पॉप गायिका केटी पेरी आणि इतर पाच महिला ११ मिनिटांचा अंतराळ प्रवास करून सुखरूप पृथ्वीवर परतल्या आहेत. सोमवारी (१४ एप्रिल) जेफ अब्जाधीश जेफ बेझोस यांची खाजगी कंपनी असलेल्या ‘ब्लू ओरिजिन’च्या रॉकेटमधून या सर्व महिला अंतराळात गेल्या होत्या. १९६३ नंतर पहिल्यांदाच केवळ महिलांच्या टीमने अंतराळात प्रवास केला. ही मोहीम सुमारे ११ मिनिटे चालली. सहा महिलांनी न्यू शेपर्ड-३१ नावाच्या मोहिमेमध्ये ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटमधून प्रवास केला. त्यांना या रॉकेटद्वारे पृथ्वीपासून १०० किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर नेले. त्यांनी कार्मन रेषा ओलांडली. कार्मन रेषा ही पृथ्वी आणि अंतराळ यांच्यातील एक काल्पनिक स्वरूपाची सीमा असून पृथ्वीच्या वातावरणापासून दूर आहे. कार्मन रेषा ओलांडून या महिलांनी अंतराळातील विलोभनीय दृश्यांचा आनंद घेतला.

केटी पेरी आणि इतर महिलांनी केलेल्या अंतराळ प्रवासानंतर अंतराळ पर्यटनाची वाढती लोकप्रियता दिसून येत आहे. २०२३ मध्ये या उद्योगाचे मूल्य ८४८.२८ दशलक्ष डॉलर्स होते, मात्र गेल्या वर्षात हे मूल्य १.३ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले आहे, असे ‘रिसर्च अँड मार्केट्स’च्या अहवालात म्हटले आहे. मुख्य म्हणजे २०३० पर्यंत हा उद्योग ६.७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अंतराळ पर्यटन म्हणजे नक्की काय? त्यासाठी एकूण खर्च किती येतो? त्याचा पर्यावरणावर नक्की काय परिणाम होतो? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

केटी पेरी आणि इतर महिलांनी केलेल्या अंतराळ प्रवासानंतर अंतराळ पर्यटनाची वाढती लोकप्रियता दिसून येत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

अंतराळ पर्यटन म्हणजे काय?

अ‍ॅन ग्रॅहम आणि फ्रेडरिक डोब्रुस्केस यांनी अंतराळ प्रवासावर आधारित एका पुस्तकाचे संपादन केले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘एअर ट्रान्सपोर्ट: अ टुरिझम पर्स्पेक्टिव्ह.’ या पुस्तकानुसार अंतराळ पर्यटन हे हवाई वाहतूक क्षेत्रातील असा एक विभाग आहे, जो पर्यटकांना अंतराळवीर होण्याची संधी उपलब्ध करून देतो. अंतराळ पर्यटनाद्वारे मनोरंजनासह, विश्रांती किंवा व्यावसायिक हेतूकरिता अंतराळ प्रवास करता येतो. अंतराळ पर्यटनाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, ते म्हणजे उप-कक्षीय (सब ऑरबिटल) आणि कक्षीय (ऑरबिटल). उप-कक्षीय अंतराळ पर्यटनात प्रवाशांना थेट कार्मन रेषेच्या अगदी पलीकडे नेले जाते.

यामध्ये प्रवाशांना काही मिनिटे अंतराळात घालवण्याची परवानगी असते, त्यानंतर पृथ्वीवर परत येण्यासाठी पुन्हा प्रवास सुरू होतो. दुसरीकडे कक्षीय अंतराळयान पर्यटनात प्रवाश्यांना कार्मन रेषेपेक्षा खूप पुढे नेले जाते. प्रवाश्यांना तब्बल १.३ दशलक्ष फूट उंचीवर एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ घालवण्याची संधी मिळते. अंतराळ पर्यटनात व्हर्जिन गॅलेक्टिक, ब्लू ओरिजिन आणि स्पेसएक्स, या खाजगी कंपन्या उतरल्या आहेत. या सर्व खाजगी कंपन्यांनी २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या मोहिमा पूर्ण केल्या.

