सुनील कांबळी

‘कोविन’वरील वैयक्तिक माहिती फुटल्याचे वृत्त फेटाळताना केंद्र सरकारने संपूर्ण विदा सुरक्षित असल्याचा दावा केला. मात्र, सरकारच्या स्पष्टीकरणानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

‘कोविन’वरील माहिती फुटल्याचा दावा काय आहे?

करोना लसीकरणावेळी नागरिकांनी आधार कार्ड, पारपत्र आदींद्वारे कोविन पोर्टल, ॲपवर नोंदणी केली होती. देशातील सुमारे १०० कोटींहून अधिक नागरिकांची ही वैयक्तिक माहिती टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावरून फुटल्याचा दावा काही माध्यमांनी केला. ‘कोविन’ पोर्टलवर नोंदवलेला मोबाईल क्रमांक टाकताच लसीकरणासाठी कोणते ओळखपत्र वापरले, संबंधित व्यक्ती पुरुष/महिला, लसीकरण केंद्र, जन्मवर्ष आदी तपशील टेलिग्रामवर उपलब्ध होतो. याद्वारे कोट्यवधी भारतीयांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पारपत्र आदी वैयक्तिक तपशील फुटल्याचा दावा या वृत्तांमध्ये करण्यात आला.

केंद्र सरकारचे म्हणणे काय?

‘कोविन’वरील माहिती फुटल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वप्रथम प्रसिद्धीपत्रक प्रसृत करून खुलासा केला. त्यात नमूद केल्याप्रमाणे, ‘कोविन’वरील माहिती तीन प्रकारे मिळवता येते. एक म्हणजे, वापरकर्ता स्वतःच्या मोबाइलवर पाठवण्यात येणाऱ्या ओटीपीद्वारे आपला तपशील मिळवू शकतो. दुसरे, प्राधिकृत लसीकरण कर्मचारी हा तपशील पाहू शकतो आणि तिसरे म्हणजे, ‘कोविन’शी संबंधित अधिकृत ॲपच्या माध्यमातून वापरकर्त्याच्या ओटीपी प्रमाणीकरणानंतर ही माहिती मिळवता येते. प्रत्येक वेळेला अधिकृत वापरकर्त्यानेच माहिती मिळवली आहे का, याची पडताळणी करण्यात येते. त्यामुळे ओटीपीशिवाय टेलिग्रामला हा तपशील मिळू शकत नाही, असा दावा आरोग्य मंत्रालयाने केला. टेलिग्रामवर नागरिकांची जन्मतारीख दाखवत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. मात्र, ‘कोविन’वर फक्त जन्मवर्षच नोंदवण्यात आले असून, नागरिकांचा पत्ता समाविष्ट करण्याची त्यात सोयच नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. त्यानंतर माहिती- तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्वीट केले. ‘कोविन’ ॲप किंवा त्यावरील माहितीसाठ्याच्या सुरक्षेचा थेट भंग करण्यात आल्याचे दिसत नाही. नागरिकांचा हा तपशील ‘कोविन’वरील नसून, तो याआधी फुटलेल्या माहितीतून मिळवला असावा, असे चंद्रशेखर म्हणाले.

याआधी विदा सुरक्षाभंग?

याआधी किंवा अलीकडे ‘कोविन’वरून विदाचोरी झाली होती का, याबाबत केंद्र सरकारने निःसंदिग्ध स्पष्टीकरण दिलेले नाही. ओटीपीद्वारे वापरकर्त्याला किंवा प्राधिकृत लसीकरण कर्मचाऱ्यामार्फतच ‘कोविन’ यंत्रणेकडील विदा मिळू शकत असल्याचा सरकारचा युक्तिवाद आहे. ‘कोविन’ विदासाठ्याच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, टेलिग्राम मोबाइल क्रमांकाशी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक माहिती कशी उपलब्ध करून देते, याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिलेले नाही. शिवाय, लसीकरण केंद्र, लसीकरणासाठी वापरलेले ओळखपत्र आदी ‘कोविन’वरीलच माहिती टेलिग्रामवर अशी उपलब्ध आहे, याचे उत्तरही सरकारच्या स्पष्टीकरणातून मिळत नाही. विदा सुरक्षाभंग झालेला नसल्याचे ‘कम्युटर इमर्जन्सी रिस्पाॅन्स टीम’ने अद्याप स्पष्ट केलेले नाही. तत्पूर्वीच विदा सुरक्षाभंग झालेला नसल्याचा दावा करणे घाईचे ठरेल. टेलिग्रामने उघड केलेली माहिती आधीच्या विदा सुरक्षाभंगावेळची असू शकेल, हा सरकारचा अंदाजही नवे प्रश्न उपस्थित करणारा आहे. त्यातील महत्त्वाचा म्हणजे मोबाइलशी संलग्न आधारकार्डचा तपशील. आधारचा तपशील फुटल्याचे सरकारने आतापर्यंत कधीच मान्य केलेले नाही. विशेष म्हणजे, अब्जावधी प्रयत्न करूनही आधारचा तपशील फोडता येणार नाही, असा दावा २०१८ मध्ये तत्कालीन माहिती -तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत केला होता. मग, टेलिग्रामने मोबाइल संलग्न आधार कार्ड क्रमांक कसे उपलब्ध करून दिले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विदा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर?

‘कोविन’वरील विदा सुरक्षेचा भंग झाला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी ‘कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’च्या अहवालाची प्रतीक्षा आहे. मात्र, राष्ट्रीय विदा नियमन धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे, असे राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. सर्व सरकारी विदा साठवण, माहिती मिळवणे, तिची सुरक्षा आदींबाबत ठोस धोरण त्यातून निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकारामुळे विदा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विदा सुरक्षा विधेयक अजूनही संसदेत मांडण्यात आलेले नाही. हे विधेयक संसदेच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार होते. मात्र, या विधेयकाच्या मसुद्यावर अद्यापही विचार-विनिमय सुरू आहे. संबंधितांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरही विधेयक प्रलंबित असल्याने केंद्र सरकारला नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेबाबत अनास्था असल्याचा आरोप होऊ लागला आहे. आता हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येण्याची शक्यता आहे.