Space travel and pregnancy पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणे म्हणजेच अंतराळ प्रवास करणे प्रत्येकालाच मनोरंजक गोष्ट वाटते. परंतु, अंतराळात जाण्यासाठी, तिथल्या वातावरणात जुळवून घेण्यासाठी एका खास प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यामुळे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. आता माणूस अंतराळात मानवी वसाहतींच्या योजना आखण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाउल उचलत आहे. त्यासाठी वेगवेगळे संशोधन आणि प्रयोग केले जात आहेत.

त्यामुळे या मोहिमांचे नियोजन वेगाने होत असताना, मानवी शरीराशी संबंधित गोष्टींबाबत लोकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे अंतराळात बाळ जन्माला येणे शक्य आहे का? अंतराळात गर्भधारणा सुरक्षितपणे होऊ शकते का? आणि बाळाचा जन्म झाल्यास काय परिणाम होईल? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. याबाबतच लीड्स विद्यापीठातील संगणकीय जीवशास्त्राचे मानद प्राध्यापक अरुण विवियन होल्डन यांनी एक लेख लिहिला आहे. त्याविषयी ते काय सांगतात? जाणून घेऊयात.

गर्भधारणा आणि आव्हाने

गरोदरपणाचा काळ हा स्त्रियांसाठी अतिशय नाजूक असतो. आपल्यापैकी बहुतेकांना जन्मापूर्वी आपण कोणत्या धोक्यांमधून वाचलो आहोत, याची माहिती नसते. उदाहरणार्थ, सुमारे दोन-तृतीयांश भ्रूण जन्मापर्यंत जिवंत राहत नाहीत. त्यातले बहुतेक भ्रूण गर्भधारणेच्या पहिल्या काही आठवड्यांपर्यंतदेखील जगू शकत नाहीत. अनेकदा तर गर्भवती महिलेला याबाबत माहितीही नसते. जेव्हा भ्रूणाचा योग्य विकास होत नाही किंवा तो गर्भाशयाला यशस्वीरीत्या जोडला जात नाही, तेव्हा या स्वरूपाचे गर्भपात होतात. गर्भधारणा ही जैविक टप्प्यांची एक साखळी मानली जाऊ शकते. प्रत्येक टप्पा योग्य क्रमाने पार पडणे आवश्यक असते आणि प्रत्येक टप्पा यशस्वी होण्याची एक ठरावीक शक्यता असते. पृथ्वीवर क्लिनिकल संशोधन आणि जैविक मॉडेल्सचा वापर करून या शक्यतांचा अंदाज लावला जातो. अरुण विवियन होल्डन सांगतात, माझे नवीनतम संशोधन बाळावर आंतरग्रहीय अवकाशातील (interplanetary space) अत्यंत धोकादायक परिस्थितींचा कसा परिणाम होऊ शकतो, हे सांगते.

अंतराळात जाण्यासाठी, तिथल्या वातावरणात जुळवून घेण्यासाठी एका खास प्रशिक्षणाची आवश्यकता असते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण आणि गर्भधारणा

अंतराळ प्रवासादरम्यान अनुभवल्या जाणाऱ्या वजनहीनतेच्या स्थितीला सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (microgravity) म्हणतात. त्यामुळे गर्भधारणा शारीरिकदृष्ट्या अवघड होईल; पण एकदा गर्भ तयार झाल्यानंतर हा गर्भ टिकून राहण्यात याचा फारसा अडथळा येणार नाही. परंतु, शून्य गुरुत्वाकर्षण असताना बाळाला जन्म देणे आणि त्याची काळजी घेणे खूप कठीण होईल. कारण- अंतराळात कोणतीही वस्तू स्थिर राहत नाही. द्रव पदार्थ तरंगतात आणि माणसेही तरंगतात. त्यामुळे बाळाला जन्म देणे आणि त्याची काळजी घेणे ही पृथ्वीवरील प्रक्रियेपेक्षा खूपच गुंतागुंतीची आणि गोंधळाची प्रक्रिया असेल. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळे बाळाची उत्तम काळजी घेणे ते त्याला दूध पाजणे, या सर्व गोष्टींमध्ये मदत होते.

गर्भात वाढणारे बाळ आधीपासूनच सूक्ष्म गुरुत्वाकर्षणासारख्या परिस्थितीत वाढत असते. हे बाळ गर्भाशयाच्या आत असलेल्या अम्निओटिक फ्लुइड नावाच्या द्रवामध्ये तरंगते. हा द्रव बाळाला सुरक्षित आणि तरंगत्या अवस्थेत ठेवतो. मुख्य बाब म्हणजे अंतराळवीरदेखील वजनहीन स्थितीचा अनुभव घेण्यासाठी पाण्याने भरलेल्या टाक्यांमध्ये प्रशिक्षण घेतात. त्या अर्थाने गर्भाशय आधीपासूनच सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण सिम्युलेटरसारखे (simulator) काम करते; पण इतरही अनेक धोके आहेत.