अंतराळ पर्यटनासमोरील आव्हाने

अंतराळ पर्यटन अतिश्रीमंतांसाठी : सध्या अंतराळ पर्यटनाचा आनंद केवळ अतिश्रीमंत लोकच घेऊ शकतात, कारण सध्या तरी सामन्यांसाठी ही गोष्ट अत्यंत महागडी आहे. अंतराळात पोहोचण्यासाठी एका प्रवाशाला साधारणपणे किमान दहा लाख डॉलर्स खर्च करावे लागतात. उदाहरण द्यायचे झाल्यास ब्लू ओरिजिनने तिकिटाचे पूर्ण दर जाहीर केलेले नाहीत, मात्र प्रवाश्याला जागा आरक्षित करण्यासाठी १५०,००० डॉलर्स आधी जमा करावे लागतात. ‘space.com’वर दिलेल्या माहितीनुसार, व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळ यानातून अंतराळात जाण्यासाठी जवळजवळ ४५०,००० डॉलर्स खर्च येतो, त्यामुळेच हा प्रवास केवळ महिलांनी केल्याने हा स्त्रियांच्या प्रगतीचा पुरावा असल्याचे बोलले जात आहे.

अभिनेत्री ओलिव्हिया मुन यांनी एका टीव्ही मुलाखतीदरम्यान या पर्यटनावर टीका करत म्हटले, “मला माहीत आहे की हे सांगणे योग्य नाही, परंतु सध्या जगात अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तुम्ही अंतराळात काय करणार आहात?” गायिका केटी पेरीबरोबर या मोहिमेमध्ये जेफ बेझोस यांची होणारी बायको लॉरेन सांचेझ, सीबीएस प्रेझेंटर गेल किंग, माजी नासा रॉकेट वैज्ञानिक आयशा बोवे, नागरी हक्क कार्यकर्त्या अमांडा गुयेन आणि चित्रपट निर्मात्या केरियन फ्लिन यांचादेखील समावेश होता.

नवीन उपक्रम सुरू होण्याची शक्यता : अनेक तज्ज्ञांनी अंतराळ पर्यटन एक उपयुक्त गोष्ट असल्याचे म्हटले आहे आणि हा उद्योग अनेक स्वरूपाने फायद्याचा असल्याचे सांगितले आहे. तज्ज्ञांचे असे सांगणे आहे की, अंतराळ पर्यटनाद्वारे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा मानवी आरोग्यावर, वनस्पतींच्या वाढीवर आणि भौतिक गुणधर्मांवर होणाऱ्या परिणामांचे प्रयोग करता येणे शक्य होईल. याची मदत भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी शास्त्रज्ञांना होऊ शकेल.

परंतु, सध्या तरी अंतराळ पर्यटनात केल्या गेलेल्या प्रयोगांद्वारे कोणताही शोध लावता आलेला नाही. ‘space.com’मधील एका अहवालात असे नमूद करण्यात आलेले आहे की, अंतराळ पर्यटनातील मोहिमांमध्ये केलेल्या प्रयोगांद्वारे कोणताही नवीन शोध लावता आलेला नाही. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीर जे करू शकत नाही, असे काहीही या प्रयोगांनी साध्य झालेले नाही; त्यामुळे अंतराळ पर्यटन फार महत्त्वपूर्ण किंवा क्रांतिकारी नाही.

पर्यावरणावर परिणाम : आतापर्यंत केल्या गेलेल्या अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रॉकेटद्वारे पृथ्वीच्या वरील वातावरणात वायू आणि घन रसायने उत्सर्जित केली जातात, त्यामुळे अंतराळ पर्यटन पर्यावरणासाठी घातक ठरू शकते. रॉकेटच्या प्रक्षेपणादरम्यान नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जित होते. नायट्रोजन ऑक्साईड ओझोनचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर करून ओझोन थर कमी करू शकते. यामुळे ओझोन थराला धोका निर्माण होऊ शकतो. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल), केंब्रिज युनिव्हर्सिटी आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधील काही संशोधकांनी २०२२ मध्ये या संदर्भात एक संशोधन केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, अंतराळ यानाच्या प्रक्षेपणातून निघणारी काजळी ही इतर स्त्रोतांमधून निघणाऱ्या काजळीच्या तुलनेत वातावरणाचे तापमान अधिक वाढवू शकते. या कारणांमुळे अनेक तज्ज्ञ अंतराळ पर्यटनाच्या फायद्यांबद्दल साशंक आहेत. तज्ज्ञांनी अनेकदा असे म्हटले आहे की, केवळ मनोरंजनासाठी अशा स्वरूपाच्या पर्यटनावर खर्च होणारा पैसा आणि संसाधनांचा वापर इतर अनेक महत्त्वपूर्ण कामांसाठी होऊ शकतो.