Tehran Run Out of Drinking Water in Two weeks : वाढती महागाई आणि चलनाच्या घसरणीमुळे इराणची अर्थव्यवस्था आधीच कमकुवत झाली आहे. त्यातच आणखी एका मोठ्या संकटाने या देशाचे दार ठोठावले आहे. इराणमध्ये भीषण दुष्काळ पडल्याने अनेक शहरांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. देशातील सर्व नद्या आटल्या असून, धरणेही कोरडीठाक पडली आहेत. यादरम्यान राजधानी तेहरानमधील पिण्याच्या पाण्याचा साठा दोन आठवड्यांतच संपणार असल्याचा इशारा तेथील माध्यमांनी रविवारी दिला आहे. इराणमध्ये इतका भीषण दुष्काळ नेमका कशामुळे पडला? त्याचाच हा आढावा…
इराणमधील ९० टक्के धरणे कोरडीठाक
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपासून देशात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. इराणमधील जवळपास ९० टक्के धरणे कोरडीठाक पडली असून, प्रमुख शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राजधानी तेहरानसह इस्फहान, रझावी खोरासन व याझद या प्रांतांमधील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तेहरानला पाणीपुरवठा करणाऱ्या अमीर कबीर धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख बेहजाद पारसा यांनी आयआरएनए या वृत्तसंस्थेला सांगितले की, या धरणात आता केवळ १४ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे, जो त्याच्या एकूण क्षमतेच्या आठ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.
तेहरानमध्ये दोन आठवड्यांपुरतंच पाणी
“केवळ आठ टक्के पाणीसाठा म्हणजे नागरिकांसाठी मोठी चिंतेची बाब आहे. पाण्याची बचत न केल्यास तेहरानकरांना लवकरच गंभीर संकटाचा सामना करावा लागू शकतो. अमीर कबीर धरण तेहरान शहराला केवळ दोन आठवडेच पिण्याचे पाणी पुरवू शकते”, अशी चिंताही पारसा यांनी व्यक्त केली. १० दशलक्षांहून अधिक लोकसंख्या असलेले तेहरान शहर अल्बोर्झ पर्वतरांगेच्या दक्षिण उतारांवर वसलेले आहे. या पर्वतरांगा ५,६०० मीटर (सुमारे १८,००० फूट) उंचीपर्यंत पसरलेल्या असून, त्यामधून वाहणाऱ्या नद्या तेहरानला पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक जलाशयांना पाणी पुरवतात. मात्र, इराण सध्या सर्वांत मोठ्या दुष्काळाचा सामना करीत आहे.
आणखी वाचा : युद्धविराम होताच पाकिस्तानची मुस्कटदाबी; अफगाणिस्तानच्या ‘त्या’ निर्णयाला भारताचा पाठिंबा, प्रकरण काय?
इराणमध्ये इतका प्रचंड दुष्काळ कशामुळे पडला?
गेल्या महिन्यात एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, तेहरान प्रांतातील पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असून, गेल्या १०० वर्षांत अशी परिस्थिती कधीच निर्माण झालेली नव्हती. एका बाजूला बर्फाच्छादित पर्वत आणि दुसऱ्या बाजूला विक्रमी दुष्काळ… या नैसर्गिक विसंगतीमुळे तेहरानमध्ये मोठे जलसंकट निर्माण झाले आहे. पारसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वर्षापूर्वी अमीर कबीर धरणात ८६ दशलक्ष घनमीटर पाणी होते; पण या वर्षी तेहरानमध्ये पडणाऱ्या पावसात १०० टक्के घट झाली आहे. पारसा यांनी इतर जलाशयांमधील पाणीसाठ्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
इराणच्या राष्ट्रपतींनी काय इशारा दिला होता?
इराणी माध्यमांच्या माहितीनुसार, तेहरान शहराला दररोज सुमारे तीन दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांत पाण्याची बचत करण्यासाठी अनेक भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे; तर या उन्हाळ्यात वारंवार पाणीपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या आहेत. तेहरानमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाणी व ऊर्जा बचतीसाठी दोन सार्वजनिक सुट्यादेखील जाहीर करण्यात आल्या होत्या. देशातील पाण्याचे संकट हे आज चर्चेत असलेल्या स्थितीपेक्षाही खूप गंभीर आहे, असा इशारा इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियन यांनी त्यावेळी दिला होता.
पाण्याच्या वापराबाबत काढले फर्मान
दरम्यान, देशातील दुष्काळी परिस्थिती पाहता, इराण सरकारने काही दिवसांपूर्वी पाण्याच्या वापराबाबत एक फर्मान जारी केले होते. त्यानुसार, इराणमधील लोकांना दररोज फक्त १३० लिटर पाणी दिले जात आहे. त्यापेक्षा जास्त पाणी वापरल्यास दंड आकारला जाणार असल्याचा इशाराही सरकारने दिला आहे. दुष्काळात निर्माण झालेल्या पाणी संकटाचा सामना करताना नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहनदेखील करण्यात येत आहे.
इराण जलसंकटावर कशी मात करणार?
शेती हा इराणमधील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे धरणातील बहुतांश पाणी शेतीपिकांसाठी वापरले जाते. गेल्या पाच वर्षांत वेळेवर पाऊस न पडल्याने इराणमधील शेतकरीही संकटात सापडले आहे. देशातील महागाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ब्लॅक मार्केटमध्ये (इराणच्या महागाईचा निर्देशांक) इराणचे चलन रियाल चलन चार टक्यांनी घसरले आहे, त्यामुळे अमेरिकेच्या १ डॉलरसाठी इराणला तब्बल ११,२६,००० रियाल खर्च करावा लागणार आहे. दरम्यान, राजधानी तेहरानला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये केवळ दोन आठवडे पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पाणीसंकटावर मात करण्यासाठी सरकार कोणकोणत्या उपाययोजना आखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