रेडिएशनसारखे अनेक धोके

पृथ्वीच्या संरक्षणात्मक थरांच्या बाहेर असणारा आणखी एक मोठा धोका म्हणजे कॉस्मिक किरण (cosmic rays). हे उच्च ऊर्जा असलेले कण असतात. हे कण प्रकाशाच्या वेगाजवळून अंतराळात प्रवास करतात. हे अणू आपले सर्व इलेक्ट्रॉन गमावतात आणि त्यांच्यात केवळ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन शिल्लक राहतात. जेव्हा हे कण मानवी शरीराच्या संपर्कात येतात, तेव्हा ते पेशींना गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. पृथ्वीवर आपण ग्रहाच्या वातावरणाने आणि दिवसाच्या वेळेनुसार, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे कॉस्मिक रेडिएशनपासून सुरक्षित असतो. अंतराळात हे संरक्षण नाहीसे होते.

जेव्हा एखादा कॉस्मिक किरण मानवी शरीरातून जातो, तेव्हा तो एखाद्या अणूला आदळू शकतो आणि त्याचे इलेक्ट्रॉन काढून टाकू शकतो आणि त्याच्या केंद्रकाशी आदळून प्रोटॉन व न्यूट्रॉन बाहेर फेकू शकतो. यामुळे अत्यंत गंभीर नुकसान होऊ शकते. काही पेशी किंवा पेशींचे भाग नष्ट होऊ शकतात. अत्यंत गंभीर बाब म्हणजे जर हे कण डीएनएवर आदळले, तर त्यामुळे म्युटेशन्स (mutations) होऊ शकते आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

पेशी वाचल्या तरी रेडिएशनमुळे रोगप्रतिकार प्रणालीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशी रसायने बाहेर पडतात, जी निरोगी ऊतींना (tissues) नुकसान पोहोचवू शकतात आणि अवयवांचे कार्य बिघडवू शकतात. गर्भधारणेच्या पहिल्या काही आठवड्यांत भ्रूणपेशी वेगाने विभागल्या जातात आणि ऊती व रचना तयार करतात. विकासासाठी या नाजूक प्रक्रियेदरम्यान भ्रूण जिवंत राहणे आवश्यक असते. गर्भधारणेनंतरचा पहिला महिना सर्वांत धोकादायक असतो. या टप्प्यावर कॉस्मिक किरणे भ्रूणासाठी प्राणघातक ठरू शकतात. परंतु, भ्रूण खूप लहान असतो आणि कॉस्मिक किरण धोकादायक असले तरी ते तुलनेने दुर्मीळ असतात. त्यामुळे थेट फटका बसण्याची शक्यता कमी आहे; मात्र तरीही गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते.

गर्भधारणा आणि धोक्यांचे बदलते स्वरूप

गर्भधारणा जसजशी पुढे जाते, तसतसे धोक्याचे स्वरूप बदलत जाते. पहिल्या तिमाहीच्या अखेरीस प्लेसेंटल सर्क्युलेशन म्हणजे आई आणि गर्भाला जोडणारी रक्तप्रणाली पूर्णपणे तयार होते. त्यावेळी गर्भाची आणि गर्भाशयाची वेगाने वाढ होते. या काळात कॉस्मिक किरण गर्भाशयाच्या स्नायूला आदळण्याची शक्यता जास्त आहे, ज्यामुळे आकुंचन (Contractions) सुरू होऊ शकते आणि वेळेआधी प्रसूती (premature labour) होऊ शकते. नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात आज अनेक सुधारणा झाली आहे; मात्र असे असले तरीही बाळ जितके लवकर जन्माला येते, तितकी गुंतागुंत वाढण्याचा धोका जास्त असतो. अंतराळात हे धोके खूप वाढतात.

अंतराळात बाळाचा जन्म झाल्यास, ते बाळ सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये वाढत राहील आणि त्यामुळे त्याच्या पोश्चरल रिफ्लेक्सेस व समन्वय यांवर परिणाम होऊ शकतो आणि बाळाला डोके वर उचलणे, बसणे, रांगणे व शेवटी चालणे अवघड ठरू शकते. या सर्व हालचाली गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतात. मुख्य म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतरही रेडिएशनचा धोका संपत नाही. जन्मानंतरही बाळाच्या मेंदूची वाढ सुरूच राहते आणि कॉस्मिक किरणांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे त्याचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्मृती, वर्तन व आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो.

मग, अंतराळात बाळ जन्माला येऊ शकते का?

सैद्धांतिकदृष्ट्या हे शक्य आहे. परंतु, जोपर्यंत आपण भ्रूणांचे रेडिएशनपासून संरक्षण करू शकत नाही, वेळेआधी प्रसूती थांबवू शकत नाही आणि बाळे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये सुरक्षितपणे वाढू शकतील याची खात्री देऊ शकत नाही, तोपर्यंत अंतराळात गर्भधारणा हा एक अतिशय धोकादायक प्रयोग आहे. त्यासाठी आपण अजून तयार नाही, असे अरुण विवियन होल्डन सांगतात.