scorecardresearch

विश्लेषण: सर डॉन ब्रॅडमन यांनाही सर्फराजने टाकले मागे; नक्की काय केला विक्रम?

इराणी चषकाच्या सामन्यात सौराष्ट्रचा पहिला डाव केवळ ९८ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर शेष भारताची ३ बाद १८ अशी स्थिती झाली होती.

विश्लेषण: सर डॉन ब्रॅडमन यांनाही सर्फराजने टाकले मागे; नक्की काय केला विक्रम?
सर्फराजच्या फलंदाजीच्या तंत्राबाबत कायम चर्चा केली जाते.

-अन्वय सावंत

मुंबईचा युवा फलंदाज सर्फराज खानने गेल्या काही काळात प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २०१९-२०च्या रणजी स्पर्धेदरम्यान मुंबईच्या संघात पुनरागमन करणाऱ्या सर्फराजने गेल्या दोन्ही हंगामांमध्ये ९००हून अधिक धावा केल्या. त्यामुळे त्याच्यासाठी लवकरच भारतीय कसोटी संघाची दारे खुली होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ रणजी करंडक नाही, तर इतर देशांतर्गत प्रथमश्रेणी स्पर्धांमध्येही सर्फराजने आपली छाप पाडली आहे. सौराष्ट्रविरुद्ध इराणी चषकाच्या सामन्यात शेष भारताचा संघ अडचणीत असताना सर्फराजने १३८ धावांची खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रमही मोडीत काढला. हा विक्रम नक्की काय होता आणि सर्फराजची कामगिरी का खास ठरली, याचा आढावा.

ब्रॅडमन यांचा कोणता विक्रम सर्फराजने मोडीत काढला?

ब्रॅडमन यांची क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना केली जाते. त्यांचा विक्रम मोडणे किंवा त्यांच्यासोबत आपले नाव घेतले जाणे, हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. २४ वर्षीय सर्फराजचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. सर्फराजने ब्रॅडमन यांना मागे टाकत प्रथमश्रेणी कारकीर्दीतील पहिल्या ४३ डावांमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे केला आहे. ब्रॅडमन यांनी ४३ डावांमध्ये २९२७ धावा केल्या होत्या, तर सर्फराजने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील ४३व्या डावात सौराष्ट्रविरुद्ध शतक झळकावले. त्यामुळे आता त्याच्या नावावर २९२८ धावा आहेत. ४३ डावांमध्ये सर्फराजने १० शतके आणि ८ अर्धशतके केली असून ब्रॅडमन यांनी १२ शतके आणि ९ अर्धशतके साकारली होती. मात्र ब्रॅडमन यांनी आपल्या ४४व्या डावात नाबाद ४५२ धावांची विक्रमी खेळी केली होती.

सर्फराजच्या सौराष्ट्रविरुद्धच्या खेळीचे काय वैशिष्ट्य होते?

इराणी चषकाच्या सामन्यात सौराष्ट्रचा पहिला डाव केवळ ९८ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर शेष भारताची ३ बाद १८ अशी स्थिती झाली होती. मयांक अगरवाल आणि अभिमन्यू ईश्वरन यांसारखे अनुभवी फलंदाजही माघारी परतले होते. परंतु सर्फराजने सौराष्ट्रच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला. अनुभवी जयदेव उनाडकटसह सौराष्ट्रच्या सर्वच गोलंदाजांवर त्याने दडपण आणले. सर्फराजच्या फलंदाजीच्या तंत्राबाबत कायम चर्चा केली जाते. मात्र स्विंगचा चांगला वापर करणाऱ्या सौराष्ट्रच्या गोलंदाजांचा त्याने नेटाने सामना केला. त्यांनी चुकीच्या टप्प्यावर चेंडू टाकताच सर्फराजने त्याचा फायदा घेतला आणि केवळ ९२ चेंडूंत शतक पूर्ण केले. अखेर १७८ चेंडूंत २० चौकार आणि २ षटकारांसह १३८ धावा करून तो बाद झाला. मात्र त्याच्या खेळीमुळे शेष भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवणे शक्य झाले.

सर्फराजने गेल्या काही काळात कशी कामगिरी केली आहे?

कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आणि आक्रमक वृत्तीमुळे सर्फराजला कारकीर्दीच्या सुरुवातीला मुंबईच्या संघात स्थान टिकवणे अवघड जात होते. त्यामुळे त्याने उत्तर प्रदेशकडून खेळण्याचा निर्णय घेतला, पण तिथेही त्याला फारसे यश मिळाले नाही. अखेर तो मुंबईला परतला आणि २०१९-२०च्या रणजी स्पर्धेदरम्यान त्याने मुंबईच्या संघात पुनरागमन केले. त्या हंगामात त्याने सहा रणजी सामन्यांत १५४.६६च्या सरासरीने ९२८ धावा फटकावल्या. यात एक त्रिशतक, एक द्विशतक आणि एका शतकाचा समावेश होता. त्यानंतर त्याने कामगिरीत सातत्य राखताना रणजीच्या गेल्या हंगामात १२२.७५च्या सरासरीने ९८२ धावा केल्या. त्याने या हंगामात चार शतके आणि दोन अर्धशतके साकारली. तसेच यंदाच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामातील पहिली स्पर्धा दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यातही सर्फराजने शतक झळकावले. त्यामुळे सध्याच्या घडीला सर्फराजची देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जात आहे.

भारतीय कसोटी संघाच्या दिशेने कूच?

ऋषभ पंतचा अपवाद वगळता भारताच्या कसोटी संघातील फलंदाजांना गेल्या काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. धावांसाठी झगडणाऱ्या अनुभवी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी कसोटी संघातील आपले स्थानही गमावले. त्यांच्या जागी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांना संधी देण्यात आली. मात्र या दोघांनाही कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळे पुजाराचे संघात पुनरागमन झाले, परंतु मधल्या फळीतील स्थानांसाठी बरीच स्पर्धा असून लवकरच सर्फराजलाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. रणजी करंडक आणि दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात शतके, तसेच इराणी चषकाच्या सामन्यातही शतक झळकावत सर्फराजने राष्ट्रीय कसोटी संघातील स्थानासाठी आपली दावेदारी नक्कीच भक्कम केली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या