Israel Air Strikes on Iran : पहगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तावर एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईची संपूर्ण जगभरात चर्चा होत असताना इस्रायलनेही तशाच प्रकारचा हल्ला इराणवर केला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार इस्रायलने आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास इराणच्या तेहरानमधील अनेक लष्करी तळांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात इराणच्या ‘इस्लामिक रिवोल्युशनरी गार्ड कोअर’चे प्रमुख हुसेन सलामी यांच्यासह दोन अणुशास्त्रज्ञ आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. इराणवर सर्जिकल स्ट्राईक केल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी स्वत: दिली. त्यांनी या हल्ल्यासंबंधीचं निवेदनही प्रसिद्ध केलं आहे. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेले इराणचे लष्करप्रमुख कोण होते? हे जाणून घेऊ…

इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये संघर्ष पेटल्याचं दिसून येत आहे. आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास इस्रायलने इराणमधील आण्विक तळांना प्रामुख्याने लक्ष्य केल्याचं सांगितलं जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ सुरू केल्याची घोषणा केली आहे. इस्रायलला असणारा धोका पूर्णपणे निपटून काढल्याशिवाय हे ऑपरेशन थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी देशाला उद्देशून केलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे.

इस्रायलचे संरक्षणमंत्री काय म्हणाले?

इस्रायलने इराणवर प्रतिबंधात्मक (pre-emptive) हल्ला केला असून देशात आपात्कालीन परिस्थितीची घोषणा करण्यात आली, अशी माहिती इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, इराणवर केलेल्या प्रतिबंधात्मक हल्ल्यानंतर इस्रायली नागरिकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याची शक्यता तत्काळ निर्माण झाली आहे, त्यामुळे देशातील गृहरक्षक दलाच्या कार्यक्षेत्रात विशेष आणीबाणीची स्थिती लागू करण्यात आलेली आहे.

आणखी वाचा : भारताच्या ‘ब्रह्मोस’ला रोखण्यासाठी पाकिस्तानचे डावपेच; नेमकी काय आहे जर्मनीची IRIS-T SLM प्रणाली?

इराणच्या लष्करी नेतृत्वावर मोठा आघात

इराणची राजधानी तेहरानच्या ईशान्य भागात स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती इराणची सरकारी न्यूज एजन्सी नूर न्यूजने दिली आहे. इस्रायलच्या हल्ल्यांत इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आणि सशस्त्र दलांचे प्रमुख मोहम्मद बघेरी यांचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, इराणच्या ‘इस्लामिक रिवोल्युशनरी गार्ड कोअरचे (IRGC) प्रमुख हुसेन सलामी हेदेखील या हल्ल्यांत ठार झाले, अशी माहिती इराणच्या निमसरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात प्रमुख अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे इराणच्या लष्करी नेतृत्वावर मोठा आघात झाला आहे.

Israel Air Strikes on Iran (PTI Photo)
हल्ल्यात इराणच्या ‘इस्लामिक रिवोल्युशनरी गार्ड कोर्प्स’चे प्रमुख हुसेन सलामी यांच्यासह दोन अणुशास्त्रज्ञ आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. (पीटीआय फोटो)

कोण होते हुसेन सलामी?

  • हुसेन सलामी यांचा जन्म १९५९ मध्ये इस्फाहान, इराण येथे झाला होता.
  • १९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीनंतर ते इस्लामिक रिवोल्युशनरी गार्ड कोअर (IRGC)मध्ये दाखल झाले.
  • इराण-इराक युद्ध (१९८०-८८) दरम्यान त्यांनी विविध लष्करी पदांवर काम केले. युद्धातील अनुभवामुळे त्यांची वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
  • हुसेन सलामी यांनी आयआरजीसीच्या एअरोस्पेस विभागात महत्त्वाची भूमिका बजावली, जिथे त्यांनी क्षेपणास्त्र आणि ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्याचे नेतृत्व केले.
  • २०१९ मध्ये हुसेन सलामी यांची इस्लामिक रिवोल्युशनरी गार्ड कोअरचे प्रमुख (कमांडर-इन-चीफ) नियुक्ती करण्यात आली, त्यांनी मोहम्मद अली जाफरी यांची जागा घेतली होती.
  • हुसेन सलामी हे इराणच्या अणु, क्षेपणास्त्र आणि अपारंपरिक युद्धनीतीचे प्रमुख शिल्पकार मानले जात होते. त्यांनी हमास, इराकमधील शिया गट यांसारख्या छुप्या युद्धतंत्राला चालना दिली.
  • हुसेन सलामी हे अमेरिका, इस्रायल आणि सौदी अरेबियाविरोधात अत्यंत कठोर भूमिकेसाठी प्रसिद्ध होते.
  • त्यांनी अनेकदा इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचे समर्थन केले, यामध्ये २०१९ मधील सौदी ऑईल फॅसिलिटीवरील हल्ला आणि जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याचे वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरले.
  • हुसेन सलामी यांच्या मृत्यूने इराणच्या लष्करी दलात नेतृत्वाचा अभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी येणाऱ्या दुसऱ्या लष्करप्रमुखांना अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाच्या विमान अपघाताची संभाव्य कारणं कोणती? तज्ज्ञ काय सांगतात?

इराणने नवीन लष्करप्रमुखाची केली नियुक्ती

हुसेन सलामी यांचा हल्ल्यात इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर इराणने त्यांच्याजागी नवीन लष्करप्रमुखांची नियुक्ती केली आहे. रिव्हॉल्युशनरी गार्डचे प्रमुख म्हणून कुद्रस फोर्सचे माजी प्रमुख जनरल वाहिदी यांना नियुक्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कमांडर-इन चीफ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कराची सूत्रे हाती येताच वाहिदींनी इस्रायलला इशारा दिला असून त्यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचे आदेश इराणी सैन्याला दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इराणी रिव्हॉल्युशनरी गार्ड्स म्हणजे काय?

इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअर (IRGC) हे इराणच्या लष्करातील एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली दल आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर आयआरजीसीची स्थापन करण्यात आली होती. इराण क्रांतीचे नेते अयातुल्ला खोमेनी यांनी या दलाची स्थापना नव्याने स्थापन झालेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण आणि त्याच्या इस्लामिक तत्वज्ञानाचे रक्षण करण्यासाठी केली होती. आयआरजीसीचे मुख्य कार्य म्हणजे, इराणच्या इस्लामिक सरकारचे संरक्षण करणे आणि त्याच्या धार्मिक-राजकीय तत्त्वांचा प्रसार व अंमलबजावणी सुनिश्चित करणे आहे. सीरिया, इराक, लेबनॉन, येमेन यांसारख्या देशांमध्ये इराणच्या सहकार्याने छुप्या युद्धात कसा सहभाग घ्यावा, याचे नियोजन व अंमलबजावणी या दलाकडून केली जाते.