Rath Yatra Jagannath Puri Iskcon भगवान जगन्नाथाची स्नान यात्रा व रथयात्रा इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (इस्कॉन) तर्फे मनमानी पद्धतीने आयोजित केली जाते, हे धर्मशास्त्र आणि परंपरेचे धडधडीत उल्लंघनच आहे, असा आरोप पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने (एसजेटीए) केला असून त्यामुळे लाखो भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

धर्मशास्त्रांचा हवाला

श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने इस्कॉनला संबंधित धर्मशास्त्रांचा हवाला देणारे १०० पानी पत्रही पाठवले आहे आणि शेवटचा उपाय म्हणून कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे. पुरी येथील १२व्या शतकातील हे मंदिर भगवान जगन्नाथाचे (भगवान श्रीकृष्णाचेच एक रूप) मूळ पीठ मानले जाते, इथे त्यांचे मोठे बंधू भगवान बलभद्र आणि बहीण देवी सुभद्रा यांच्यासोबत जगन्नाथाची पूजा केली जाते. पुरी येथील देवतांच्या वार्षिक रथयात्रेला लाखो भाविक गर्दी करतात. असे असतानाही, इस्कॉनतर्फे मात्र उत्सवी मिरवणुकांचे आयोजन स्वतंत्रपणे केले जाते.

वेळेवरून वाद

जगन्नाथ मंदिरातील नित्यनियमित बाबींची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाच्या (SJTA) मते, भगवान जगन्नाथांशी संबंधित प्रथा- परंपरांचे पालन करण्याची विनंती अनेकदा करूनही इस्कॉनतर्फे भगवान जगन्नाथाच्या पवित्र यात्रा जगभरात कोणत्याही तारखेला मनमानीपणे आयोजित केल्या जातात. २०२५ मध्ये, सप्टेंबरपर्यंत भारतातील आणि परदेशातील किमान ४० इस्कॉन मंदिरांमध्ये स्नान यात्रा आयोजित करण्यात आली होती, तर यावर्षी किमान ६८ मंदिरांमध्ये रथयात्रा काढण्यात आली.

ज्येष्ठ पौर्णिमेलाच स्नान यात्रा

पुरीच्या राजघराण्याचे सदस्य आणि श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, दिव्यसिंह देब यांनी सांगितले की, अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये म्हटले आहे की, भगवान जगन्नाथाची ही स्वतःची दैवी आज्ञा आहे की, त्यांची आणि त्यांच्या भावंडांची स्नान यात्रा केवळ देवाचा जन्मदिवस असलेल्या ‘ज्येष्ठ पौर्णिमे’लाच केली जावी, तिच तिथी योग्य आहे.

इस्कॉनकडून धर्मशास्त्रांचे उल्लंघन

त्याचप्रमाणे, १२व्या शतकातील या मंदिरातून त्यांच्या जन्मस्थानाकडे (गुंडिचा मंदिर) जाणारी वार्षिक रथयात्रा, हीदेखील प्रतिवर्षी ओडिया महिन्यातील ‘आषाढ शुक्ल द्वितीया’ या तिथीला नऊ दिवसांसाठी आयोजित केली जावी, असेच देवतेला वाटते, असा उल्लेखही धर्मग्रंथांमध्ये आहे. “कोणत्याही अनिश्चित किंवा मनमानी तारखेला पवित्र यात्रेचे आयोजित करणे हे म्हणूनच पवित्र परंपरा आणि धर्मशास्त्रांचे उल्लंघन आहे. देवतांना त्यांच्या गर्भगृहातून केवळ स्नान यात्रा आणि रथयात्रेसाठीच दैवी आज्ञेनुसारच बाहेर काढले जाते,” असे देब सांगतात. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने याकडेही लक्ष वेधले की, होळी, दिवाळी, जन्माष्टमी इत्यादी धार्मिक सण केवळ त्यांच्या ठरलेल्या तिथीलाच साजरे केले जातात.

इस्कॉनबरोबरचा आतापर्यंतचा संवाद

श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने यापूर्वीही इस्कॉनला आपले आक्षेप वेळोवेळी कळवले आहेत. मुंबईतील इस्कॉन गव्हर्निंग कौन्सिलने (ब्यूरो) २१ जुलै २०२१ रोजी भारतातील सर्व रथयात्रा या धर्मशास्त्र आणि परंपरेनुसारच आयोजित करण्याचा ठराव मंजूर केला होता. तर भारताबाहेरील कार्यक्रमांबाबत पश्चिम बंगालमधील मायापूर येथील इस्कॉनचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय (गव्हर्निंग बॉडी कमिशन) निर्णय घेईल, असेही त्यांनी म्हटले होते.

Jagannath Puri
जगन्नाथ पुरीची रथयात्रा

इस्कॉनकडून त्यांच्या वेळापत्रकाचे समर्थन

२ डिसेंबर २०२४ रोजी पुरी येथे पार पडलेल्या बैठकीत देब आणि श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने इस्कॉनच्या गव्हर्निंग बॉडी कमिशनला परंपरांचे पालन करण्यास सांगितले. यानंतर २० मार्च रोजी पुन्हा एक बैठक पार पडली, त्यामध्ये इस्कॉनने या विषयावर त्यांचे मत लेखी सादर केले. देब यांनी सांगितले की, त्यांनी वेगवेगळ्या देशांमधील हवामान आणि स्थानिक परिस्थिती यांसारख्या कारणांचा हवाला देऊन आपल्या वेळापत्रकाचे समर्थन केले.

इस्कॉनने सादर केलेल्या युक्तिवादांचे विश्लेषण केल्यानंतर, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने त्यांच्या विद्वानांमार्फत १०० पानी दस्तावेज तयार केला असून तो इस्कॉनला पाठवण्यात आला आहे.

पुढे काय?

या प्रस्तावावर विचार करून इस्कॉनकडून सामंजस्याने प्रश्न सोडवला जाईल, अशी अपेक्षा देब यांनी व्यक्त केली.
“कायदेशीर मार्ग हा शेवटचा उपाय असेल,” असेही ते म्हणाले.

‘द इंडियन एक्सप्रेस’ने श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाच्या या प्रस्तावावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी इस्कॉनशी संपर्क साधला आहे.