Kishtwar flash flood उत्तराखंडमधील धरालीनंतर नऊ दिवसांनी आता जम्मू-काश्मीरवर संकट ओढावले आहे. जम्मू-काश्मीरमध्येही ढगफुटीमुळे अचानक पूर आला आहे. गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी किश्तवाड जिल्ह्यातील एका दुर्गम डोंगराळ गावात ढगफुटी झाल्यामुळे ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या भीषण दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना मचल माता मंदिराच्या मार्गावरील चशोटी गावात घडली. या घटनेने पुन्हा एकदा अशा आपत्तींबद्दल चिंता वाढवली आहे. अशा घटनांमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडतात आणि मोठी वित्तहानी होते. या घटना सातत्याने घडण्याचे कारण काय? जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये नक्की काय घडले? जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने या घटना घडण्याचे कारण काय? जाणून घेऊयात…

ढगफुटी म्हणजे काय?

  • ढगफुटी म्हणजे कमी वेळेत, कमी क्षेत्रात होणारा अचानक आणि अतिशय तीव्र स्वरूपाचा पाऊस.
  • जेव्हा एका तासात सुमारे १० किमी x १० किमी क्षेत्रात प्रति तास १० सेमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो, तेव्हा त्याला ढगफुटी म्हणतात.
  • ढगफुटी मान्सूनमध्ये हिमालयासारख्या डोंगराळ प्रदेशात जास्त होते. जमिनीवरून उष्ण वारे ढगांकडे जातात तेव्हा हा हवेचा प्रवाह पावसाच्या थेंबांना वरच्या दिशेने घेऊन जातो, त्यामुळे नवीन थेंब तयार होतात आणि पूर्वीपासून असणारे थेंब आणखी मोठे होतात.
  • एकाच ठिकाणी अनेक लाख लिटर पाणी साठते, त्यामुळे अचानक ढग एकमेकांवर आदळतात आणि एकाच वेळी प्रचंड वेगात पाऊस कोसळतो.
उत्तराखंडमधील धरालीनंतर नऊ दिवसांनी आता जम्मू-काश्मीरवर संकट ओढावले आहे. (छायाचित्र-पीटीआय)

युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नमध्ये अतिवृष्टीचा अभ्यास करणारे भारतीय हवामानशास्त्रज्ञ रुचित कुलकर्णी यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले की, हिमालयाच्या पायथ्याशी, अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता पर्वतांवर आदळते, त्याला ओरोग्राफिक लिफ्ट म्हणतात. यामुळे क्युम्युलोनिम्बस ढग तयार होतात, ज्यात पावसाचे मोठे थेंब जमा होतात. “त्यामुळे ही दमट हवा वर जाते आणि ढग मोठे होत जातात, मात्र पाऊस पडत नाही. त्यानंतर ढग जड झाल्यावर फुटतात,” असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. ढगफुटीमुळे होणाऱ्या या अचानक आणि जोरदार पावसामुळे डोंगराळ भागातील पाणी वाहून नेणाऱ्या व्यवस्था लवकरच अपुऱ्या पडतात, ज्यामुळे अचानक पूर आणि भूस्खलन होते.

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये नक्की काय घडले?

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ गाव असलेल्या चशोटी येथे ढगफुटी झाल्याने ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, ज्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) दोन जवानांचादेखील समावेश आहे. ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, मृतांची संख्या वाढू शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. बचावलेल्या १२० लोकांपैकी ३८ जण गंभीर आहेत, असे वृत्तात म्हटले आहे. ज्या चशोटी गावात ही घटना घडली, त्या ठिकाणी अनेक भाविक वार्षिक मचल माता यात्रेसाठी जमले होते.

९,५०० फूट उंचीवर असलेल्या या मंदिरासाठी ८.५ किलोमीटरचा ट्रेक या गावातून सुरू होतो. हे गाव किश्तवाड शहरापासून सुमारे ९० किलोमीटर दूर आहे. अचानक आलेल्या पुराने दुकानांसह एक सुरक्षा चौकी आणि अनेक इमारती वाहून गेल्या. भाविकांसाठीच्या सार्वजनिक स्वयंपाकघरालाया आपत्तीचा मोठा फटका बसला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), पोलिस, भारतीय लष्कर आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या पथकाकडून अजूनही या भागात युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि वाचलेल्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे लष्कराच्या व्हाइट नाइट कोअरने सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री अब्दुल्ला यांच्याशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने या घटना घडण्याचे कारण काय?

जम्मू-काश्मीरच्या भौगोलिक रचनेमुळे हे ठिकाण भूकंप, पूर, भूस्खलन, हिमस्खलन आणि हिमवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी अधिक संवेदनशील ठरते. या प्रदेशात गेल्या काही वर्षांपासून ढगफुटी आणि अचानक पूर येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ‘ग्रेटर कश्मीर’च्या वृत्तानुसार, हिमनद्या वितळल्यामुळे काश्मीरच्या पर्वतरांगांमध्ये हिमनदीची सरोवरे (Glacial lakes) तयार झाली आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड्स (GLOF) चा धोका वाढला आहे.

हिमालयातील उष्णता वाढते आहे आणि त्यामुळे या प्रदेशात हवामानात बदल होत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये लोकांना आणि पायाभूत सुविधांना ‘क्रायोस्फियर’ संबंधित (Cryosphere-related hazards) अधिक धोका आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर गोठलेल्या पाण्याच्या प्रदेशाला हिमावरण म्हणजेच ‘क्रायोस्फिअर’ म्हटले जाते. जर ढगफुटी हिमनदीच्या सरोवराजवळ झाली, तर ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. ढगफुटीमुळे या सरोवरांमध्ये अचानक पूर येऊ शकतो. हिमनदीची सरोवरे अचानक फुटल्यामुळे खालील भागात राहणार्‍या लोकांवर गंभीर संकट येऊ शकते.

उत्तराखंडमधील ढगफुटी

राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात ५ ऑगस्टला ढगफुटी झाली आणि त्यामुळे अचानक पूर आला. या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. उत्तरकाशीमधील धराली गावाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. उत्तराखंडमध्येदेखील अशा घटना वारंवार घडतात. भारतामध्ये ईशान्येकडील पर्वतीय प्रदेश, पश्चिम घाट आणि हिमालयीन प्रदेश ढगफुटीसाठी संवेदनशील आहेत. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये सर्वांत भयंकर आपत्ती आली होती. त्यावेळी ढगफुटीमुळे आलेला विनाशकारी पूर आणि भूस्खलन यांमुळे अनेक गावे आणि शहरे नष्ट झाली होती. या आपत्तीमध्ये ६,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि ४,५०० गावांना फटका बसला होता, तेव्हापासून उत्तराखंडमध्ये ढगफुटीच्या अनेक घटना घडल्या आहेत. हवामान बदलासह अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांत अशा नैसर्गिक घटनांमध्ये वाढ झाली आहे.