेगापेक्षा जवळजवळ तिप्पट आहे. क्षेपणास्त्राचे ८३ टक्के भाग भारतात विकसित होतात, असे ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र ४०० किलोमीटरहून अधिक अंतरावरून लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे. आता भारताने परदेशात विकसित शस्त्रांची निर्यातदेखील वाढवली आहे. गेल्या दशकभरात भारताने आपली संरक्षण निर्यात वाढवण्याचे ध्येय पुढे ठेवले आहे. त्यासाठी आवश्यक पावलेदेखील भारताकडून वेळोवेळी उचलण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतासाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली महत्त्वाची ठरली आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरू आहेत. आता ध्वनी क्षेपणास्त्र ब्रम्होसपेक्षा घातक असेल का, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.