कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या १० मे रोजी येथे मतदान होणार आहे. दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने कंबर कसली आहे. येथील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाकडून पूर्ण प्रयत्न केला जात आहे. तर विद्यमान बसवराज बोम्मई सरकारवर मागील अनेक दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. याच आरोपांचा फायदा घेत भाजपाची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केला जात आहे. विधानसभा निवडणुकीमुळे येथील राजकीय वातावरण तापलेले असताना ‘नंदिनी दूध’ की ‘अमूल दूध’ असा वाद कर्नाटकमध्ये रंगला आहे. या वादामुळे येथील राजकीय रणसंग्रामाला चांगलीच फोडणी बसली आहे. याच पार्श्वभूमीवर हा वाद नेमका काय आहे? या वादावर भाजपा, काँग्रेसची भूमिका काय आहे? या वादाचा विधानसभा निवडणुकीवर तसेच भाजपावर काय परिणाम होणार? हे जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> विश्लेषण: दलाई लामांनी हे असे का केले? काय आहे बौद्ध वज्रयान पंथाची परंपरा?

‘नंदिनी’ संस्था आणि अमूलला विकण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणारी ‘अमूल’ मूळची गुजरातमधील सहकारी संस्था आहे. अमूल दूधने नुकतेच कर्नाटकमध्येही दही आणि दूध विकण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीदेखील अमूल दूध कर्नाटकमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून येथे राजकारण रंगले आहे. भाजपा कर्नाटक मिल्क फेडरेशनची (केएमएफ) ‘नंदिनी’ संस्था आणि अमूलला विकण्याचा प्रयत्न करत आहे. कर्नाटकमधील प्रतिष्ठेच्या आणि प्रसिद्ध असलेल्या नंदिनी संस्थेला धोका आहे, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. एकीकडे निवडणुकीमुळे राजकारण तापलेले असताना काँग्रेसच्या या प्रचारामुळे भाजपाची डोकेदुखी वाढलेली आहे. हक्काचा मतदार गमावण्याच्या भीतीमुळे काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर भाजपाकडून स्पष्टीकरण दिले जात आहे.

हेही वाचा >> विश्लेषण: जगासमोर वंध्यत्वाची चिंता? कारणे काय? उपाय काय?

काँग्रेसकडून काय आरोप केला जात आहे?

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अमूलच्या कर्नाटकमधील प्रवेशावरून भाजपावर गंभीर आरोप केला आहे. बसवराज बोम्मई सरकारकडून राज्याचा अभिमान असलेल्या नंदिनी संस्थेला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले आहेत. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हा सर्वांनाच नंदिनी या संस्थेचे संरक्षण करायचे आहे. नंदिनी दुधाची इतर राज्यांतही निर्यात करायला परवानी द्यायला हवी. आपण खूप संरक्षणवादी राहून चालणार नाही. ही आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बाब नाही. मात्र नंदिनी दुधाच्या यशासाठी जे मेहनत घेत आहेत, या संस्थेच्या यशामध्ये जे आपले योगदान देत आहेत, त्यांची चिंता मी समजू शकतो. आपण त्यांच्या गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे,” असे शशी थरूर म्हणाले आहेत.

हेही वाचा >> विश्लेषण: रस्तेदुरुस्तीचे लेखापरीक्षण आयआयटीकडून करण्याची वेळ ठाणे महापालिकेवर का आली?

भाजपाकडून काय स्पष्टीकरण दिले जात आहे?

कर्नाटक दूध संघाच्या प्रतिष्ठेच्या ‘नंदिनी दूध’ला विकण्याचा डाव आखला जात आहे, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. हा दावा मात्र भाजपाने फेटाळला आहे. या प्रकरणावर सहकारमंत्री एसटी सोमशेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कर्नाटक मिल्क फेडरेशन आणि अमूल दूध यांचे विलीनीकरण करण्याचा आामचा कोणताही हेतू नाही. उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन घटते. कर्नाटकमध्ये सध्या १५ दूधसंघ आहेत. विशेष म्हणजे हे सर्व दूधसंघ सध्या नफ्यामध्ये आहेत. ‘अमूल’ ऑनलाईन ५७ रुपये प्रतिलिटर दराने दूध विकते. हेच दूध नंदिनीकडून ३९ रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते. नंदिनीने निर्मिती केलेली अन्य उत्पादने आम्ही अन्य राज्यांतही विकतो. गुजरातमध्ये ‘अमूल दूध’ची ज्या पद्धतीने प्रगती झाली, अगदी तशाच पद्धतीने ‘नंदिनी दूध’चाही विकास व्हावा अशी आमची इच्छा आहे. निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्याला राजकीय रंग दिला जात आहे,” असे सोमशेकर म्हणाले. कर्नाटकचे उच्चशिक्षणमंत्री सीएन अश्वनाथ नारायण यांनीदेखील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून केले जाणारे आरोप फेटाळले आहेत. अमूल दूध आणि कर्नाटक मिल्क फेडरेशनचे विलीनीकरण होणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >> विश्लेषण: बाख़्मुतची लढाई का महत्त्वाची?

