Infant born with 2 babies in abdomen महिलेच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्याही पोटात बाळ दिसून आल्याची घटना गुरुग्राममध्ये घडली आहे. गुरुग्राममधील डॉक्टरांनी एका महिन्याच्या लहान मुलीच्या पोटात वाढत असलेले एक नव्हे, तर दोन गर्भ यशस्वीरीत्या बाहेर काढले आहेत. वैद्यकीय भाषेत या स्थितीला ‘फेटस इन फेटू’ (Foetus in fetu) म्हटले जाते. ही स्थिती अत्यंत दुर्मीळ आहे. जगभरात साधारणपणे पाच लाख जन्मांमागे फक्त एका बाळाला हा आजार होतो. पण, या प्रकरणाची अजून एक आश्चर्यकारक बाजू म्हणजे या बाळाच्या पोटात दोन जुळी बाळं होती. जगभरात आतापर्यंत केवळ ३० पेक्षा जास्त वेळा अशा प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. हा दुर्मीळ प्रकार काय? डॉक्टर याविषयी काय सांगतात? भारतात अशी किती प्रकरणे आढळली? आणि ही शस्त्रक्रिया कशी पार पडली? त्याविषयी जाणून घेऊयात…
पालकांना बाळाचे पोट फुगलेले दिसल्याने, ते सतत चिडचिड करीत असल्याने आणि त्याला दूध पाजण्यात अडचण येत असल्याने पालकांना काळजी वाटू लागली. त्यांनी बाळाला तातडीने रुग्णालयात नेले. तिथे केलेल्या तपासणीत बाळाच्या पोटात एकाच पिशवीत (sac) दोन अविकसित गर्भ होते. या स्थितीला ‘फेटस इन फेटू’ म्हणतात.

‘फेटस इन फेटू’ म्हणजे नेमकं काय?
- ‘फेटस इन फेटू’ ही एक अत्यंत दुर्मीळ स्थिती आहे. एक प्रकारे ही जन्मजात विसंगती आहे.
- बाळाच्या शरीरात अविकसित गर्भ तयार होतो, तेव्हा ही स्थिती निर्माण होते.
- सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा एक जुळा गर्भ काही अडचणींमुळे वाढत नाही, तेव्हा तो दुसऱ्या बाळाच्या पोटात जातो आणि बाळाच्या शरीरात वाढू लागतो. हा गर्भ जिवंत नसतो; मात्र असे असले तरी तो बाळाकडून पोषण घेऊन वाढत राहतो.
- बाळाच्या पोटामध्ये एका गाठीच्या रूपात हा गर्भ दिसून येतो.
- गर्भ हळूहळू विकृत पेशींच्या एका गाठीत बदलतो. कधी कधी त्यात हाडे किंवा अवयवांचे अंशही दिसू शकतात; पण हा गर्भ कधीही एका सामान्य बाळासारखा विकसित होऊ शकत नाही.
या विशिष्ट प्रकरणात संबंधित महिला तिळ्या मुलांसह गर्भवती होती आणि त्यापैकी दोन गर्भ बाळाच्या पोटात वाढू लागले होते. डॉक्टरांच्या मते, या गाठी कर्करोगाच्या नसतात आणि त्याची ट्यूमरसारखी लक्षणे नसतात. एकदा शस्त्रक्रियेने त्या बाहेर काढल्या की, त्या पुन्हा येण्याची शक्यता खूप कमी असते. ही स्थिती वैद्यकीय तज्ज्ञांसाठी बऱ्याच काळापासून आकर्षणाचा विषय राहिली आहे. ‘फेटस इन फेटू’चे पहिले प्रकरण १८०८ मध्ये जॉर्ज विल्यम यंग यांनी नोंदवले होते.
बाळाला कसे वाचवले गेले?
एका महिन्याच्या बाळावर शस्त्रक्रिया करणे अनेक जोखमींनी भरलेले असते. त्यामुळे डॉक्टरांना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागली. शस्त्रक्रियेपूर्वी बाळाला स्थिर करणे आवश्यक होते. बाळात पाण्याचे प्रमाण काही होते आणि बाळ कुपोषित होते. त्यामुळे बाळाची प्रकृती सुधारेपर्यंत शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. दोन दिवसांच्या तयारीनंतर बालरोग शस्त्रक्रिया आणि ॲनेस्थेशियामधील (भूलतज्ज्ञ) तज्ज्ञांसह सुमारे १५ विशेषज्ञांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आणि दोन गर्भांना बाहेर काढले.
गुरुग्राम येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांनी सांगितले की, या शस्त्रक्रियेसाठी अत्यंत अचूकता आवश्यक होती. नवजात बाळं खूप नाजूक असतात आणि त्यांच्या शस्त्रक्रियेनंतरची काळजी (post-operative care) खूप बारकाईने घ्यावी लागते.
ही शस्त्रक्रिया अधिक आव्हानात्मक होती. कारण- गर्भ यकृत, मूत्रपिंड आणि आतड्यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांशी जोडलेले होते. कोणत्याही अवयवाचे किंवा रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शल्यचिकित्सकांना अत्यंत काळजीपूर्वक त्यांना बाहेर काढावे लागले.
बीबीसीशी बोलताना डॉ. आनंद सिन्हा म्हणाले, “संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान, बाळाच्या शरीराचे तापमान तपासले जात होते. तसेच, जास्त रक्तस्राव होणार नाही याचीदेखील आम्हाला खात्री करावी लागली.” डॉ. आनंद सिन्हा यांनी या शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. त्यांनी स्पष्ट केले की, जर हे विकृत गर्भ लवकर काढले नाहीत, तर ते मुलाच्या वाढीबरोबर वाढू शकतात. त्यामुळे पुढील आयुष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. बीबीसीच्या मते, बाळाला सुमारे एक महिन्यापूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता आणि ते आता पूर्णपणे बरे होत आहे, असे डॉ. सिन्हा यांनी सांगितले.
भारतात यापूर्वीही आढळली अशी प्रकरणे
भारतात डॉक्टरांना अशी दुर्मीळ स्थिती पहिल्यांदाच आढळलेली नाही. अलीकडच्या वर्षांत यांसारख्याच काही घटनांची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात डॉक्टरांनी एका तीन दिवसांच्या बाळावर नाजूक शस्त्रक्रिया करून, त्याच्या पोटातून दोन गर्भ यशस्वीरीत्या बाहेर काढले होते. २०१४ मध्ये कोलकाता येथील एका तीन दिवसांच्या बाळावर शस्त्रक्रिया करून, दोन विकृत गर्भ काढण्यात आले; परंतु दुर्दैवाने ते बाळ दुसऱ्याच दिवशी मरण पावले.
निदानाबद्दल बोलताना डॉ. सिन्हा यांनी सांगितले की, गर्भधारणेदरम्यान केलेल्या अल्ट्रासाउंड स्कॅनमध्ये अशा विकृती अनेकदा आढळून येऊ शकतात. “या तपासण्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पालकांना कोणत्याही लक्षणांबद्दल जागरूक केले पाहिजे. कारण- वेळेवर सल्ला घेणे आणि उपचार करणे महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.