अमूल दूध आणि नंदिनीच्या विलीनीकरणाची चर्चा नेमकी कशामुळे?

मूळच्या गुजरातमधील अमूल दूधने कर्नाटकमध्येही आपली उत्पादने विकण्याचे नुकतेच जाहीर केले आहे. त्याआधी मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंड्या येथे एका सभेला संबोधित केले होते. या वेळी अमूलचे कर्नाटकमध्ये पदार्पण होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. “अमूल आणि नंदिनी एकत्रितपणे कर्नाटकमधील प्रत्येक गावात प्राथमिक डेअरींची स्थापना करणार आहेत,” असे अमित शाह म्हणाले होते. त्यानंतर अमूल आणि नंदिनी दूध यांचे एकत्रीकरण होण्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

नंदिनी दूधला एवढे महत्त्व का आहे?

नंदिनी दूधला कर्नाटकमध्ये मोठे राजकीय महत्त्व आहे. याच कारणामुळे आतापर्यंत नंदिनी दूधला कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा सत्ताधाऱ्यांनी अटी-शर्तींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला नाही. कर्नाटक मिल्क फेडरेशनचे जाळे विस्तृत आहे. या फेडरेशनअंतर्गत साधारण २२ हजार गावे, २४ लाख दूध उत्पादक तर १४ हजार सहकारी संस्था काम करतात. या २४ लाख दूध उत्पादकांकडून प्रतिदिवस साधारणत: ८४ लाख लीटर दुधाचे उत्पादन होते. यातील बहुतांश दूध उत्पादक मंड्या, मैसुरू, रामनगर, कोलार तसेच मध्य कर्नाटकमधील दावनगेरे या भागात पसरलेले आहेत. साधारणत: १२० ते १३० विधानसभा मतदारसंघांमध्ये या दूध उत्पादकांचे प्रमाण लक्षणीय आहे. याच कारणामुळे नंदिनी दूध तसेच कर्नाटक मिल्क फेडरेशनला मोठे राजकीय महत्त्व आहे.

हेही वाचा >> गुलामांच्या व्यापारावर उभे राहिले ब्रिटिश राजेशाहीचे वैभव; पूर्वजांचे पाप उघड करण्यासाठी किंग चार्ल्स का तयार झाले?

विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीका-आरोपांना तेवढ्याच क्षमतेने उत्तर

जुन्या मैसुरू भागात वोक्कालिगा समाजाच्या मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. या भागात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचा प्रभाव जास्त आहे. तर मध्य कर्नाटकमध्ये लिंगायत मतदारांचे प्रमाण जास्त आहे. लिंगायत समाजाचा भाजपाला पाठिंबा राहिलेला आहे. याच कारणामुळे मतदारांमध्ये कोणताही गैरसमज पसरू नये म्हणून सत्ताधारी भाजपाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. भाजपाकडून विरोधकांद्वारे केल्या जाणाऱ्या टीका-आरोपांना तेवढ्याच क्षमतेने उत्तर दिले जात आहे.

अनेक सिनेस्टार ब्रँड अँबेसिडर

दरम्यान, कर्नाटक मिल्क फेडरेशन आणि नंदिनी दूध ब्रॅंडला कर्नाटकमध्ये खूप महत्त्व आहे. याआधी ‘केएमएफ’च्या जाहिरातींमध्ये कर्नाटक चित्रपटसृष्टीमधील अनेक मोठे सिनेस्टार झळकलेले आहेत. यामध्ये डॉ. राजकुमार, उपेंद्र, पुनीत राजकुमार असे सिनेस्टार केएमएफचे ब्रॅंड अॅम्बेसिडर राहिलेले आहेत. १९५५ साली कोडागू जिल्ह्यात कर्नाटक मिल्क फेडरेशनची स्थापना झाली होती. पुढे १९८४ पर्यंत या ‘केएमएफ’चे १४ जिल्हा दूध संघ स्थापन झाले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka assembly election 2023 amul dudh nandini doodh clash congress allegations bjp answer know detail prd
First published on: 10-04-2023 at 16:48 IST